You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई पोलीस बदली आदेशावरून उद्धव ठाकरे सरकारमध्ये, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव?
मुंबई पोलीस दलातील 10 डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश गृह खात्याने तीन दिवसांपूर्वी जारी केला होता. मात्र रविवारी बदल्यांचा तोच आदेश रद्द करण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
"हा आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयाने रद्द केला आहे.आमच्या सरकारमध्ये, म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात अतिशय चांगला समन्वय, कुठलाही मतभेद नाही," असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
मात्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाआघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय की काय, असे प्रश्न मुंबईत विचारले जात आहेत. तसंच एका श्वासात गृहमंत्र्यांनी आदेश परत घेत, लगेचच पुढे "कुठलाही मतभेद नाही" असं सांगून टाकल्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा होते आहे.
या प्रकरणी रविवारी संध्याकाळी मुंबई पोलीस आयुक्तांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय. गृहमंत्री अनिल देशमुख सध्या नागपुरात असून, ते सोमवारी मुंबईला परतण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई पोलीस विभागातील डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश गुरुवारी काढण्यात आला. त्यानुसार एकूण 10 अधिकाऱ्यांच्या मुंबईत अंतर्गत बदल्या करण्यात आल्या.
मात्र अवघ्या तीन दिवसांत तो आदेश रद्द करण्यात आलाय. मुख्यमंत्री कार्यालय तसंच गृह मंत्रालयाकडून हा बदलीचा आदेश रद्द करण्यात येत आहे, असं सांगण्यात आलं.
मुंबई पोलीस आयुक्तांनी बदल्यांचा आदेश जारी केला होता, मात्र तो का रद्द करण्यात आलाय, याविषयी देशमुख यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नव्या जागी कार्यभार स्वीकारला होता. मात्र या नव्या आदेशाप्रमाणे, डीसीपींना ते होते त्याच ठिकाणी कार्यरत राहण्यास सांगण्यात आलं आहे.
नव्या आदेशाप्रमाणे प्रणय अशोक यांच्याकडे मध्य मुंबईतील झोन 4चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. एन.अंबिका यांच्याकडे झोन 3चा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवीन आदेशावर सहपोलीस आयुक्त नवल बजाज यांची स्वाक्षरी आहे.
मात्र गृहखात्यातील काही सूत्रांच्या हवाल्याने PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, या बदल्या बऱ्याच काळापासून होणे अपेक्षित होत्या. मात्र कोरोनाचं संकट असताना त्या व्हायला नको, असा विचार करून तो आदेश मागे घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं?
यापूर्वी लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विचारात न घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती.
घरापासून दोन किलोमीटर अंतरातच प्रवासाची मुभा काढण्याचा आदेश मुंबई पोलिसांनी काढला होता. घराबाहेर केवळ दोन किलोमीटर फिरण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत आक्षेप नोंदवला होता. या निर्णयावर तीव्र टीका होऊ लागल्याने मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला होता.
गृहमंत्रिपद राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्याकडे आहे. काँग्रेस नेत्यांनी याआधीही काही मुद्यांवरून मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतर आता या बदल्यांच्या आदेशाच्या यूटर्नमुळे महाआघाडीत सगळं आलबेल नाही, असं म्हटलं जात आहे.
वारंवार असं घडत असल्यामुळे सरकारच्याच विभागांमध्ये ताळमेळ नसल्याची टीका यानिमित्ताने सोशल मीडियावर होते आहे. पोलीस खात्यातील बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी नव्हती. त्यामुळे गुरुवारी निघालेला आदेश रद्द करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
त्यामुळे महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांमध्ये सुसंवाद आणि समन्वय असल्याचं स्पष्ट होत आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)