कोरोना गुजरात: धमन व्हेंटिलेटर वादात का अडकलंय? अहमदाबादमध्ये मृत्यू का वाढलेत?

    • Author, भार्गव परीख
    • Role, बीबीसी गुजराती

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात अतिमहत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्हेंटिलेटरवरून गुजरातमध्ये वाद सुरू आहे.

गुजरातच्या ज्योती CNC या कंपनीने बनवलेल्या धमन-1 व्हेंटिलेटर्सचं उद्घाटन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 5 एप्रिलला केलं होतं. पण रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर उपयोगी ठरत नसल्याचं अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. राजकोटमधील या कंपनीबाबत एक पत्र डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना लिहिलं. अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांनी हे प्रकरण गुजरात वैद्यकीय सेवा प्राधीकरण मर्यादित (GMSCL) यांनाही कळवलं.

एकीकडे कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत असताना गुजरातमध्ये धमन व्हेंटिलेटरवरून राजकारण पेटू लागलं. काँग्रेस नेते परेश धनानी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी सरकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आरोप-प्रत्यारोप

विधानसभेतील विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी ट्विटरवर धमन-1 बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला. धमन-1च्या वापरामुळे काही रुग्णांच्या रक्तवाहिन्यांना इजा झाली आहे, असा आरोप धनानी यांनी केला.

कोरोना संकट हाताळण्यात सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याचा आरोप छावडा यांनी केला. धमन-1 च्या आडून मुख्यमंत्री रुपाणी सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. रुपाणी हे त्यांच्या मित्राच्या कंपनीचं मार्केटिंग करत असल्याचंही ते म्हणाले.

सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घेतला किंवा नाही, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सिव्हिल रुग्णालयात मृत्युमुखी पडलेले रुग्ण धमन-1च्या वापरामुळेच दगावल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस स्वदेशी वस्तू वापराच्या अभियानाला अडथळा आणत असल्याचा आरोप भाजप नेत्या डॉ. श्रद्धा राजपूत यांनी केला. काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत असल्याचं त्या म्हणाल्या. सरकार लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण कांग्रेस संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहे, असं त्या म्हणाल्या.

अखेर गुजरात सरकारचे मुख्य सचिव जयंती रवी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. 20 मे अर्थात बुधवारी एका पत्रकार परिषदेत जयंती रवी यांनी सांगितलं, की कंपनीने पहिले 10 व्हेंटिलेटर 18 एप्रिलला दिले होते. व्हेंटिलेटरला राज्य किंवा केंद्र सरकारच्या ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाच्या (DGCI) नियमावलीची गरज नाही. भारतीय संस्थांना दिलेल्या सूचनेनुसार ते बनवण्यात आले होते.

परवान्याची आवश्यकता असलेल्या आरोग्य विभागाच्या 37 उपकरणांच्या यादीतही व्हेंटिलेटरचा समावेश नाही. धमन-1 ने प्रत्येक चाचणीमध्ये योग्यता सिद्ध केली होती. कृत्रिम फुफ्फुसांवर आठ तासांसाठी त्याची चाचणी घेण्यात आली होती. त्याची मानवावर चाचणी घेण्याची गरज नसते, असंही रवी यांनी सांगितलं.

रवी यांनी काही खुलासे तर केले, पण तरी अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले

डॉक्टरांचं म्हणणं काय?

धमनमुळे कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांवर उपचाराचा वेग वाढेल, असं रुपाणी उद्घाटन कार्यक्रमात 5 एप्रिल रोजी म्हणाले होते. पण तेव्हापासून राज्यातील मृत्यूंच्या प्रमाणात उलट वाढच झाली आहे.

अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री पटेल यांच्यासमोर धमनबाबत एक प्रेझेंटेशन सादर केलं. धमनमुळे रुग्णांचे जीव वाचवणं अवघड असून सरकारने 100 व्हेंटिलेटर पुरवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

वैद्यकीय अधीक्षकांनी 15 मेला लिहिलेल्या पत्रात कोरोनाग्रस्तांवरच्या उपचारात धमन-1 फारसे उपयोगी ठरत नाहीत, त्यामुळे 100 व्हेंटिलेटर द्यावेत, असं सांगितलं.

कोरोनाग्रस्तांवर सुरुवातीच्या उपचारासाठी हे व्हेंटिलेटर उपयोगी ठरतात, पण गंभीर रुग्णांवर ते परिणामकारक नाहीत, असं सिव्हिल रुग्णालयाचे डीन डॉ. एम. एम. प्रभाकर यांनी बीबीसीला सांगितलं.

'धमन-1ला व्हेंटिलेटर म्हणता येणार नाही'

डॉ. प्रभाकर यांच्या मते, धमन प्राथमिक उपचारात उपयोगी आहे, पण त्यामध्ये अजून सुधारणा आवश्यक आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते, धमन-1 हे एक व्हेंटिलेटर आहे, असं म्हणता येणार नाही.

अहमदाबादचे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि अहमदाबाद मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. बिपीन पटेल सांगतात, "धमनला एक व्हेंटिलेटर म्हणता येणार नाही. त्यामध्ये ऑक्सिजन मीटर नाही. ऑक्सिजनची यंत्रणा नाही. द्रव स्वरूपातील ऑक्सिजन फुफ्फुसात न गेल्यास फुफ्फुसं कोरडी पडू शकतात, पण ही यंत्रणा धमन-1 मध्ये नाही."

