You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना संकट : विषाणूच्या संसर्गापेक्षाही फेक न्यूजचा प्रादूर्भाव अधिक जीवघेणा? - बीबीसी रिअॅलिटी चेक
- Author, श्रुती मेनन
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच भारतात फेक न्यूज हीसुद्धा एक मोठी समस्या ठरत असल्याचं दिसून आलं.
भारतात अनेकदा असं घडताना दिसलं आहे की, लोक बातम्यांच्या विश्वासार्ह स्रोतांऐवजी कुठलीही शहानिशी न करता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात.
या चुकीच्या माहितीचा भारतातला अल्पसंख्याक समाज आणि मांसविक्रीसारख्या काही व्यवसायांवर त्याचा गंभीर परिणाम होतोय. रिअॅलिटी चेक टीमने अशा खोट्या बातम्या आणि त्याचा परिणाम ज्यांच्यावर झाला अशा लोकांचा अभ्यास केला.
धार्मिक तेढ वाढीस
भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्या खोट्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात त्यात धर्म हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे. कोरोना विषाणुच्या साथीच्या काळात तर हा धार्मिक द्वेष अधिकच जाणवला.
भारतातल्या 5 फॅक्ट चेक वेबसाईट्सने जानेवारी ते जून या सहा महिन्यात ज्या बातम्या फेक न्यूज असल्याचं सांगितलं, त्याचा आम्ही अभ्यास केला.
त्यांची ढोबळमानाने खालील चार प्रकारात वर्गवारी करता येऊ शकते.
- कोरोना विषाणूची साथ
- फेब्रुवारीमध्ये दिल्लीत झालेल्या दंगली
- नागरिकत्व दुरुस्ती कायदा
- मुस्लिम अल्पसंख्याकांविषयी केलेले दावे
या पाच फॅक्ट चेक वेबसाईट्सने गेल्या सहा महिन्यात तब्बल 1447 फेक न्यूजचा खुलासा केला. यातल्या 58% फेक न्यूज या कोरोनाशी संबंधित होत्या. कोरोना विषाणू संसर्गावर उपचार, लॉकडाऊनसंबंधीच्या अफवा आणि कोरोना विषाणू कसा पसरला, यासंबंधीच्या 'कॉन्सपीरसी थेअरीज'संबंधी या फेकन्यूज होत्या.
जानेवारी ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरलेली नव्हती तोपर्यंतच्या काळात भारतात सर्वाधिक फेक न्यूज या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंबंधीच्या होत्या.
हा नवा कायदा मुस्लिमांचं शोषण करणारा असल्याचं म्हणत अनेकांनी त्याविरोधात आवाज उठवला.
फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीतल्या मुस्लिमबहुल भागालगत दंगलीही झाल्या. त्यामुळेही फेक न्यूजला खतपाणी मिळालं.
यात बनावट व्हीडिओ, बनावट इमेज, जुने व्हीडिओ आणि फोटो संदर्भ बदलून वापरणे आणि खोटे मेसेज यांचा समावेश होता.
कोरोना भारतात पसरल्यावर काय घडलं?
आमच्या अभ्यासात असं आढळून आलं की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या फेक न्यूज पसरवण्यात आल्या होत्या.
दिल्लीत तबलिगी जमात या मुस्लिमांच्या एका संघटनेच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम अनुयायी जमले होते. त्यातले अनेक जण कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर त्यासंबंधीच्या अनेक फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या.
या संघटनेच्या सदस्यांमधले अनेक जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळू लागल्यानंतर या लोकांमार्फत जाणीवपूर्वक साथ पसरवली जात असल्याचे दावेही व्हायरल झाले होते.
मुस्लिम व्यावसायिकांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन देशातल्या अनेक भागातून करण्यात येत होतं.
भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे इमरान (नाव बदललेलं आहे) यांनी बीबीसीला सांगितलं की, एक मुस्लीम व्यक्ती ब्रेडवर थुंकत असल्याचा व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणारे मेसेज वाढले.
उत्तर प्रदेशात राहणाऱ्या इमरान यांनी म्हटलं, "या व्हीडिओनंतर ज्या गावांमध्ये आम्ही भाजी विकण्यासाठी नेहमीच जायचो तिथे जाण्याचीही भीती वाटू लागली होती."
इमरान आणि त्यांच्या समाजातले इतरही काही भाजीविक्रेते आता शहरातल्या भाजी मंडईतच भाजी विकतात.
अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या अल्पसंख्याक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे रितसर तक्रार करून मुस्लीम भाजी विक्रेत्यांना सोसायटीत प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या किंवा त्यांना व्यवसाय करण्यापासून रोखणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष झफरूल इस्लाम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "तबलिगी जमातशी संबंधित मुस्लीमच नाही तर देशभरात अन्य मुस्लिमांवरही हल्ले झाले."
मांसविक्रेत्यांना केलं लक्ष्य
कोरोना विषाणूविषयी ज्या फेक न्यूज भारतात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या त्यातल्या काहींमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, शाकाहारी व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण होत नाही.
खुद्द सरकारने अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी मोहीम सुरू केली.
या खोट्या व्हॉट्सअॅप मेसेज आणि सोशल मीडियामधल्या पोस्टचा या व्यवसायात असणाऱ्या मुस्लिम आणि मुस्लिमेतर लोकांवर परिणाम झाला.
केंद्र सरकारच्या विभागामार्फत केलेल्या चौकशीत आढळून आलं की, अशा फेक न्यूजमुळे एप्रिल महिन्यापर्यंत कुक्कुटपालन उद्योगाचं जवळपास 130 अब्ज रुपयांचं नुकसान झालं.
महाराष्ट्रातले मांसविक्रेते सुजित प्रभावळेंनी सांगितलं, "आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या. कारण त्यांचं करायचं काय, तेच आम्हाला कळत नव्हतं." विक्रीत 80 टक्क्यांची घट झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
तौहिद बारस्कर सांगतात, "मी व्हॉट्सअॅपवर मेसेज बघितला होता. त्यात म्हटलं होतं की, चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होते. त्यामुळे लोकांनी चिकन खाणंच बंद केलं."
अंडी आणि कोंबड्यांना खाऊ घातल्या जाणाऱ्या मक्याच्या विक्रीतही प्रचंड घट झाली. दिल्लीत अंड्यांच्या विक्रीमध्ये 30 टक्क्यांची घट झाली, तर मुंबईमध्ये अंड्यांचा खप 21 टक्क्यांनी घसरला. हैदराबादमध्ये तर अंड्यांच्या विक्रीमध्ये 52 टक्क्यांची घट झाली. ही आकडेवारी जानेवारी ते जूनच्या दरम्यानची आहे.
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं असल्याचा दावा करणारी पोस्टही प्रचंड व्हायरल झाली होती.
"चुकीची माहिती ही बऱ्याचदा ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो, अशा स्त्रोतांकडूनच येत असते. त्यामुळे त्याची शहानिशा न करता, वस्तुस्थिती न जाणून घेताच लोक त्यावर विश्वास ठेवतात," फॅक्ट चेकिंग वेबसाइट अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी म्हटलं.
हे नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)