You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ विधानं अस्वस्थतेतून, शरद पवारांबाबतच्या दाव्यांवर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
'अजित पवार हे शरद पवार यांच्यावर नाराज होते त्यामुळेच त्यांनी भाजपबरोबर येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला', या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बीबीसी मराठी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
तसंच राज्यातील जिल्हाबंदी आणि मुंबईत सुरू असलेल्या 2 किमीच्या नियमाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
"देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्यं ते करत असतात," असं प्रत्युत्तर देशमुख यांनी फडणवीस यांना दिलं आहे.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा संपादित अंश खालीलप्रमाणे.
'फडणवीसांचं ते दावे अस्वस्थतेतून'
प्रश्न - शरद पवारांवर अजित पवार नाराज होते म्हणून ते भाजपबरोबर आले असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. ते खरंच नाराज होते का?
उत्तर - आता हा सहा महिने जुना विषय झालेला आहे. त्यावर जास्त काही वक्तव्य करता येणार नाही.
प्रश्न - पण राष्ट्रवादीची मंडळी याविषयावर का बोलायला तयार नाहीत, का कुणीच पुढे येऊन याविषयावर बोलत नाही?
उत्तर - हा फार जुना विषय झालेला आहे, आता आमचं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. पाच वर्षं आमचं सरकार चालेल आणि पाच वर्षांनंतरही आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करू.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
प्रश्न - पण देवेंद्र फडणवीसांना दावा केला आहे की पवारांनी भाजपला ऑफर दिली होती, नेमकं खरं काय आहे?
उत्तर - असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब सध्या अत्यंत अस्वस्थ आहेत. बेचैन आहेत. त्यांना सुरुवातीला स्वप्नं पडत होती सरकारमध्ये येण्याची, पण त्यांचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे ते अशा प्रकारचं स्टेटमेंट करून जुन्या गोष्टी काढत राहतात. कोरोनाच्या काळात आमचं सरकार व्यवस्थित काम करत आहे. आमचं पोलीस खातं आहे, आमचे डॉक्टर्स आहेत.
अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या गोष्टी काढून वातावरण खराब करण्यापेक्षा अशा कोरोनाच्या स्थितीमध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं पाहिजे, अशी त्यांना विनंती आहे.
प्रश्न - पण, राष्ट्रवादीच्या भाजपबरोबर सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू होत्या की नव्हत्या?
उत्तर - नाही, चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आमची सुरुवातीपासूनची युती होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही निवडणुका लढल्या. त्यानंतर शिवसेना आमच्या बरोबर आली.
या तिन्ही पक्षांचं चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात सरकार सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्यं ते करत असतात.
'सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अनेकांची नावं'
प्रश्न - सुशांत सिंग प्रकरणात तुम्ही 15 जूनला एक स्टेटमेंट दिलंत की पोलीस यामध्ये व्यावसायीक शत्रूत्वाच्या अँगलनेसुद्धा तपास करतील, खरंच असं काही आहे का, नेमकी कारणं कळू शकली आहेत का?
उत्तर - या प्रकरणात सविस्तर चौकशी सुरू आहे. गेल्या 8 दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. ज्यांना त्यांना बोलवायचं आहे त्यांना बोलवून चौकशी सुरू आहे.
आमच्याकडे व्यावसायीक दुष्मनीतून त्यानं आत्महत्या केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापद्धतीनं पोलीस खातं तपास करत आहे. अनेकांना बोलावून त्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले आहेत.
प्रश्न - बॉलिवूडमधील काही निर्माते आणि अभिनेते सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेत असं सोशल मीडियावर बोललं जातंय, खरंच काही नावं पुढे आली आहेत का?
उत्तर - मी नावं इथं आपल्याला सांगणार नाही, पण अनेक नावं समोर आली आहेत ज्यांचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना बोलावलं जाईल, त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल.
त्याने खरंच व्यावसायीक दुष्मनीतूनच आत्महत्या केली आहे का? याची चौकशी सुरू आहे.
प्रश्न - पण मीडियामध्ये फारच 'कळतंय-समजतंय' अशा बातम्या येत आहेत, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत आहेत. या प्रकरणी अधिकृत माहिती जाहीर करणं गरजेचं आहे, असे तुम्हाला वाटते का?
उत्तर - जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. त्याची चौकशी आपण जाहीर करू शकत नाही.
