टिकटॉक व्हीडिओमुळे मुलाला असे सापडले हरवलेले वडील

टिकटॉक व्हीडिओ

फोटो स्रोत, BBC TELUGU

टिकटॉकने आज तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. टिकटॉकवरचे व्हीडिओ हे अनेकदा टाइमपास या सदरातले असतात. त्यामुळे त्याकडे फार गांभीर्यानं पाहिलं जात नाही. मात्र अशाच टिकटॉकने व्हीडिओमुळे एका तरुणाला त्याचे वडील सापडले.

कोरोना संकटाच्या काळात गरिबांची मदत करण्याचं आवाहन करण्यासाठी तयार केलेल्या एका व्हिडिओमुळे ताटातूट झालेल्या वडील-मुलाची भेट झाली.

मूळचे तेलंगणाचे असलेले आर. व्यंकटेश्वरलू गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता होते. मात्र, त्यांच्या घरापासून तब्बल 2 हजार किलोमीटर दूर असलेल्या पंजाब राज्यातल्या लुधियाना शहरात ते असल्याचं एका व्हिडिओत दिसलं आणि व्यंकटेश्वरलूच्या मुलाच्या मित्राने त्यांना ओळखलं. मग कुटुंबीयांनी पंजाब पोलिसांशी संपर्क करत वडिलांना शोधून काढलं.

व्यंकटेश्वरलू हरवले कसे?

आर. व्यंकटेश्वरलू यांना नीट ऐकू येत नाही आणि नीट बोलताही येत नाही. तेलंगणातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं आयुष्य गेलं. त्यांना पत्नी आणि पाच मुलं आहेत. मोलमजुरी करून ते गुजराण करत.

दोन वर्षांपूर्वी 2018 च्या एप्रिल महिन्यात त्यांना कामासाठी दुसऱ्या गावाला जायचं होतं. त्यांनी एका ट्रकला लिफ्ट मागितली आणि दुसऱ्या गावाला जायला निघाले.

व्यंकटेश्वरलू यांचा मुलगा पेड्डीराजू यांनी बीबीसी तेलुगुशी बोलताना सांगितलं, "माझ्या वडिलांना झोप लागली आणि ते ट्रकमध्ये आहेत, हे ट्रक ड्रायव्हरच्या लक्षातच राहिलं नाही. बरंच पुढे गेल्यानतंर त्याच्या लक्षात आलं आणि त्याने माझ्या वडिलांनी तिथेच रस्त्यात सोडलं."

कोरोना
लाईन

रस्ता अनोळखी होता. त्यामुळे व्यंकटेश्वरलू यांनी घरी परतण्यासाठी आणखी एका ट्रक ड्रायव्हरला लिफ्ट मागितली आणि ते त्या ट्रकमध्ये बसले. मात्र, अनेक तासांनंतर त्यांच्या लक्षात आलं की, हा ट्रक विरुद्ध दिशेने चाललाय.

त्या ट्रक ड्रायव्हरनेही त्यांना तिथेच सोडलं. मात्र, तोवर लुधियाना आलं होतं. पेड्डीराजू यांनी सांगितलं, की आम्ही पोलिसांत तक्रार केली आणि वडिलांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला होता.

कसे सापडले व्यंकटेश्वरलू?

व्यंकटेश्वरलू यांचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. टिकटॉक व्हीडिओमुळे त्यांचा शोध लागला.

कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. मात्र, त्यामुळे प्रवासी मजूर आणि गरिबांचे अतोनात हाल होत आहेत. ही अडचण बघूनच पंजाब पोलिसात शिपाई असलेले अजैब सिंह रोज लुधियानातल्या रस्त्यांवर फिरून प्रवासी मजूर आणि गरिबांना अन्न वाटप करतात.

टिकटॉक व्हीडिओ

फोटो स्रोत, BBC Telugu

अजैब सिंह यांचं टिकटॉक चॅनलही आहे. टिकटॉकवर त्यांचे 8 लाख फॉलोअर्स आहेत. टिकटॉकवरून ते आपल्या समाजकार्याचे व्हीडिओही शेअर करतात.

मार्चमध्येही त्यांनी असाच एक व्हिडिओ अपलोड केला होता. लुधियानातल्या पुलांखाली राहणाऱ्या गरिबांना अन्नदान करत असल्याचा तो व्हीडिओ होता.

लुधियानातला हा व्हीडिओ शेकडो किलोमीटर दूर असलेल्या तेलंगणात पेड्डीराजूच्या मित्राने बघितला आणि व्हीडिओमध्ये ज्या गरिबाला मदत केली ते पेड्डीराजूचे बेपत्ता वडील असल्याचं त्याच्या चटकन लक्षात आलं.

लाईन

लाईन

त्याने तातडीने पेड्डीराजूला तो व्हीडिओ दाखवला.

त्यानंतर पेड्डीराजू यांनी लुधियाना पोलिसांशी संपर्क केला. लुधियाना पोलिसांनीही तातडीने कारवाई करत व्यंकटेश्वरलू यांना शोधून काढलं आणि पेड्डीराजू यांना व्हीडिओ कॉल केला.

पेड्डीराजू सांगतात, "आम्ही पहिल्यांदा एकमेकांना बघितलं आणि दोघांनाही रडू कोसळलं. इथे येऊन मला घेऊन जा, असं ते म्हणाले."

टिकटॉक व्हीडिओ

फोटो स्रोत, BBC Telugu

लॉकडाऊन उठल्यानंतर लुधियानाला जाऊन वडिलांना घेऊन ये, असा सल्ला पोलिसांनी दिला.

मात्र, पेड्डीराजू म्हणाले, "इतका वेळ थांबणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे मी पोलिसांची परवानगी काढली."

परवानगी मिळाल्यानंतर आठवड्याभरात पेड्डीराजू लुधियानाला पोचले आणि तब्बल दोन वर्षांनंतर त्यांची आपल्या वडिलांशी भेट झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)