You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उपचार : बाळंतपणानंतर लगेच प्लाझ्मा का डोनेट करता येत नाही?
- Author, कमलेश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीत काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्लाझ्मा बँकेची सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपीला मंजुरी देण्यात आली. आता कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर ही थेरपी केली जात आहे.
कोरोनाच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेली ही देशातली पहिली प्लाझ्मा बँक आहे. ही बँक इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्स (ILBS) हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आली आहे. या बँकेमुळे रुग्णांना प्लाझ्मा मिळणं सोयीस्कर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आता कोरोनापासून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा डोनेट करण्याची विनंती केली जात आहे. असं असलं तरी कोरोनाचा प्रत्येकच रुग्ण प्लाझ्मा डोनेट करू शकत नाही. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
याआधी बाळाला जन्म दिलेल्या तसेच सध्या गरोदर असलेल्या महिला प्लाझ्मा दान करू शकणार नाहीत, असं सांगण्यात आलं आहे
ILBSचे निर्देशक ए. के. सरीन यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, याआधी आई झालेल्या किंवा सध्या गर्भवती असलेल्या महिलेकडून प्लाझ्मा घेतला जाऊ शकत नाही. त्यांचा प्लाझ्मा घेतल्यास त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांचं अधिक नुकसान होऊ शकतं.
पण, रक्तदान करताना अशापद्धतीची काळजी घेतली जात नाही, मग प्लाझ्मा डोनेट करताना असं का केलं जात आहे? कोरोनाच्या रुग्णांसाठी हे कशापद्धतीनं धोकादायक ठरू शकतं?
महिलांमध्ये विशेष अँटीबॉडी
याविषयी मॅक्स हॉस्पिटलमधल्या ब्लड बँकेच्या प्रमुख डॉ. संगीता पाठक सांगतात, "प्लाझ्मासाठी रक्त काढावं लागत असलं, तरी दोन्ही प्रक्रियांमध्ये फरक असतो. प्लाझ्मा थेरपीसाठी जेव्हा रक्त काढलं जातं, तेव्हा त्यातील प्लाझ्मा वेगळा करून रक्त परत शरीरात सोडलं जातं."
त्या पुढे सांगतात, "यामुळे या दोन्ही प्रकारच्या डोनेशनच्या नियमांमध्ये फरक आहे. गरोदर महिला प्लाझ्मा देऊ शकत नाही, कारण यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या फुफ्फुसाला इजा पोहोचू शकते. याला ट्रांस्फ्यूजन रिलेटेड अॅक्यूट लंग इन्जरी (TRALE) असं म्हटलं जातं."
"महिलांमध्ये गर्भधारणा झाल्यावर अर्भकात असलेल्या पित्याच्या अंशाविरोधात अॅंटीबॉडीज बनतात. कारण त्याला शरीर हे बाह्य तत्त्वच मानतं. या अॅंटीबॉडीजला ह्युमन ल्युकोसाईट अॅंटीजेन (HLA) म्हटलं जातं. महिलेला जितकी मुलं जास्त होतील, तितक्या अधिक अॅंटीबॉडीज तिच्या शरीरात असतील."
"ह्युमन अँटीजेन हे महिलेच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा एक भाग असतं. शरीरात सामील होणारं तत्व बाहेरचं आहे की शरीराचं स्वत:चं आहे, हे ओळखण्यासाठी यामुळे मदत होते. गर्भधारणेत असं होणं सामान्य गोष्ट आहे. त्याचा अर्भक आणि आईवर वाईट परिणाम होत नाही. पण, जेव्हा ते दुसऱ्या शरीरात प्रवेश करतं, तेव्हा मात्र त्यामुळे नुकसान होऊ शकतं."
"जेव्हा HLA अँटिबॉडी प्लाझ्माच्या माध्यमातून एखाद्याच्या शरिरात प्रवेश करते, तेव्हा त्याचा फुफ्फुसाच्या रेषेतील व्हाईट ब्लड सेल्स (पांढऱ्या रक्त पेशी) सोबत संपर्क येतो. यामुळे फुफ्फुसाला इजा होते. रुग्णाला श्वास घेण्यात अडचण येते."
