You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र HSC रिझल्ट : कधी आणि कुठे पाहाल 12 वीचा निकाल?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
राज्य शिक्षण मंडळाचे म्हणजेच SSC आणि HSC बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना आहे. दरवर्षी जूनमध्ये जाहीर होणाऱ्या निकालांना यंदा कोरोनामुळे विलंब झाला आहे.
दरवर्षी मेअखेर बारावीचा HSC बोर्डाचा निकाल जाहीर केला जातो. बारावीचा निकाल 16 जुलै रोजी लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाइन दिसू शकेल असं HSC बोर्डाने जाहीर केलं आहे.
बारावीचा निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in. या संकेतस्थळांवर पाहता येईल.
तर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावीचा SSC बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येतो.
यंदा बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे, निकाल तयार करण्याच काम सध्या वेगान सुरू असल्याचं बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितलं आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
यावर्षी 3 मार्चला दहावीची परीक्षा सुरू झाली. दहावीचा शेवटचा पेपर हा भूगोलाचा होता. 23 मार्चला होणारा हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, तर नंतर तो रद्दच करण्यात आला. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत पार पडली.
यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली, तर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीची परीक्षा दिली.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दहावी आणि बारावीच्या परीक्षांची उत्तरपत्रिका तपासणी सुरू होण्याआधीच राज्यात लॉकडाऊन लागू झाला होता. शाळा बंद आणि शिक्षकही घरी बंद असल्याने उत्तरपत्रिका कशा तपासायच्या असा प्रश्न निर्माण झाला.
निकालास उशीर का?
यावर्षी दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम नेहमीपेक्षा जवळपास 20-25 दिवस उशिराने सुरू झाले. त्यातही शिक्षक घरी उत्तरपत्रिका तपासत असल्याने शाळांमधून प्रत्येक शिक्षकाच्या घरी उत्तरपत्रिका सुरक्षितपणे पोहोचवण्यात बराच वेळ गेला.
जूनचा पहिला आठवडाही उलटून गेल्याने निकाल जाहीर होण्याच्या अनेक तारखांबाबत अंदाज व्यक्त केला जातोय. याविषयी आम्ही राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांना विचारले असता बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "लॉकडाऊनमुळे काही भागांमध्ये उत्तरपत्रिका पोहचण्यास विलंब झाला. यामुळे सर्व प्रक्रिया यंदा उशिराने सुरू झाली."
"विद्यार्थी,पालकांनी कोणत्याही तारखांवर विश्वास ठेऊ नये. आम्ही अधिकृतपणे निकालाची तारीख जाहीर करु," असं सांगत शकुंतला काळे यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन विद्यार्थी, पालकांना केले.
दरवर्षीप्रमाणे आधी बारावीचा नंतर दहावीचा निकाल लावण्याचा प्रयत्न बोर्डाकडून करण्यात येत आहे असंही त्या म्हणाल्या.
शिक्षकांना उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना
लॉकडाऊनमुळे यावर्षी दहावी,बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना घरी तपासण्याची मुभा देण्यात आली होती. तोपर्यंत उत्तरपत्रिका पोस्टाच्या कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक शाळेत उत्तरपत्रिका पोहचवल्या गेल्या.
"बोर्डाकडून शिक्षकांना तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसे पत्रक बोर्डाकडून काढण्यात आले असून निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षकांनाही उत्तरपत्रिका लवकर देण्याचा आग्रह केला जात आहे," असं शिक्षक शिवनाथ दराडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
दहावीच्या परीक्षेला सुरुवातीला मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा विषयांची परीक्षा झाली. त्यावेळी कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात पसरला नव्हता. त्यामुळे या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम तुलनेने लवकर मार्गी लागले.
"दहावीचा शेवटचा पेपर इतिहासाचा होता. त्यावेळी मुंबई,पुण्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत होती. त्यामुळे इतिहासाच्या उत्तरपत्रिका जवळपास महिनाभर परीक्षा केंद्रातच होत्या," अशी माहिती दराडे यांनी दिली.
बारावीचा निकाल आधी लागणार ?
दरवर्षी दहावीच्या निकालाआधी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येतो. तसंच बारावीची परीक्षा पार पडली तेव्हा राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला नव्हते. त्यामुळे काही अपवाद वगळता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका वेळेत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पोहोचल्या.
बोर्डाकडूनही बारावीचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिलीय.
"बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी तपासल्या आहेत. त्या नियामकांकडेही सुपूर्द केल्या आहेत. 50 टक्के उत्तरपत्रिका या नियामकांकडून बोर्डात देण्यात आल्या आहेत," अशी माहिती महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
मात्र कंटेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या शिक्षकांना अनेक समस्या आहेत. विशेषत: मुंबईतील धारावी, मुंब्रा, वरळी या परिसरात राहणाऱ्या शिक्षकांना उत्तरपत्रिका देण्यात अडचणी आल्या होत्या.
उत्तरपत्रिका तपासण्यात कोणत्या अडचणी?
कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका आणि लॉकडाऊन या दोन कारणांमुळे यंदा दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत जाहीर होऊ शकत नाहीत.
राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच एसएससी आणि एचएससी बोर्डाला आणि शिक्षकांना काही अपरिहार्य अडचणी आल्या. पहिली अडचण म्हणजे शाळा बंद असल्याने उत्तरपत्रिका कुठे तपासायच्या असा प्रश्न होता.
नाईलाजाने घरीच उत्तरपत्रिका तपासण्याची परवानगी शिक्षण विभागाने शिक्षकांना दिली. पण यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला.
"परीक्षा केंद्रावरुन शाळांमध्ये उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी प्रत्येक भागात वाहनाची उपलब्धता नव्हती. त्यामुळे मुळात शिक्षकांच्या हाती उत्तरपत्रिका पोहचण्यातच विलंब झाला. काही शिक्षक हे गावी गेल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि तपासल्यानंतर केंद्रात पोहचवण्यात अडचणी आल्या," अशी माहिती महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे सचिन प्रशांत रेडिज यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
कसा लावला जातो निकाल ?
परीक्षा झाली की, लगेच दुसऱ्या दिवसापासून उत्तरपत्रिका शिक्षकांकडे तपासणीसाठी जातात.
तीन टप्प्यात उत्तरपत्रिका तपसणीचे काम केले जाते. पहिल्या फेरीत त्या विषयचा शिक्षक (परीक्षक) पेपर तपासतात. त्यानंतर उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होते जी नियामक (कंट्रोलर) करतात.
तिसऱ्या टप्प्यात निवडक उत्तरपत्रिका पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा तपासल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत. पण ते काठावर पास होऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना शेवटची संधी मिळावीम्हणून मुख्य नियामक असे निवडक पेपर पुन्हा तपासतात.
राज्यातल्या सर्व बोर्डाच्या कार्यालयात त्या विभागाचे निकाल पोहचवले जातात. यानंतर बारकोडच्या माध्यमातून संगणकीय पद्धतीने सर्व विषयांचा निकाल लावला जातो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)