कुणी काय सांगितलं यावरून संपूर्ण तपासाअंती जो निष्कर्ष काढू तेव्हा आम्ही जाहीररित्या सर्व सांगू. सध्या चौकशी व्यवस्थित सुरू आहे.
ज्यांना ज्यांना बोलवायची आवश्यकता आहे. ज्यांच्या ज्यांच्याकडून माहिती घेणं आवश्यक आहे त्यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेणं सुरू आहे.
प्रश्न - या प्रकरणाच्या CBI चौकशीची मागणी केली जात आहे. खरंच त्याची गरज आहे का?
उत्तर - पोलीस खातं सक्षम आहे. महाराष्ट्राचं पोलीस खातं यासाठी सक्षम आहे.
'2 किमी नाही, जवळचा बाजार'
प्रश्न - एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरू झालीय आणि मुंबईत 2 किलोमीटरचा नियम काढण्यात आला आहे, याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे, मुंबईत जमावबंदीचे आदेशही आहेत. लोकांमध्ये यावरून फार संभ्रम आहे. याबाबत फारशी स्पष्टता नाही, तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हीच आता यावर सुस्पष्ट माहिती देऊ शकाल.
उत्तर - आज आपण पहिलं तर महत्त्वाचं काम असेल तर बाहेर गेलं पाहिजे. पण आपल्याला शॉपिंग करायचं आहे, कुठे काही किराणा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी वरळीहून जुहूला जाण्याची आवश्यकता नाही. किंवा कुलाब्याकडून वरळीकडे जाण्याची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी तुमचा जवळचा बाजार आहे.
ज्या ठिकाणी तुम्हाला गरजेच्या वस्तू मिळू शकतात त्याठिकाणी जाऊन लोकांनी खरेदी केली पाहिजे. पण लक्षात आलं की लोक किराणा आणि दुधाच्या नावाखाली दूरदूरपर्यंत मुंबईत फिरत आहेत. त्यामुळे संक्रमण वाढायची शक्यता आहे. त्यामुळे परत कडक निर्बंध मुंबईमध्ये लावण्यात आलेले आहेत.
आपल्याला सांगतो, अनलॉक-1च्या काळात 21 ते 30 वयोगटातल्या लोकांच्या संक्रमणाचं प्रमाण फार वाढलं आहे.
पहिले हे प्रमाण नव्हतं. आजकाल तरुण मित्र मोटरसायकल घेतली, गाडी घेतली की चालले फिरायला, त्यामुळे 21 ते 30 वयोगटात संक्रमाणाचं प्रमाण वाढत आहे. याचा अर्थ आता तरुणांना असं वाटायला लागलं आहे की झालं आता सगळं मोकळं, चला आता पुन्हा मुंबई फिरू. तशा प्रकारची परिस्थिती नाही.
आपण सर्व गोष्टी काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. सर्व गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत. तर आपल्याला संक्रमणसुद्धा थांबवता येईल आणि महाराष्ट्राच आर्थिक व्यवहार चालू ठेवता येतील.
प्रश्न - ज्यांच्याकडे 2 किलोमीटर परिघात काही नाही, त्यांनी नेमकं काय कारायचं. एखादी व्यक्ती गोराईला राहत असेल आणि बाजार करण्यासाठी त्यांनी बोरिवली स्टेशनला जावं लागत असेल तर त्यांनी काय करायचं?
उत्तर - 2 किलोमीटरचा अर्थ तुम्ही तसा घेऊ नका, त्यामध्ये आमचा उद्देश असा आहे की जवळचं मार्केट. जे तुमच्या जवळचं मार्केट आहे त्याठिकाणी तुम्ही जाऊ शकता. काय एकदम टेप लावून कुणी 2 किलोमीटर मोजत नाही. जे काही तुमच्या जवळचं मार्केट आहे तिथं जाऊन खरेदी करावी एवढंच आमचं म्हणणं आहे. पण जवळचं मार्केट सोडून तुम्ही कुठे दूर जात असाल तर त्यावर आमचे निर्बंध आहेत.
प्रश्न - पण या 2 किमीच्या नियमाचं परिपत्रकसुद्धा कुठे आलेलं नाही. हा निर्णय घेताना मुंबई पोलीस आयुक्तांनी तुमच्याशी चर्चा केली होती का?
