UPSC च्या परीक्षेत अपयशी झालात? मग या पाच गोष्टी नक्की करा

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काल (23 मे) युपीएससीचा निकाल जाहीर झाला. सोशल मीडियावर त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्टी वाहू लागल्या आहेत.

यशासारखं यश नाही हे जरी खरं असलं तरी त्यामागे अनेक अपयशी विद्यार्थी आहेत. त्यांचा विचार फारसा होताना दिसत नाही.

या निकालानंतर जे विद्यार्थी मुलाखतीत पास होऊ शकले नाही, त्यांना जास्त दु:ख झालं असेल. पण जे विद्यार्थी पूर्व आणि मुख्य परीक्षेत पास होऊ शकले नाहीत, त्यांच्या खपल्याही नक्कीच निघाल्या असतील. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपयश आलं तर खरंच काय करावं?

स्वीकार

सर्वप्रथम अपयशाचा खिलाडू पद्धतीने स्वीकार करावा आणि नेमकं हेच कठीण असते. पण त्याला पर्याय नाही. निकाल जाहीर झाला की तो बदलणार नसतो त्यामुळे स्वतःला बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. अपयश भोगून घ्या. सर्व प्रकारच्या भावनांचा निचरा होऊ द्या, जवळच्या व्यक्तींशी बोला, मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. थोडा ब्रेक घ्या आणि एकदा हे सगळं पार पडलं की मग अपयशाचा विचार करू नका. त्याचा काहीही फायदा होणार नसतो. हे सगळं बोलायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण आहे. पण ते करावं. त्यामुळे कोणतीही गोष्ट मनात राहत नाही. आपण मोकळे होते आणि भविष्याचं चित्र थोडं स्पष्ट दिसू लागतं.

विश्लेषण

निकालांचे कवित्व संपल्यावर गुणतालिका येतील. ती नीट पहा. कमी मार्क मिळाले तर ते का मिळाले याचं विश्लेषण करा. मुळात ती गुणतालिका त्रयस्थपणे पहा. त्यात भावनिकरीत्या गुंतून जाऊ नका.

अगदी कमी फरकाने पोस्ट गेली असेल तर दु:खाचा पुन्हा एकदा उमाळा येण्याची शक्यता आहे. तो टाळा. आपण यादीत नाही हे स्वीकारा. पुढे काय सुधारणा करता येईल याचा विचार करा. स्वत:बद्दल कठोर भूमिका घ्या. थोडक्यात काय तर भविष्याचा विचार करा.

'जलो मगर दीप के समान'

स्पर्धा परीक्षा ही प्रकिया वेळखाऊ आहे याचा आतापर्यंत अंदाज तुम्हाला आला असेलच. पूर्व, मुख्य, तर कुणी मुलाखतीच्या म्हणजे अंतिम टप्प्यातून बाहेर पडतो. तिन्ही प्रक्रियेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया ही त्रासदायकच असते. निकालाच्या दिवशी विशेषत पूर्व आणि मुख्य परीक्षेतून बाहेर पडलेल्यांना एक प्रकारची उत्सुकता आणि एक प्रकारचा गंड निर्माण होतो. नकळत तुलना होते आणि अभ्यासावरचे लक्ष उडतं. तेव्हा आपले कोणी मित्र मैत्रिणी यादीत असल्यास त्यांचे मनापासून अभिनंदन करा आणि पु्न्हा अभ्यासाला लागा.

कोण कसा लायक नव्हता, कोण फक्त आरक्षणाच्या भरवशावर तिथपर्यंत पोहोचला आहे, कोणाचा वशिला होता का? यावर मित्र-मैत्रिणींत, व्हॉट्स अप ग्रुपवर चर्चा टाळा. त्याने फक्त मानसिक त्रास होतो. त्यापेक्षा पुढील वर्षी आपला त्या यादीत कसा समावेश होईल याचा विचार करा, त्याची आखणी करा.

हल्ली एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे काही लोक तुच्छतेने पाहतात. तुम्ही अपयशी झालात की ही लोक पुन्हा त्यांचा जीभेचा पट्टा सुरू करतात. पण त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

अनुकरण.. पण जपून..

आता जे विद्यार्थी यादीत आले आहेत, त्यांचा सत्कार समारोह होईल. त्यात ते टिप्स सांगतील, युट्यूबवर व्हीडिओ अपलोड करतील, वर्तमानपत्रात लेख लिहितील. त्यात फार स्वत:ला गुंतवून घेऊ नका, प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं असतं, प्रत्येकाची अभ्यासाची शैली वेगळी असते. त्याचा फायदा तुम्हाला होईलच असं नाही. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करा. खूप व्याख्यानं ऐकू नका. त्यामुळे गोंधळून जाण्याची शक्यता निर्माण होते. पहिला प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे.

तुम्ही आधीच जर व्यवस्थित, नियोजनबद्ध अभ्यास करत असाल तर त्यांच्या एखाद दोन गोष्टी अंमलात आणण्यास हरकत नाही. पण आपली संपूर्ण युद्धपद्धती बदलू नये.

मंदीत संधी

एकदा एक मानसशास्त्रज्ञ त्यांच्या एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेच्या एका विषयात नापास झाले. त्यांना साहजिकच खूप दु:ख झाले. आपण आता आयुष्यातूनच उठलो अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले की , "तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या परीक्षेच्या एका विषयात एकदा नापास झाला आहेस, पण याचा अर्थ तू आयुष्यात नापास झालेला नाहीस." (हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचा) तेव्हा कोणत्याच टप्प्यावरचे अपयश अंतिम नसते., अंतिम असते ते यश, जे आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नक्कीच मिळेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)