मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 हजारांवर, वुहानलाही टाकलं मागे

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 51 हजारांवर पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

सध्या मुंबईत 51 हजार 100 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे मुंबईतल्या 1 हजार 760 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 हजार 943 जण कोरोनावरील उपचारानंतर बरे झाले आहेत.

केवळ महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेतच नव्हे, तर देशातील इतर राज्यांच्या तुलनेतही मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे.

मुंबईत कोरोनाच्या प्रसाराचा वेद मंदावण्यासाठी सरकार शक्य तेवढे प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. त्यासाठी प्रशासनानं शहरातल्या वेगवेगळ्या भागात कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यात आले आहेत. शिवाय, लॉकडाऊनही काटेकोरपणे राबवलं जातंय.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी दहिसर आणि मुलूंड भागातल्या जम्बो कोव्हिड केअर हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथील परिस्थितीची पाहणी केली.

मुंबईत का वाढले रुग्ण?

मुंबईतल्या दहिसर भागातील शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बोरीवली, दहिसर भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालीये. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांमध्ये लॉकडाऊनबाबत फारसं गांभीर्य नाही. लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरतायत, पोलिसांकडून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही.

"उत्तर मुंबईच्या भागात मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. यात मोठ्या संख्येने मजूर वर्ग राहतो. लॉकडाऊनमुळे मजूर अस्थिर झाले, मोठ्या संख्येने रस्त्यांवर आले. योग्य पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, त्यामुळे झोपडपट्टीत व्हायरसचा शिरकाव झाला आणि मोठ्या संख्येने व्हायरस पसरला," असं म्हात्रेंनी म्हटलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक नेते नयन कदम यांनी म्हटलं, "दक्षिण मुंबई ऑर्गनाइज्ड आहे. मात्र उत्तर मुंबईत तशी परिस्थिती नाही. प्रशासनाचं दुर्लक्ष, लोकांसमोर हतबल झालेलं पोलीस प्रशासन, ही देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची प्रमुख कारणं आहेत."

गेल्या अनेक वर्षांपासून दहिसरमध्ये आरोग्यसेवा देणारे डॉ. संजय वाणी सांगतात, "लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात लोकांनी काळजी घेतली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून लोकं मोठ्या संख्यने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. आपल्या भागात जास्त रुग्ण नाहीत, आपल्याला काहीच होणार नाही असा लोकांचा गैरसमज आहे. त्यामुळे लोकांनी आता दुर्लक्ष करणं सुरू केलंय. या निष्काळजीपणामुळे या भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढलीये.

"आधी कोव्हिडग्रस्त रुग्णांची संख्या कमी होती. मात्र आता रोज एक-दोन रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. झोपडपट्टीत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. पालिका प्रशासनाने या झोपडपट्यांकडे वेळीच लक्ष द्यावं. योग्य उपाययोजना केल्यानाहीत तर, परिस्थिती आटोक्यात येणार नाही," असं डॉ. वाणी म्हणाले.

सरकार काय उपाय करतंय?

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचसोबतच लो-रिस्क कॉन्टॅक्टची फोनद्वारे माहिती घेतली जातेय.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतल्या 5 हजार CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक विभागावर लक्ष ठेवण्यात येतंय. तसंच मुंबईत महापालिकेच्या 210 हेल्थ पोस्ट सुरू करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर पालिकेच्या 186 डिस्पेन्सरीदेखील आहेत, म्हणजेच साधारण प्रत्येक किलोमीटरमागे एक हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलंय.

झोपडपट्टीतील रहिवाशांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्न-पाण्याची व्यवस्था. डॉ. अनिल पाचणेकर म्हणतात, "झोपडपट्टीसारख्या परिसरात प्रशासनाने डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवं, गरिबांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायला हवी. लोकांमध्ये तुम्ही सुरक्षित आहात याची भावना निर्माण करायला हवी, जेणेकरून लोक घराबाहेर पडणार नाहीत आणि संसर्गाचा मोठा धोका मुंबई शहरात निर्माण होणार नाही."

"कोव्हिड-19च्या जनजागृतीमुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण डॉक्टरांकडे येत आहेत. सध्याच्या स्थितीत मी रोज 200पेक्षा जास्त रुग्ण तपासतोय. व्हायरल ताप आणि कोरोनाची लक्षणं मिळती-जुळती आहेत, त्यामुळे डॉक्टरांना आपल्या अनुभवावरून निदान करावं लागतं. ताप बरा होत नसेल तर त्यांनी छातीचा एक्स-रे काढून सरकारी रुग्णालयात पाठवलं पाहिजे," असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेले डॉ. पाचणेकर देतात.

पूर्व उपनगरांप्रमाणे मध्य मुंबईच्या वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवी या भागातही झोपडपट्टीमध्ये कोरोना पसरल्याचं चित्र पहायला मिळतंय. याबाबत शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे म्हणाले, "वरळी आणि आदर्शनगर या भागात कोरोना व्हायरस कसा पसरला, याबाबत पालिका आणि आरोग्य यंत्रणा अद्यापही माहिती घेत आहेत. कोरोनाची लागण कोणामुळे झाली याचा शोध अजूनही सुरू आहे. कोळीवाड्यातील 170 तर आदर्शनगर मधील 30 लोकांना पालिकेने निरीक्षणाखाली ठेवलं आहे."

"गुरूवारी वरळीतील जिजामाता नगरचा भाग असलेल्या रमाबाई नगरमध्ये एका पालिका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेने रमाबाई नगर सील करून घरोघरी चौकशी सुरू केली आहे. पालिकेने सील केलेल्या परिसरातील लोकांना अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय."

ज्या भागांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले, त्यामध्ये कंटेनमेंट ऑफिसरची नेमणूक करण्यात आलीये. कंटेनमेंट झोनमधील प्रत्येक गोष्टीवर पालिका अधिकाऱ्यांचं लक्ष आहे.

मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील इंटर्न डॉक्टरांना कोव्हिड-19 रुग्ण कसा हाताळायचा याचं ट्रेनिंग देण्यात येत आहे. जेणेकरून गरज पडल्यास यांचीदेखील मदत घेता येईल

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)