कोरोना अंत्यसंस्कार : पिंपरी-चिंचवड येथील स्मशानभूमीत मी फोटो स्टोरी करायला गेलो तेव्हा....

    • Author, देवदत्त कशाळीकर
    • Role, मुक्त छायाचित्रकार

सावधान: काही दृश्यं आणि मजकूर तुम्हाला विचलित करू शकतात.

डोळ्यांच्या डॉक्टरकडे नंबर वाढलाय का, हे विचारायला गेलो असताना सकाळी 10.40 ला एका मित्राचा फोन आला. त्याने बातमी दिली की, आज सकाळीच कोरोनामुळे एक मृत्यू झालाय.

मृत व्यक्तीचा सख्खा भाऊ डॉक्टर आहे आणि बॉडी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून थोड्याच वेळात निघेल.

त्या डोळ्याच्या डॉक्टरकडून मी तातडीने निघालो. असं अचानक पळून जाताना तिथल्या लोकांना काय वाटलं असेल, याचा विचारही करायला वेळ नव्हता. घरी आलो, कॅमेरा चेक केला आणि निघालो.

कुठल्या स्मशानभूमीत आपल्याला जायचं आहे, हे एव्हाना कळून चुकलं होतं. कोरोना झालेल्या मृतदेहाची फोटोस्टोरी कव्हर करायला जातोय, हे घरातही एव्हाना कळलं होतं.

मी पोहोचलो आणि कुठलाही सायरन न वाजवता एक शववाहिका शांतपणे येऊन समोर थांबली. आजवर स्मशानात खूप वेळा गेलोय, पण आजचं तिथं जाणं अपराधीपणासारखं वाटत होतं, कारण मयतीला जाताना कॅमेरा कधी नेला नव्हता. स्मशानभूमीत कर्कश ओरडणारे कावळेही दिसत नव्हते.

शांतपणे एक शववाहिका येऊन थांबली. त्यामधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातले तीन कर्मचारी आले होते. सोबत होता कोरोनाशी लढा देऊन शांत झालेला, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला एक देह.

मृतदेहासोबत 5 किलोमीटरचा प्रवास केलेले नागेश वाघमारे हे कर्मचारी मदतीसाठी कुणी येईल का, म्हणून खूप हाका मारत होते, पण कुठूनच प्रतिसाद नव्हता. मृतदेह खाली घेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

शववाहिकेतील त्या तिघांचा आता संयम सुटू लागला होता. अख्ख्या समशानभूमीत नेहमीच्या उंच झाडांच्या सावल्या मला उगाचच विचित्र वाटू लागल्या होत्या. बराच वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही, मलाही खूप ऑकवर्ड वाटू लागलं होतं.

आतापर्यंत कुतूहलाचा विषय असलेलं PPE किट या क्षणाला मात्र भयावह वाटत होतं. महापालिकेच्या त्या तीन जणांपैकी एक जण मी काहीतरी करेन, अशी आशा बाळगून माझ्याकडे पाहू लागला... मी करतोय ते योग्य की अयोग्य, अशा पद्धतीने काही विचारायला लागला.

सर्वच प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नव्हती. काही वेळ काळही थांबला होता, असं वाटलं. त्यांच्या मते बॉडीचं वजन खूप होतं आणि स्ट्रेचर लवकर मिळत नसल्यामुळे ताण वाढला होता.

अखेर स्ट्रेचर मिळालं आणि आता तो वजनदार मृतदेह खाली कसा घ्यायचा, हा सवाल होता. कोरोनामुळे ही व्यक्ती गेली आहे, म्हटल्यावर प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक हालचालींमध्ये मला साशंकता दिसत होती. कारण नक्की कुणाची किती आणि कुठवर जबाबदारी आहे, हे सांगणारं कुणीच नव्हतं.

हातात ग्लोव्हज घालणे आवश्यक असताना आपल्याकडे ते नाहीयेत आणि आत्तापर्यंत आपण तसेच वावरतोय, हे लक्षात आल्यावर नागेश वाघमारे यांनी विनंती करून ग्लोव्हज उसने घेतले.

