You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गोपीचंद पडळकर शरद पवारांबद्दल असं का बोलले हे समजून घ्यायला हवं' - प्रवीण दरेकर #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. गोपीचंद पडळकर शरद पवारांबद्दल असं का बोलले हे समजून घ्यायला हवं - प्रवीण दरेकर
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, अशी टीका केली होती. याबाबत पडळकर यांची भूमिका खोलात जाऊन समजून घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत पडळकर यांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पडळकर यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. शरद पवार राजकीय विरोधक असले तरी शत्रू नाहीत, असंही फडणवीस म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी थोडीशी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर बहुजन समाजातील एक तरूण नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. त्यांच्या मनात हा उद्रेक कुठून आला. बहुजन समाजाला त्रास होतो, बहुजन समाजावर अत्याचार होतो, ही त्यांची भावना असू शकते. या सगळ्या विषयाच्या खोलात जाऊन समजून घेण्याची गरज आहे. तेव्हाच आपल्याला त्याबाबत स्पष्ट भूमिका मांडता येईल, असं दरेकर म्हणाले.
पडळकर यांनी पवारांवर केलेली टीका चुकीची आहे. त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं. त्यांच्या वक्तव्याशी पक्षाचं काहीही देणंघेणं नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची करायची की नाही हे पक्षच ठरवेल, असंही दरेकर पुढे म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
2. कोरोनामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी येणारा काही काळ गर्दी करणं टाळावं लागणार आहे. त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. याबाबत लोकमतने बातमी दिली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पंढरपूरची वारीही यावर्षी रद्द करून साधेपणाने पादुका घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील गणेशोत्सवसुद्धा साधेपणाने करण्याचा निर्णय इथल्या मंडळांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. संपूर्ण राज्यातही गणेशोत्सव अतिशय साधेपणाने करण्याबाबत ठरवलं जात आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
अशा स्थितीत दहीहंडी सोहळ्यातील गर्दी पाहता याबाबत गोविंदा पथकांनी दहीहंडी साजरी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार फक्त कृष्णजन्मोत्सव सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून साजरा करण्यात येऊ शकतो, असं समितीचे उपाध्यक्ष समीर पेंढारे यांनी सांगितलं आहे.
3. बियाणांमध्ये दोष आढळल्यास 'महाबीज'वरही कारवाई करू - दादा भुसे
गेल्या अनेक दिवसांपासून खतं आणि बियाणांबाबत तक्रारींमध्ये वाढ झाली असून दोषी असल्यास महाबीजवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. एकीकडे कोरोनाचं संकट असताना खत आणि बियाणांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे युरिया लिंकिंग करणाऱ्यांवर कृषि विभागाने लक्ष ठेवावे, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
गावात युरिया लिंकिंग करणारा विक्रेता सापडल्यास संबंधित दुकानासह कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल अशी भूमिका दादा भुसे यांनी घेतली आहे.
4. सहकारी बँकावर आता रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण
देशातील 1540 नागरी सहकारी बँका आणि बहुराज्यीय सहकारी बँका आता रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणार आहेत. म्हणजेच या बँका आता रिझर्व्ह बॅंकेच्या देखरेखीखाली असतील. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबतच्या निर्णयाला मान्यता दिली, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
गेल्या वर्षी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर या बँकांच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेकडून लक्ष ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत होती.
देशभरातील 1540 नागरी व बहुराज्यीय सहकारी बँकांमध्ये 8.6 कोटींहून जास्त ठेवीदारांचे पैसे आहेत. सुमारे 4.84 लाख कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत असून त्या नव्या निर्णयामुळे सुरक्षित राहतील, असं जावडेकर यांनी सांगितलं. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
याशिवाय मुद्रा शिशु कर्जाच्या व्याजदरात दोन टक्क्यांची सवलत, ओबीसी आयोगाला मुदतवाढ, 15 हजार कोटी रुपयांची पशूधन योजना आणि संशोधन क्षेत्रात नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटरची स्थापना या निर्णयांवरही केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.
5. केंद्र सरकारचा इंधनाच्या दरांना मुक्तद्वार - राहुल गांधी
केंद्र सरकारने इंधनाच्या दरांना मुक्तद्वार दिलं आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने कोरोना धोरण तसंच भारत-चीन तणावावरून केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. याबाबत लोकसत्ताने बातमी दिली आहे.
यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरून केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोल 79.76 तर डिझेलचा दर 79.88 रुपये प्रतिलीटर इतका होता. गेल्या 18 दिवसांत तेल उत्पादक कंपन्यांनी दररोज इंधनाचे दर वाढवले आहेत. आता डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झालं आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)