उत्तर - चर्चा झाली होती त्याचा प्रश्नच नाही. चर्चा होऊनच हा निर्णय झालेला आहे. त्यांचा उद्देश त्याच जवळं मार्केट असाच आहे. ठिक आहे सुरुवातीला थोडं कन्फ्युजन झालं एक दिवस. पण आता सर्व सुरळीत झालेलं आहे. त्याबाबत आता कुठेही अडचण नाही. कुठलही गाईडलाईन आपण नवी देतो तेव्हा त्याबाबत सुरुवातीला थोडं कन्फ्युजन राहातं. पण आता ते दूर झालेलं आहे.
प्रश्न - पण हा 2 किमीचा नियम कधीपर्यंत राहणार आहे?
उत्तर - 2 किमी हे (अंतर) तुम्ही पकडू नका, जवळचं मार्केट, नेबरिंग मार्केट हे तुम्ही डोक्यात ठेवा. त्याचा उद्देश तुमच्या जवळं मार्केट हा आहे.
प्रश्न - एकीकडे सामान्यांना 2 किलोमीटरचा नियम आहे आणि काही दिवसांपूर्वी संपूर्ण वाधवान कुटुंब त्यांच्या लवाजम्यासह महाबळेश्वरला गेलं, त्या प्रकरणात लगेचच अमिताभ गुप्तांना यांना निलंबित करण्यात आलं, पण लगेच 15-20 दिवसांत त्यांना रुजू करून घेण्यात आलं. नेमकं खरंच त्यांनीच पत्र दिलं होतं की पत्र देण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, आणि जर त्यांनी स्वतःच्या अखत्यारीत पत्र दिलं होतं तर मग त्याची चौकशी पूर्ण झाली आहे का?
उत्तर - अमिताभ गुप्ता यांनी स्वतः कबुल केलं की त्यांनी ओळखीतून हे पत्र दिलं. त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे. त्याची आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी केली. पुढील काळात अशी चूक तुमच्याकडून घडू नये अशी त्यांना नोटीससुद्धा बजावण्यात आली आहे.
जिल्हाबंदी कायम राहणार
प्रश्न - जिल्हा बंदीवरून लोक खूप नाराज आहेत, यूपी बिहारमधून ट्रेन येऊ शकतात, पण आम्ही राज्यात फिरू शकत नाही अशी लोकांची ओरड आहे, बीबीसीच्या पॉडकास्टमध्ये लोक रोज त्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. ही जिल्हाबंदी कधीपर्यंत सुरू राहणार आहे?
उत्तर - दोन-तीन दिवसांपूर्वी मी सातारा, सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातल्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यात बाहेरचं कुणी येता कामा नये, असं त्या जिल्ह्यातल्या लोकांचं म्हणणं आहे.
कसं आहे सांगतो, जिल्हाबंदी असल्यामुळे संक्रमण थोडं कमी होत आहे. मधल्या काळात मुंबई आणि एमएमआरमधले अनेक लोक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये खास करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढलं. त्यामुळे ही जिल्हाबंदी आपण केलेली आहे, ही अतिशय गरजेची आहे. आपण जर जिल्हाबंदी हटवली तर संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढायची शक्यता आहे.
जगभरातील आकडेवारी -
कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी-
आता मी कोल्हापूरचं सांगलीचं उदाहरण सांगतो, सुरुवातीला इथं काहीच संक्रमण नव्हतं. पण मधल्या काळात आपण शिथिलता दिल्यानंतर जी काही मंडळी बाहेरून तिथं गेली त्यामुळे तिथं संक्रमण झालं. ग्रामीण भागात संक्रमण झालं. त्यामुळे सध्याच्या स्थितीत आपल्याला बंधन ठेवणं गरजेचं आहे.
त्यामुळे त्या त्या जिल्ह्यात वाढतं संक्रमण थांबवता येऊ शकतं. जर जिल्हाबंदी उठवली तर मात्र प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संक्रमण होईल. त्यामुळे सध्याच्या काळात जिल्हाबंदी काही दिवस ठेवणं गरजेचं आहे.
प्रश्न - पण जिल्हाबंदीवरून असलेली लोकांची नाराजी सरकार कशी दूर करणार आहे?
उत्तर- मी समजू शकतो. अनेक लोकांची जिल्हा बंदीमुळे अडचण असणार आहे. पण इमर्जन्सी आणि तातडीच्या कामांसाठी आम्ही परवानगी देत आहोत. त्याचे पास देत आहोत. पण पास खरंच देणं गरजेचं आहे का व्हेरीफाय नक्की करतो. पण आजच्या तारखेला जर आपण जिल्हाबंदी हटवली तर संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)