घामाने तोपर्यंत आतून ओले झालेले कपडे, पीपीई किट यामध्ये या कर्मचाऱ्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल, याची कल्पना आली.

एका बाजूला कललेलं ते स्ट्रेचर त्याचा अनुभव सांगत होतं. बॉडी खाली घेताना पडली तर... या भीतीने नागेश वाघमारे यांनी पुन्हा एकदा जिवाच्या आकांताने हाका मारायला सुरुवात केली. पण लांब 150 मीटरवर असणारे आणि लांबूनच हे सर्व पाहणारे, कदाचित कुणी त्यांचे नातेवाईक होते, तेही आता हाका ऐकून अजून-अजून मागे सरकत होते.

काय असेल त्यांची मानसिकता, ते खरंच कुणी होते त्या मृत व्यक्तीचे की उगाच फुटकळ बघे होते, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येऊन गेले.

शेवटी वाघमारे यांच्या हाका व्यर्थ ठरल्या. माणुसकी , भीती आणि वस्तुस्थिती याचा माझ्या मनात ताळमेळ जमेना.

"जाऊ दे... कधीतरी मरायचं आहेच," असं पुटपुटत वाघमारे स्वतः पुढे सरसावले.

त्याक्षणी वाघमारेंची PPE सूट माझ्या नजरेस पडला. मागून पूर्णपणे फाटला होता तो. पायातही बूट नव्हते त्यांच्या. त्यांना निघताना कुणी गमबूट आहेत की नाहीत, हेही विचारलं नव्हतं. कारण एकच होतं - जास्तीत जास्त 'बॉडी' लवकरात लवकर हलवायची असेल रुग्णालयातून.

पण ज्यांना जबाबदारी दिलीय, तो चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा सुद्धा माणूस आहे, हे त्या घाईत सर्वच विसरले होते.

जीवाच्या आकांताने त्या तिघांनी मग 'होईल ते होईल' म्हणत बॉडी उचलली. कोणत्याही क्षणी जर प्लास्टिक फाटले तर थेट मृतदेहाला स्पर्श होईल, ही भीती होती. पण सुदैवाने तसं काही झालं नाही.

एरवी अनेक मृत व्यक्तींना हाताळणारे हे कर्मचारी नेहमी अगदी बोल्डपणे वावरताना दिसतात. आज मात्र ते थकलेले होते... आधी मनाने, मग शरीराने. पुन्हा एकदा सर्वत्र शांतता... एकमेकांकडे पाहाणं आणि पुन्हा नजर फिरवणं चालू होत त्यांचं.

देवदार वृक्षाच्या सावल्या आता खूप लांब होऊ लागल्या होत्या. आपल्याला हे काय करावं लागतंय, कोण हा, आपण कोण त्याचे, असे प्रश्न कदाचित मनात येत असतील त्यांच्या. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यापुढे सरकारी कर्मचाऱ्याला भावनांना स्थान देता येत नाही... कारण वरून आदेश असतो.

याचा मीसुद्धा माझ्या पूर्वीच्या सरकारी नोकरीत अनुभव घेतला होता, त्यामुळे मी कल्पना करू शकत होतो त्यांच्या मानसिकतेची... मिनिटभर दमल्यासारखा वाटले मला नागेश वाघमारे... त्यांचं वय 55 तरी असावं.

कोरोनाचा विषाणू जरी प्लास्टिकमध्ये लपेटलेल्या मृत शरीरात असला तरी, तो आतून जणू ओरडून भीती घालत होता... स्मशानभूमीमध्ये वर जिथे दहनविधी होतात, त्या ठिकाणापर्यंत तो मृतदेह कसाबसा आणला गेला.

विद्दुतदाहिनीचे बटण दाबणारा माणूस आता मात्र कुठूनतरी प्रकट झाला आणि त्याने बॉडी ट्रॅकवर कशी ठेवावी, याबात फर्मावले. पण हात मात्र कोण लावणार, हा प्रश्न पुन्हा होताच.

