देश अनलॉक : पण कोरोना संसर्गाचं काय?

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

देशभरात 3 जून आणि तसंच 8 जूनपासून लॉकडाऊन शिथिल झालं आहे. पण त्याचवेळी कोरोना संसर्गाचं प्रमाणही वाढत आहे. त्यावर नेमका काय परिणाम होईल?

"आपली परिस्थिती आताच इतकी वाईट आहे. हॉस्पिटल्स पेशंट्सनी भरून वाहताहेत. उद्या संसर्ग अधिक पसरला तर काय होईल...," गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने व्यक्त केलेली ही काळजी.

एकीकडे अशी काळजी व्यक्त करण्यात येत असतानाच दुसरीकडे आपल्याकडे आका लॉकडाऊन शिथील करायला सुरुवात झाली आहे.

कन्टेन्मेंट झोनसाठी घालण्यात आलेले नियम मात्र कायम आहेत. पण आता भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात लोक घरांतून बाहेर पडून पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून दुकानात गोष्टींवर बसलेली धूळ झटकत व्यापारी कामाला लागले आहेत. नोकरदारांनी ऑफिसला जायला सुरुवात केलीय.

लॉकडाऊनचा हा काळ स्थलांतरित मजूर-कामगारांसाठी त्यांच्या आयुष्यात सगळ्यांत कठीण कालखंड ठरला. भारतातल्या जवळपास अडीच लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे तर 7,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेलेला आहे. विमानमार्गे भारतात दाखल झालेला हा विषाणू आता गावांपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या येत आहेत.

सतत 2 महिने कोरोनाच्या विरुद्ध लढल्यानंतर आता कोरोना वॉरियर्स मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकू लागल्याचीही लक्षणं दिसत आहेत.

पण कोरोनाच्या संसर्गाचा 'पीक' (Peak) अजूनही आलेला नाही. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा संसर्ग कळस गाठेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

मग भारताच्या शहरांपासून गावांपर्यंत सगळीकडे कोरोना पसरत असताना यासाठी लढणाऱ्या सरकारी आणि खासगी संस्थांची यंत्रणा भविष्यातल्या आव्हानांसाठी किती तयार आहे?

प्रशासनाची स्थिती

वुहानमधल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन परतणारं विमान उतरल्यापासूनच आरोग्य खात्यापासून ते जिल्हा स्तरावरच्या संस्थांपर्यंत सगळेच अभूतपूर्व रीतीने काम करत आहेत.

अधिकारी वा आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत अहोरात्र काम केल्याच्या अनेक घटना गेल्या दोन महिन्यांत पाहायला मिळाल्या.

अनेक महिला अधिकाऱ्यांनी बाळाला जन्म दिल्याच्या काही दिवसांतच पुन्हा काम करायला सुरुवात केली. तर काही अधिकाऱ्यांनी काम करत असल्याने आपल्या नवजात बाळाला काही आठवडे पाहिलं देखील नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये कोरोनाची वॉर रूम सांभाळणारे IPS अधिकारी गौरांग राठी यापैकीच एक. पुढच्या काळासाठी आपली टीम किती सज्ज आहे याविषयी त्यांनी बीबीसीला माहिती दिली.

ते म्हणाले, "कोरोना व्हायरस विरुद्धच्या या लढाईसाठी वॉर रूम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झालेत. जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठीच्या प्रयत्नांत गेल्या दोन महिन्यांत कोणतीही उणीव राहू दिली नाही."

"गेल्या दोन महिन्यांमध्ये एकही क्षण असा नव्हता जेव्हा मी किंवा माझ्या सहकाऱ्यांना क्षणभरही उसंत मिळाली आहे. रोज नवीन आव्हानं समोर उभी ठाकतायत. आधी या संकटासाठी या शहराला सज्ज करायचं होतं, मग लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, मग प्रवासी मजुरांच्या येण्याजाण्याचा प्रश्न उभा राहिला. असे अनेक क्षण आले जेव्हा मला माझ्या साथीदारांचं मनोधैर्य वाढवावं लागलं, कारण ते करणं अतिशय गरजेचं होतं."