"खूप वेळपर्यंत रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवणं शक्य नाही. शस्त्रक्रिया करतानाही आम्ही श्वसनयंत्रणेवर लक्ष ठेवून असतो. यामुळे रुग्णाच्या स्नायूंना आराम मिळतो, पण धमनमध्ये अशा प्रकारची सोय नाही.

"धमन-1 घाईघाईत तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. उपकरणांबाबत 2017च्या नियमानुसार वैद्यकीय समितीने हे उपकरण तपासायला हवं होतं. सरकारलाही ते करता आलं असतं," असंही ते म्हणाले.

बिपीन यांच्या मते, धमन-1 सुरुवातीला आरामदायक वाटू शकतं, पण डॉक्टर त्यावर अवलंबून राहू शकत नाहीत. धमनला कोणतीही वैद्यकीय परवानगी मिळालेली नाही.

याबाबत बोलताना डॉ. जयंती रवी म्हणाल्या, आरोग्य विभागाची परवानगी आवश्यक असणाऱ्या 37 उपकरणांच्या यादीत व्हेंटिलेटरचा समावेश नाही. त्यामुळे त्याला राज्य सरकारच्या परवानगीची गरजच नाही.

'आम्ही नियमावली पाळली'

पराक्रम सिंह जडेजा ज्योती CNCचे संचालक आहेत. ते सांगतात, "धमनवरचे प्रश्न म्हणजे स्वदेशी अभियानातील अडथळा आहे. स्वदेशी उत्पादक कंपन्यांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ही उत्पादनं बाजारात येऊ नयेत, यासाठीचे हे प्रयत्न आहेत."

ते पुढे सांगतात, "आम्ही सर्व नियम पाळले. आम्ही IC-60601चं मानांकन वापरलं. आम्हाला राष्ट्रीय पातळीवर परवानगी मिळाली आहे. आम्ही ISO मानांकनानुसार काम केलं. मिशिगनस्थित कंपनीचं तंत्रज्ञान आम्ही वापरलं."

चाचणीवरचे प्रश्नचिन्ह आणि परवानगी

व्हेंटिलेटरची मानवावर चाचणी घेण्याची गरज नसल्याचं जयंती रवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. याबाबत बीबीसीने वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा कपूर यांच्याशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, "कोणतंही काम परवानगीशिवाय करता येत नाही. सध्याच्या स्थितीत सरकारकडे विशेषाधिकार आहेत. याअंतर्गत सरकारला वाटल्यास ते आपला अधिकार वापरून परवानगी देणं टाळू शकतात."

जयंती रवी यांनी सांगितलं की उत्पादक कंपनीला याचा परवाना हवा आहे आणि नोंदणीही करायची आहे. त्यांच्याकडे 18 महिन्यांचा कालवधी आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत ते नोंदणी करू शकतात.

अनुजा कपूर याबाबत सांगतात, "वैद्यकीय क्षेत्रात पीअर ग्रुप जर्नल असतात. एखाद्या उपकरणाचं उत्पादन घेत असताना त्यांच्यासमोर हे उपकरण सादर करावं लागतं. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्याबाबत चर्चा करतात. त्यानंतर त्याला परवानगी दिली जाते. असं झालं असतं तर ते कायदेशीररीत्या मजबूत ठऱलं असतं."

धमन-1 च्या प्रकरणात अशा प्रकारची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. धमनबाबत कोणतं रिसर्च पेपर बनवण्यात आलं ते कुणाकडे सादर केलं आणि ते कसं बनलं याबाबत माहिती उपलब्ध नाही. पण याचवेळी व्हेंटिलेटरची चाचणी मानवावर घेण्याची गरज नसल्याबाबत अनुजा कपूर यांनी मान्य केलं.

त्या म्हणाल्या, याला सुरक्षेबाबत ISO मानांकन लागतं. इलेक्ट्रॉनिक आणि क्वालिटी डेव्हलपमेंट सेंटरमध्ये याची चाचणी करता येऊ शकते.

जयंती रवी यांच्या मते, धमन-1 ला ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाची परवानगीची गरज नाही. याला वैद्यकीय उपकरणांबाबत 2017 चा कायलाही लागू होत नाही. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करता येत नाही.

याबाबत बीबीसीने गुजरात हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वकील यतीन ओझा यांच्याशी बातचीत केली. ते सांगतात, "कलम 304 अंतर्गत वैद्यकीय कामात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा यामध्ये दाखल करता येऊ शकतो. कोणतंही व्हेंटिलेटर बनवल्यानंतर किंवा विकत घेतल्यानंतर त्याची चाचणी होणं आवश्यक आहे. सरकारने चाचणी न करता त्याचा वापर केला. ही गंभीर बाब मानली जाऊ शकते."

जयंती रवी सांगतात, ज्योती सीएनसी महागडे व्हेंटिलेटर दान स्वरूपात देत आहे. आपल्या भूमीचं कर्ज फेडण्यासाठी ते हे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप लावणं हे माणुसकीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)