त्या प्लास्टिकमधून त्या माणसाचा पाय मला स्पष्ट दिसत होता. एका साध्या पांढऱ्या कापडात जेमतेम लपेटला होता तो देह. काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबत प्रेमाने वागणारे , त्याला आपलं म्हणणारे 'ते' सर्व, आणि त्यांच्यासाठी पायपीट करणारा 'तो', यांच्यातील दुवा साफ निखळला होता. तो पाय जास्त असहाय्य आणि केविलवाणा वाटला मला फोटो काढताना.

शासनाच्या नियमाप्रमाणे मनपाने अंत्यविधीसाठी मदत करावी असे आदेश आहेत, पण अंत्यविधीला जर कुणीच आलं नसेल तर...? शेवटी अंत्यविधी करायचा कुणी, असा प्रश्न होता. नागेश वाघमारे पुन्हा ओरडत होते, "अरे आता तरी या कुणीतरी!"

पण ऐकायला होतं कोण? कुणीच नाही. नागेश, अत्यंत खालावलेल्या मानसिकतेमध्ये असलेले ते दोन कर्मचारी आणि हातात कॅमेरा घेऊन असलेला मी. आधीच उकाडा, त्यात दाहिनीची धग, अशामध्ये ट्रॅकवर मृतदेह ठेवताना आता मात्र मला त्या प्लास्टिकची भीती वाटत होती.

एव्हाना स्मशानभूमीत कर्मचाऱ्याने दाहिनी चालू केली होती. कशीबशी बॉडी दाहिनीच्या ट्रॅक वर ठेवली गेली . ना मंत्र, ना कुणाचा शेवटचा नमस्कार, ना रडायला कोणी, ना डोळे पुसणारे पदर, ना हुंदके, ना आसवं, ना टाहो, ना आक्रोश... होता तो जीवघेणा कोरोना... माणसाच्या असहाय्यतेकडे पाहत छद्मीपणे हसणारा कोरोना.

मग शून्यात डोळे लावत नागेश वाघमारे यांनीच प्रार्थना म्हटली. कोरोनामुळे मृत्यूही किती तुसडेपणाने वागतो, हे मीसुद्धा डोळ्यांनी पाहिलं, अगदी जवळून कॅमेऱ्याने टिपलं.

सर्व काही शांत होतं. कोणत्याही क्षणी आता दरवाजा उघडेल आणि प्रक्रिया सुरू होईल... पटकन एक फोटो घेतला त्या माणसाचा. 'बॉडी' म्हणावं असं वाटत नव्हतं मला त्या क्षणाला. कारण मी 'ह्यूमन स्टोरी' करतोय, असं एक मन सांगत होतं मला.

मी मागे फिरलो... पुन्हा मागे वळून न पहाता...

कोरोना किती भयानक आहे, कुणी म्हणजे कुणीच कुणाचं नसतं, आणि असलं तरी कुणीही कुणीचं काही करू शकत नाही, हे जाणवून गेलं.

मी निघताना त्या महानगरपालिकेच्या तिघांना वंदन केलं आणि पुन्हा मोहिमेवर निघालेल्या नागेश वाघमारेंच्या मानेकडे लक्ष गेलं आणि मी चमकलोच... मानेवर स्पष्ट ठसठशीत देवनागरी लिपीत गोंदवलेलं होतं "मृत्यू".

घरी आल्यावर पण सतत वाघमारे दिसत होते. त्यांच्या मानेवरचा तो शब्द... न राहवून शेवटी वाघमारे यांना फोन केला आणि विचारलं तेव्हा वाघमारे म्हणाले, "साहेब, पंचवीस वर्ष झाली मी नोकरी करतोय. जॉइन झालो तेव्हाच ठरवलं... आपणही कधीतरी जाणार. आपली ड्युटी ही अशी. मग त्याची भीती उगा कशापायी बाळगायची? मृत्यू हे सत्य आहे हे एकदा मनावर सील झालं की, मग काय बी वाटत नाय! तेव्हाच गोंदवून घेतलंय साहेब हे मानेवर."

त्याचे शब्द निखारा होता कदाचित त्यातूनच त्याला बळ मिळत असेल सत्याला सामोरे जाण्याचे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)