कोरोना व्हायरस: जीव वाचवू शकणाऱ्या औषधाची काळ्या बाजारात विक्री

अभिनव शर्मा यांच्या काकांना खूप ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आढळली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रेमडिसिव्हिर आणायला सांगितलं.

कोव्हिड-19 रुग्णांच्या उपचारासाठी या औषधाची क्लिनिकल ट्रायल सध्या सुरू आहे, ‘आपत्कालीन उपयोगासाठी’ डॉक्टर हे औषध रुग्णांना देऊ शकतात, असंही प्रशासनाने मान्य केलं आहे. पण हे औषध मिळवणं शर्मांसाठी अशक्यप्राय गोष्ट होऊन बसली – रेमडेसिव्हिर कुठेही मिळत नव्हतं.

शर्मांनी अनेक लोकांना फोन केले, सर्वत्र विचारपूस केली, पण त्यांच्या काकांची प्रकृती खालावत चालली होती. “मला अश्रू अनावर झाले होते. एकीकडे माझे काका मृत्यूशी झुंजत होते, आणि दुसरीकडे त्यांना आवश्यक असलेलं औषध मिळवायला मला संघर्ष करावा लागत होता.

“अनेक कॉल केल्यानंतर अखेर मला ते औषध मिळालं, पण त्यासाठी मला सात पट जास्त पैसे मोजावे लागले,” अभिनव म्हणाले. “मला खरंच खूप वाईट वाटतं त्या लोकांसाठी ज्यांना हे परवडणारं नसेल.”

औषधीचा धंदा अन् जुगाड

हा प्रत्यय एकट्या अभिनव शर्मांना आला असं नाही. दिल्लीत अनेक कुटुंबांना कोरोनावरच्या आवश्यक औषधींसाठी काही पट जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यांना ही औषधं उपलब्ध होतायत पुरानी दिल्लीतील एका बाजारातून.

या बाजारात काम करणाऱ्या काही लोकांना बीबीसीने फोनवरून गाठलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की योग्य तो मोबदला मिळाला तर औषधीचा जुगाड होऊन जाईल.

“मी तुमच्यासाठी तीन बाटल्यांचा जुगाड करतो, पण प्रत्येक बाटलीचे 30 हजार रुपये. आणि हो, आत्ताच्या आत्ता यावं लागेल,” एकाने आम्हाला सांगितलं. तो “औषधींचा धंदा” करत असल्याचं त्याने सांगितलं.

दुसऱ्या एकाने आम्हाला एका बाटलीचा भाव 38 हजार रुपये सांगितला. या बाटलीची अधिकृत किंमत आहे 5,400 रुपये. आणि प्रत्येक रुग्णाला सरासरी पाच ते सहा डोस लागतात.

काय असतं रेमडेसिव्हिर?

जगात जेव्हा सार्स आणि इबोलाची साथ आली होती, तेव्ही रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती केली गेली. हे एक अँटी-व्हायरल ड्रग आहे.

अमेरिकेची औषध कंपनी गिलियाडनं हे औषध बनवलं होतं. तज्ज्ञांच्या मते खरं तर सार्स, मर्स आणि इबोलासारख्या साथीच्या रोगांमध्ये याचा उपयोग झाला खरा, पण ते तितक्या प्रमाणावर यशस्वी ठरलं नव्हतं.

पण आता SARC-CoV-2 या कोरोना व्हायरसविरोधात याचा सध्या फायदा होत असल्याचं समोर आलंय. रुग्णाच्या शरीरात जाऊन ते अशा एन्झाईम्सवर हल्ला करतं जे व्हायरसला एकाचे दोन व्हायला मदत करतात. त्यामुळे विषाणूंची शरीरात वाढ रोखता येते आणि रुग्णाचे वाचण्याची शक्यता बळावते.

जगभरात विविध रुग्णालयांमध्ये चाललेल्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये असं लक्षात आल्यानंतर या औषधीची चर्चा अमेरिकेपासून महाराष्ट्रापर्यंत होऊ लागली. महाराष्ट्रात हे औषध क्रिटिकल रुग्णांना देण्यात येणार आहे, त्यासाठी सरकारने 10 हजारर डोस मागवले आहेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एकदा सांगितलं होतं.

पण हे औषध काही रामबाण नाही, असं तज्ज्ञांना वाटतं. सध्या कोरोनावर कुठलंही ठोस असं औषध नाही, लस नाही. त्यामुळे सध्यातरी डॉक्टर हे औषध मोठ्या प्रमाणावर रुग्णांना प्रिस्क्राईब करत आहेत. म्हणूनच दिल्ली आणि इतर शहरांमध्ये याची मागणी वाढली आहे.

काळाबाजार

पण याच औषधीसाठी अनेकांना आपल्या आयुष्यभराची कमाई पणाला लावावी लागत आहे. दिल्लीत आणि शेजारच्या काही जिल्ह्यांमध्ये अशी अनेक कुटुंबं आहेत, ज्यांना रेमदेसिव्हिर खूप खूप महागात घ्यावं लागलं. आणि या नफेखोरीचं एक मुख्य कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यात असलेली प्रचंड मोठी तफावत.