कोरोनाच्या रुग्णांना आधीच श्वसनासंबंधी अडचण जाणवत असते, यात HLAमुळे अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
ज्या महिलांचा गर्भपात झाला आहे, त्यासुद्धा प्लाझ्मा डोनेट करू शकत नाही. कारण या महिलांमध्येही HLA अँटिबॉडी तयार झालेल्या असतात.
याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय, फुफ्फुस, यकृत आणि किडनीचा आजार असलेले रुग्णही प्लाझ्मा डोनेट करू शकत नाही, असं डॉक्टर सांगतात.
डॉ. संगीता पाठक सांगतात, "एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्याचं शरीर आजाराचा सामना करण्यासाठी जे पर्याय अवलंबवतं, ते सगळे पर्याय प्लाझ्मामध्ये असतात. जसं की कोरोना व्हायरसमध्ये जी अँटीबॉडी तयार होते, ती प्लाझ्मामध्ये असते. आपण जर आजारी व्यक्तीकडून प्लाझ्मा घेतला, तर त्यामुळे त्याचा आजार बळावू शकतो. यामुळे कोरोनाच नाही, तर इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी त्याच्या शरीरात असलेले सुरक्षेचे उपायही कुचकामी ठरू शकतात."
प्लाझ्मा डोनेशनचे नियम
डॉक्टर संगीता सांगतात की, प्लाझ्मा डोनेशनसाठी कोरोनासोबतच रक्तदानाच्या नियमांचंही पालन करावं लागतं. यासाठी व्यक्तीचं वजन 55 किलो अथवा त्याहून जास्त, शरीरातील हेमोग्लोबिनचं प्रमाण 12.5 अथवा त्याहून जास्त आणि वय 18 ते 60 दरम्यान असावं लागतं.
त्या व्यक्तीचं उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात असावं लागतं. प्लाझ्मा डोनेट करताना रक्तदाब बघितला जातो. यासोबतच व्यक्तीनं दातासंबंधी उपचार केलेले नसावेत.
कोरोनाचे रुग्ण पूर्णत: बरे झाल्यानंतर 14 दिवसांनी त्यांचा प्लाझ्मा घेतला जातो. संबंधित व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यापासून किंवा हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यापासून पुढे 14 दिवस मोजले जातात.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
एकदा प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर पुन्हा प्लाझ्मा देता येऊ शकतो.
पण, कोव्हिड-19 साठी बनलेली अँटिबॉडी शरीरात कायमस्वरुपी राहत नसल्यामुळे ICMRनं म्हटलं आहे की, प्लाझ्मा डोनेशन हे रुग्ण बरा झाल्यानंतर 4 महिन्यांपर्यंत करता येऊ शकतं. त्यानंतर अँटिबॉडी शरिरात राहिल की नाही, हे सांगता येत नाही.
डोनेशनपूर्वी करावी लागणारी टेस्ट
प्लाझ्मा डोनेट करण्यापूर्वी डोनरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती की नाही, हे पाहिलं जातं. यामुळे संबंधित डोनरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट होतं.
त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये रुग्णाचे 2 रिपोर्ट निगेटिव्ह आले की नाही, ते पाहिलं जातं. यामुळे रुग्णाला सद्यस्थितीत कोरोना नसल्याचं निष्पन्न होतं.
पण, अनेक ठिकाणी रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्याची कोरोनाची चाचणी होत नाहीये. अशावेळी हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपमध्ये दिलेल्या तारखेच्या 14 दिवसांनंतर प्लाझ्मा घेता येऊ शकतो.
यामध्ये डोनरच्या 24 तासांच्या आता दोन टेस्ट केल्या जातात. त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते आणि याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्लाझ्मा घेतला जातो.
पण, जर का रुग्णाचा एकच रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर त्याची परत आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते.
एखादा रुग्ण कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर 28 दिवसांनंतर प्लाझ्मा डोनेट करायला आल्यास त्याची अँटिबॉडी टेस्ट केली जाते.
ही सगळी प्रक्रिया प्लाझ्मा डोनेट करणाऱ्या आणि तो स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी केली जाते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)