लॉकडाऊन हटवल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी यंत्रणा किती सज्ज आहे, हे विचारल्यानंतर गौरांग राठी म्हणाले, "कोरोनाच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतेय हे खरं आहे. आणि अशात आता लॉकडाऊन उठवल्याने आव्हान वाढेल. पण स्वच्छतेबाबत आम्ही लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. म्हणूनच आता गेल्या दोन महिन्यांपासून राबवण्यात येणाऱ्या सफाईविषयक नियमांचं पालन करणं आता लोकांची जबाबदारी आहे. कारण या कोरोना व्हायरसवर एकत्र लढूनच विजय मिळवला जाऊ शकतो."

वाराणसी हे भारतातल्या त्या शहरांपैकी एक आहे जिथे देवळं आणि मशीदींमध्ये मोठी गर्दी होते. म्हणूनच देशभरातल्या जिल्ह्यांमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी पुढचे काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांमध्ये मुंबई आणि दिल्लीसह अनेक ठिकाणच्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 28 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर 1479 पोलिसांना संसर्ग झालेला आहे. एका पोलिसाचा मृत्यू तर कोव्हिड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याच्या काही तासांतच झालाय. दिल्लीमध्ये आतापर्यंत 445 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 3 पोलिसांचा मृत्यू झालाय.

आरोग्य यंत्रणेची परिस्थिती

कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेतल्या अनेकांना संसर्ग झाल्याच्या बातम्या येत आहेत. देशातलं प्रतिष्ठेचं हॉस्पिटल मानलं जाणाऱ्या एम्समध्ये कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या 206 पेक्षा जास्त झाली आहे. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे राजकुमार (नाव बदलण्यात आलं आहे) हॉस्पिटलमधली परिस्थिती बिघडत असल्याचं सांगतात.

ते म्हणतात, "कोणी काहीही म्हणो, कितीही मोठे दावे करोत. पण आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या आम्हाला कोणी विचारलं तर आतली परिस्थिती लक्षात येईल. जर तुम्ही माझ्या नावाने हे छापत असता, तर मी देखील सांगितलं असतं की सगळं उत्तम आहे म्हणून. पण खरं बोलायचं झालं तर परिस्थिती अशी आहे की आम्ही सगळे पर्याय वापरून पाहत आहोत. पण हे अंधारात चाचपडण्यासारखं आहे. सरकार एकदा एक गाईडलाईन पाळायला सांगतं, तर कधी दुसरी."

"तुम्ही विचारताय, किती बेड्स उपलब्ध आहेत. पण परिस्थिती अशी आहे की बेड्सची जुळवाजुळव करण्यासाठीच गाईडलाईन्स बदलल्या जातायत. आधी क्वारंटाईनचा काळ 14 दिवस होता. तीन टेस्ट व्हायच्या. शेवटचं सँपल निगेटिव्ह आल्यानंतरच त्या माणसाला घरी जाऊ दिलं जाई. आता पहिल्या टेस्टनंतर त्या व्यक्तीत काही लक्षणं दिसली नाहीत, तर त्याला घरी पाठवण्यात येतं."

"असं करून कसं चालेल, जर यापैकी कोणी घरी गेल्यानंतर संसर्ग पसरला तर? याचं उत्तर कोणीही देत नाही. म्हणूनच सरकारने पत्रकार परिषद घेणंही बंद केलंय."

"हॉस्पिटल्समध्ये अधिकारी त्यांचा राग डॉक्टर्सवर काढतात, डॉक्टर्स हा राग नर्सिंग स्टाफवर काढतात. आणि ते त्यांच्या हाताखालच्या लोकांवर. गेले दोन महिने सतत काम करून लोक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकलेत."

"PPE सूट घालून काम करणं किती कठीण असतं याची कल्पनाही कोणाला नसेल. हा सूट घालून आम्ही सहा तासांपेक्षा जास्त काळ पाणीही न पिता, काहीही न खाता सतत काम करतो. उकाडा वाढल्याने काम करणं आणखीनच कठीण होतं. कारण तुम्ही पाणी प्यायलं नाहीत, तरी उकाड्यामुळे तुम्हाला PPE सूटच्या आत घामाची आंघोळ होते. गेल्या दोन महिन्यांत अनेकांचं वजन कमी झालंय."

"लॉकडाऊन उघडणं हे देशाच्या दृष्टीने ठीक आहे. पण येत्या काळात हॉस्पिटल्सची परिस्थिती काय आहे हे आम्हालाच ठाऊक आहे."

