You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना उपचार : कोव्हिड-19 रुग्णच कोरोना व्हायरसग्रस्तांचे प्राण वाचवू शकतात?
- Author, इमरान कुरैशी
- Role, बंगळुरूहून, बीबीसी हिंदीसाठी
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचाराच्या दृष्टीने एक आशादायी बातमी आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMRने कोव्हिड-19 रुग्णांवर उपचारासाठी केरळ सरकारने सुचवलेल्या कॉन्व्लेसेंट प्लाझ्मा थेरपीली मंजुरी दिली आहे.
केरळ सरकारने स्थापन केलेल्या वैद्यकीय टास्क फोर्सने कोरोना विषाणुच्या साथीवर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची शिफारस केली आहे.
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं तर जे रुग्ण कुठल्याही संसर्गावर यशस्वी मात करून बरे होतात. म्हणजे त्यांच्या शरीरात त्या विशिष्ट संसर्गाविरोधात प्रतिजैविक (अँटिबॉडीज) तयार होतात, याच रुग्णांच्या माध्यमातून इतर रुग्णांवर उपचार करणे.
संसर्गातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरिरातल्या अँटिबॉडीजच्या सहाय्याने कोव्हिड-19 रुग्णांच्या रक्तातील कोरोना विषाणू नष्ट करता येतो.
केरळच्या वैद्यकीय टास्क फोर्समधले एक सदस्य आणि कोझिकोडमधल्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट असलेले डॉ. अनूप कुमार सांगतात, "एखाद्या रुग्णाच्या शरीरातील अँटिबॉडीज तो रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याच्या 14 दिवसानंतरच घेता येतात. शिवाय, त्या रुग्णांची कोव्हिड-19 चाचणी एकदा नाही तर दोनवेळा निगेटिव्ह आलेली असायला हवी."
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एलिझा (एन्झाईम लिन्क्ड इम्युनोसॉर्बेंट एसे) चाचणी करतात. या चाचणीतून व्यक्तीच्या शरीरात किती अँटिबॉडीज आहेत, याची कल्पना येते.
मात्र, अशा व्यक्तीच्या शरीरातून रक्त घेण्याआधी राष्ट्रीय निकषांनुसार त्या रक्ताच्या शुद्धतेची तपासणी करणंही गरजेचं असतं.
तिरुअनंतपूरमधल्या श्री चित्रा तिरुनाल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. देबाशिष गुप्ता सांगतात, "रक्त तपासणीबाबत अजिबात हयगय करण्यात येणार नाही."
रक्त कसं काढतात?
कोव्हिड-19 आजारातून बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून एस्पेरेसिस पद्धतीने रक्त काढलं जाईल. या पद्धतीत रक्तातीत प्लाझ्मा किंवा प्लेटलेट्स काढून उरलेलं रक्त व्यक्तीच्या शरीरात पुन्हा सोडलं जातं.
डॉ. अनूप कुमार यांनी सांगितलं, "अँटिबॉडीज केवळ प्लाझ्मामध्ये असतात. डोनरच्या शरीरातून जवळपास 800 मिली प्लाझ्मा घेतात. एका रुग्णाला केवळ 200 मिली रक्ताची गरज असते. म्हणजे एका डोनरच्या प्लाझ्मामुळे चार रुग्ण बरे होऊ शकतात."
डॉ. गुप्ता यांनी सांगितलं, "हा प्लाझ्मा फक्त आणि फक्त कोव्हिड-19च्या रुग्णांनाच दिला जाईल. इतर कुणालाच नाही."
प्लाझ्मा कुणाला मिळणार आणि प्रकृतीत सुधारणा कशी होते?
डॉ. अनुप कुमार सांगतात, "ज्यांना ताप, कफ आणि श्वास घेताना थोडा त्रास जाणवतो त्यांना प्लाझ्मा देण्याची गरज नाही. ज्यांची प्रकृतीत ढासळत असेल आणि पुरेसा ऑक्सिजन घेता न आल्याने ज्यांची प्रकृती गंभीर होण्याचा धोका असेल, अशाच रुग्णांना प्लाझा द्यावा."
खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्लाझ्मा देता येईल, असंही डॉ. अनूप कुमार म्हणतात.
प्लाझ्मा उपचाराच्या परिणामाविषयी सांगताना ते म्हणतात, "आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्यात असं आढळून आलं आहे की 48 ते 72 तासांमध्ये प्रकृतीत सुधारणा व्हायला सुरुवात होते."
पुढची पायरी काय असेल?
कोव्हिड-19 या आजारावर आयसीएमआरने प्लाझ्मा उपचाराला मंजुरी दिली आहे. यानंतर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची मान्यता मिळवावी लागेल. यात फारसा वेळ लागणार नाही, असं केरळच्या वैद्यकीय टास्क फोर्सच्या सदस्यांना वाटतं.
मात्र, या टीमकडे प्लाझ्मा उपाचरपद्धतीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी वेळ खूप कमी असणार आहे. चीन आणि दक्षिण कोरियामध्ये या थेरपीचा वापर सुरू झाला आहे.
डॉ. अनूप सांगतात, "क्लिनिकल ट्रायलसाठी एलिजा किट मागवावे लागतील. त्यासाठीची ऑर्डर आम्ही आधीच दिलेली आहे. या किट्सना जगभरातून मागणी आहे."
केरळमध्ये आतापर्यंत 80 हून जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
डॉ. अनूप सांगतात, "कोव्हिड-19 आजारातून बरे झालेल्या किती लोकांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे, हे आपल्याला शोधावं लागेल. आमच्याकडे याची निश्चित आकडेवारी नाही. मात्र, यातल्या अनेकांकडून आपण प्लाझ्मा घेऊ शकतो."
प्लाझ्मा उपचारासाठी किती खर्च येतो?
प्लाझ्मा उपचार सरकारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार असल्याने त्यासाठी दोन ते अडीच हजारांपेक्षा जास्त खर्च येणार नाही, असं डॉ. अनूप यांचं म्हणणं आहे.
प्लाझ्मा थेरपीच का?
यामागे दोन मुख्य कारणं आहेत - पहिलं कारण म्हणजे कोव्हिड-19 आजारावर अजूनतरी कुठलाही उपचार उपलब्ध नाही.
आणि दुसरं कारण म्हणजे संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून जगभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जातो. यापूर्वी आलेल्या सार्स, मर्स आणि एचवनएनवन या साथीच्या रोगांच्यावेळीदेखील प्लाझ्मा थेरपीचाच वापर करण्यात आला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)