रेमिडेसिव्हिर बनवणाऱ्या अमेरिकेच्या गिलियाड कंपनीने भारतात फक्त चार कंपन्यांना हे औषध बनवण्याची परवानगी दिली आहे – सिपला, ज्युबिलंट लाईफ, हेटरो ड्रग्स आणि मायलॉन. यापैकीही फक्त हेटरो ड्रग्सने आतापर्यंत उत्पादन सुरू केलं आहे.

हेटरो ड्रग्सने आजवर 20 हजार डोस पाच राज्यांना पुरवले आहेत, पण इतरांना ही औषधं “लीक” कशी होतायत, हे ठाऊ नसल्याचं कंपनीने बीबीसीला सांगितलं.

“आम्ही तर सर्व बाटल्या नियमांप्रमाणे थेट रुग्णालयांना सप्लाय केल्या होत्या. आमच्या वितरकांनाही दिलेल्या नाहीत,” असं कंपनीचे विक्री उपाध्यक्ष संदीप शास्त्री म्हणाले. या औषधीची मागणी पूर्ण करण्याचा कंपनी पूर्ण प्रयत्न करतेय, पण त्यात होत असलेला “हा काळा बाजार निराश करणारा आहे,” ते म्हणाले.

“आम्ही लोकांचं दुःख समजतो. त्यांना असं औषधांसाठी भटकावं लागू नये. आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये आमचं उत्पादन वाढवत आहोत, त्यामुळे परिस्थिती नक्की सुधारेल,” असं शास्त्री म्हणाले.

औषधी विक्रेत्यांनीही सांगितलं की त्यांच्याकडेसुद्धा रेमडेसिव्हिर नाही.

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष राजीव त्यागी यांनी बीबीसीला सांगितलं, “काल मला हैदराबादहून एका बाईचा फोन आलेला. तिचे वडील दिल्लीच्या एका रुग्णालयात भरती होते. ती म्हणाली या औषधांसाठी ती कुठलीही रक्कम द्यायला तयार आहे. पण मी काहीच करू शकत नव्हतो.”

मग प्रश्न पडतो की हे मौल्यवान औषध, जे इतर कुठेच उपलब्ध नाही, ते अखेर पुरानी दिल्लीतील एका बाजारात कसं काय मिळतंय?

यात कुठल्याही औषधी विक्रेत्याचा हात असूच शकत नाही, असं अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेचे सरचिटणीस राजीव सिंघल म्हणतात. “मी खात्रीने सांगतो की आमचा कुठलाही सदस्य यात सहभागी होऊ शकत नाही. हू एक राष्ट्रीय आणीबाणीचीच परिस्थिती आहे, त्यामुळे मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की जर कुणी ही औषध बेकायदेशीरपणे विकत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

फक्त रेमडेसिव्हिर

आणि हा काळा बाजार फक्त रेमडेसिव्हिरच्या बाबतीत होतोय, अशातला भाग नाही. टोसिलिझ्युमॅबचे अनधिकृत दरही सध्या गगनाला भिडले आहेत.

ऍक्टेमरा नावाने विकल्या जाणाऱ्या या औषधीमुळे जगभरात चिंताजनक स्थितीत असलेल्या रुग्णांमध्ये कमालीची सुधारणा पाहायला मिळाली आहे. या औषधीमुळे नेमकं काय होतंय, हे समजण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं जाणकार सांगतात. मात्र जगभरातल्या हॉस्पिटल्समध्ये कोरोनाच्या रुग्णांनी या औषधीला चांगला प्रतिसाद दिला आहे.

खरंतर हे औषध संधीवाताच्या रुग्णांना दिलं जातं. स्वित्झर्लंडच्या रोशे कंपनीकडून हे औषध सिपला भारतात आयात करून विकतं. त्यामुळे याचा पुरवठा बाजारात नेहमीच मर्यादित राहिला आहे, आणि काही तासात हे औषध तसंही कधी मिळत नाही.

सिपलाच्या एका प्रतिनिधीने सांगितलं की भारतात या औषधीची मागणी गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रचंड वाढली आहे. “आम्ही बाजारात या औषधीचा पुरवठा वाढवला आहे, पण आम्हाला वाटतं की पुढचे अनेक दिवस याची मागणी वाढतच राहील.”

आणि दिल्लीत अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटल्सनी हे औषधी स्वतःच शोधून आणायला सांगितलं.

“मी स्वतः किमान 50 फार्मसींमध्ये गेलो. त्यांनी सगळ्यांनी औषध आणून देतो म्हटले पण त्यासाठी दुप्पट-तिप्पट किंमत आकारू लागले. माझ्या काकूंसाठी आवश्यक तितके डोस जुगाडायला मला दोन दिवस लागले,” असं दिल्लीच्या एका व्यक्तीने सांगितलं.

पण रेमदेसिव्हिरसारखंच टोसिलिझ्युमॅबचा सुद्धा काळा बाजार होतोय, हे सिपलाच्या त्या प्रतिनिधीने स्पष्टपणे फेटाळलं. “आम्ही प्रत्येक डोसचा हिशोब ठेवतोय, जेणेकरून नफेखोरी होणार नाही. आम्ही तसं काही होऊच देणार नाही,” तो प्रतिनिधी म्हणाला.

(लोकांच्या विनंतीवरून काही नावं बदलण्यात आली आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)