मुंबईतल्या हॉस्पिटल्समधली परिस्थिती तर लॉकडाऊन शिथील करण्याच्या आधीच ढासळताना दिसतेय. मुंबईलच्या हॉस्पिटल्समधली परिस्थिती किती वाईट आहे हे गेल्या काही दिवसांत मीडियामध्ये आलेल्या बातम्यांमधून पाहायला मिळालं होतं.

ब्लूमबर्गने असंच एक मुंबईतल्या हॉस्पिटलमधली परिस्थिती दाखवणारं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मुंबईतल्या एका रुग्णालयात रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्याचा उल्लेखही या बातमीत आहे. यासोबतच KEM हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये मृतदेह ठेवण्यात आल्याचा दावा करणारे फोटोही प्रसिद्ध झाले होते.

छोटी शहरं आणि गावांमधली वाईट परिस्थिती

अनेक स्थलांतरित मजूर आपल्या गावी परत गेल्याने आता या व्हायरसचं संक्रमण ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं असण्याची शक्यता आहे. मुंबईतून परताणारे 75% मजूर आणि दिल्लीहून परतणारे 50% मजूर कोरोनाबाधित असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

किमान 25 लाख कामगार दुसऱ्या राज्यांतून उत्तर प्रदेशात आल्याचं तिथल्या सरकारने म्हटलंय. अनेक मजूर पायी चालतही आपल्या गावी दाखल झालेयत. अशात गावांमध्ये हा संसर्ग पसरला तर सरकारसमोर नवीन आव्हानं उभी राहतील. उत्तर प्रदेशाप्रमाणेच बिहारमध्येही अनेक मजूर पोहोचले आहेत.

बिहारच्या कोरोना हॉस्पिटल (NMCH) मधल्या एका ज्युनियन डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीचे प्रतिनिधी नीरज प्रियदर्शी यांना सांगितलं, "आता सुरुवातीसारख्या अडचणी नाहीत. PPE किट्स आणि इतर सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहेत. पण गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या 3200च्या पलिकडे गेलीय. आता नवीन समस्या उभ्या राहणार आहेत."

कोरोना हॉस्पिटलचे डॉक्टर्स सांगतात, "कोणतीही परिस्थिती आली तरी आपल्याला काम करायचंच आहे, हे आम्ही स्वतःला समजवलंय."

कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यातून आपल्या गावी परतणाऱ्यांमुळे दक्षिण भारतातही संसर्ग पसरतोय.

दक्षिण भारतातली परिस्थिती - इमरान कुरेशी

कर्नाटकमधल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "या लोकांमध्ये संसर्ग कुठून आला हे शोधणं आता शक्य नाही. हे लोक राज्यात आले तेव्हापासून आम्ही हे ट्रेस करत आहोत."

कर्नाटकच्या मंड्या भागातली परिस्थिती चिंताजनक आहे. कारण, "मंड्यामध्ये आलेले बहुतेक जण हे धारावी किंवा आसपासच्या परिसरातले आहेत. इथे संसर्गाचा स्रोत तपासणं अशक्य आहे."

तामिळनाडूमध्येही असंच काहीसं झालंय. इरोडमध्ये एका ड्रायव्हारला संसर्ग झाला. हा संसर्ग कुठून झाला हे शोधायचा प्रयत्न केल्यानंतर त्याचं मूळ दक्षिण भारतातल्या सगळ्या मोठ्या मंडईजवळच्या एका न्हाव्याच्या दुकानात आढळलंय. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात न्हाव्याचं हे दुकान लपूनछपून सुरू होतं.

कधी येईल संसर्गाचा कळस

भारतामध्ये अद्याप कोरोनाच्या संसर्गाने कळस गाठला नसल्याचं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी म्हटलंय.

या पीक (Peak) येईल तेव्हा किती लोकांना संसर्ग होईल याविषयीचा अंदाज लावता येणार नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. पण जून किंवा जुलैमध्ये हा पीक येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. या सगळ्या धोक्याच्या इशाऱ्यांदरम्यान दुसरीकडे लॉकडाऊन उठवला जातोय.

भारतातली रुग्णसंख्या सध्या अडीच लाखांच्या जवळ आहे. म्हणजे या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण साधारण 2.5% आहे. येत्या काळात यामुळे आणखी किती जणांचा बळी जाईल हे सांगणं कठीण आहे. यावरची लस सध्या उपलब्ध नाही.

त्यामुळे सध्या एकच उपाय आपल्या हातात आहे. तो म्हणजे - खबरदारी.

ते वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)