You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
म्यानमार भूस्खलन : मौल्यवान रत्नाच्या खाणीत 113 कामगारांनी गमावले प्राण
म्यानमारमध्ये एका खाणीजवळ भूस्खलन होऊन जवळपास 113 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमारच्या उत्तरेकडच्या कचिन प्रदेशातल्या पेकान भागात जेड खाण आहे. या खाणीजवळ ही दुर्घटना घडली. घटनास्थळावरून आतापर्यंत 113 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
बचावकार्य करणाऱ्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे चिखलाचा मोठा लोट एखाद्या लाटेप्रमाणे आला आणि या खाणीत काम करणारे कामगार अडकले.
जेड म्हणजे हरिताश्म. हे हिरव्या रंगाचे मौल्यवान रत्न असतात. जगात सर्वाधिक हरिताश्म म्यानमारमध्ये आढळतात. म्यानमार दरवर्षी जवळपास 30 अब्ज डॉलर्सच्या हरिताश्मची निर्यात करतो.
मात्र, या खाणींमध्ये दुर्घटनाही कायम होत असतात. गेल्यावर्षी या खाणींमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 100 कामगारांचा मृत्यू झाला होता.
म्यानमारच्या अग्निशमन दलाने फेसबुकवरून या दुर्घटनेसंबंधीची माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे, "मुसळधार पावसामुळे चिखलाची मोठी लाट आली आणि या लाटेखाली खाणीत काम करत असलेले कामगार दबले."
कशी घडली दुर्घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक-दोन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने बुधवारीच (1 जुलै) कामगारांना सतर्कतेचा इशारा देत खाणीत काम करायला जाऊ नका, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, काही कामगारांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केलं.
बँकॉकमध्ये असलेले बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांनी सांगितलं, की या दुर्घटनेचा जो व्हीडिओ मिळाला आहे, त्यामध्ये एका मोठ्या खड्ड्यात पाणी साचत असतानाच भूस्खलन होऊन चिखलाचा मोठा लोट कोसळताना दिसतो.
यानंतर त्या मोठ्या खड्ड्याचे काठ तुटतात आणि पाणी वेगाने खाली दरीत वाहू लागतं.
अग्निशमन दलाने जे फोटो प्रसिद्ध केलेत त्यात बचाव पथकाचे कर्मचारी मृतदेह ताडपत्रीत बांधून नेत असल्याचं दिसतात.
38 वर्षांचे माउंग खाईंग खाणीत काम करतात. रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांना मातीचा एक ढिगारा खाली पडताना दिसला आणि लोक 'पळा, पळा' ओरडत होते.
ते म्हणाले, "क्षणार्धात डोंगराखाली असलेले लोक गाडले गेले. छातीत धस्स झालं. लोक चिखलात रुतले होते. मदतीसाठी हाका मारत होते. पण कुणीच काही करू शकत नव्हतं."
खाणीतून मातीचा ढिगारा बाहेर आणून टाकला जातो. या ढिगाऱ्यातून जेड दगडाचे तुकडे मिळवण्यासाठी शेकडो लोक ती माती चाळत असतात.
या मलब्यामुळे मोठा उतार तयार होत असतो. शिवाय इथे झाडंही नाही. त्यामुळे इथे भूस्खलनाची भीती कायम असते.
बीबीसी प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार म्यानमारमध्ये गेल्यावर्षीच खाण उत्खननासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, नवीन नियम लागू करण्यासाठी सरकारडे पुरेसे कर्मचारी नसल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.
2015 सालीसुद्धा कचिनमधल्याच एका खाणीत भूस्खलन होऊन 90 कामगारांचा मृत्यू झाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)