You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पृथ्वीराज चव्हाण: 'काँग्रेसला छोटा भाऊ म्हटलं जातंय याची खदखद आम्हाला आहे'
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
लॉकडाऊन उठला पाहिजे, ट्रेन सुरु झाल्या पाहिजेत, व्यवसाय सुरु झाले पाहिजेत अशी लोकांकडून आग्रहाची मागणी आहे हे मान्य आहे, पण इथे आरोग्याचाही प्रश्न आहे हे पाहून सुवर्णमध्य शोधला पाहिजे असं मत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे.
जुलै महिन्यातही वाढवल्या गेलेल्या लॉकडाऊन बद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत अशा आशयाच्या बातम्या गेल्या काही दिवसांत आल्या आहेत. तसा कोणताही विसंवाद नाही असा दावा करतांना केंद्र सरकारच्या धोरणांत स्पष्टता नसल्यानं हे चित्रं निर्माण होत आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
"निर्णयप्रक्रियेमध्ये नवीन कायदा आहे जिथे अधिका-यांना खूप अधिकार दिलेले आहेत. राजकीय लोकांना कित्येकदा वाटतं की आम्हाला विचारलं नाही. अशा काही तक्रारी आहेत. पण हे सगळंच नवीन आहे. कोरोना आहे, तीन पक्षांचं नवीन सरकार आहे आणि एन. डी. एम. ए. च्या कायद्यामुळे सरकारी अधिका-यांना विशेष अधिकार दिले गेले आहेत. त्यामुळे मागच्या कोणत्याही राजवटीशी सध्याच्या सरकारशी आणि परिस्थितीशी थेट तुलना करता येणार नाही," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
कोरोनाच्या या काळात कॉंग्रेसचं 'महाविकास आघाडी' सरकारमधलं नाराजीनाट्यही चर्चेत राहिलं. या सरकारमध्ये कॉंग्रेसला दुय्यम स्थान दिलं जातं अशा तक्रारी वरिष्ठ मंत्र्यांनीच केल्या. त्यावर बोलतांना चव्हाण म्हणाले, "आमचा पक्ष सगळ्यांत या सरकारमध्ये आकड्यांनी कमी आहे.
आम्हाला कायम पहिल्या क्रमांकाचा पक्ष असण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आम्हाला दुय्यम स्थान किंवा छोटा भाऊ म्हणणं अशी खदखद आहे. त्यामुळे आम्हाला विचारलं का नाही, भेटलं का नाही असं होतं आहे. अशा गोष्टी होताहेत पण त्या सोडवल्याही जाताहेत. यामधे यावर चर्चा झाली, बैठका झाल्या. त्यातून परिस्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे."
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-
2017 सालीच भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली होती असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस यांनी नुकताच एका मुलाखतीत केला होता. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या या जवळीकीची कॉंग्रेसला चिंता नाही असं चव्हाण म्हणाले आहेत.
"देवेंद फडणवीसांनी जे वक्तव्य केलं ते खरं होतं की खोटं हे ते फडणवीस स्वत: सांगू शकतील किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस सांगू शकेल ज्यांच्यासोबत त्यांच्या तथाकथित बैठका झाल्या. आम्हाला यातलं काही माहित नाही. पण तोडफोड करुन राजकीय समीकरणं करण्याचे प्रयत्न होत राहतात.
आताही चाललेले आहेत. भाजपा पाहतं आहे की कोणी गळाला लागतो आहे का मासा. त्यांना कर्नाटक, मध्यप्रदेशपासून ती सवय लागलेली आहे. काही करा आणि विरोधी पक्षाला संपवून टाका हा 'अमित शाह' पॅटर्न भाजपानं आणलेला आहे. पण 2017 मध्ये केवळ शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला होता. ते किती खरं किती खोटं हे फडणवीसच सांगू शकतील," चव्हाण म्हणाले.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
चीनच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींवर सातत्यानं टीका करणा-या राहुल गांधी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1962 सालच्या चीनच्या युद्धात गमावलेल्या भूभागाची आठवण करुन दिली.
कॉंग्रेससाठी राजकीयदृष्ट्या अडचणीच्या या वक्तव्यावर बोलतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाला आवडलं न आवडलं तरी आम्हाला केंद्र सरकारला प्रश्न विचारावेच लागतील असं म्हटलं आहे.
"कॉंग्रेस हा देशातला सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचा आमचा मूलभूत अधिकार आहे. तो आम्ही पार पाडणारंच. त्या प्रश्नांची उत्तरं देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्याच्याबद्दल कोणाला आवडेल न आवडेल म्हणून गप्प बसून चालणार नाही. आणि वर्तमान प्रश्नांची उत्तरं ही भूतकाळातून मिळणार नाहीत. इतिहासाचे संदर्भ असतात, पण मग फक्त 1962 च का? त्याच्या अगोदरही गेलं पाहिजे. मुळातच या देशावर अनेक आक्रमणं पूर्वी झाली, त्यापर्यंत गेलं पाहिजे. चर्चा झाली पाहिजे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की आजचे प्रश्न विचारायचे नाहीत," चव्हाण म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये नव्या जबाबदा-यांविषयी निर्णय घेण्याची जोरात चर्चा सुरु आहे. त्यात सध्या विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पाटोळे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी तर पृथ्वीराज चव्हाण यांचं विधानसभा अध्यक्षपदासाठी नाव पुढे आल्याचं म्हटलं जातं आहे. पण आपल्याला याविषयी अद्याप काहीही माहित नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)