IRCTC : 1 जूनला सुटणाऱ्या ट्रेन्सचं बुकिंग सुरू, काय आहेत प्रवासाचे नियम?

IRCTC ने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या 200 गाड्यांच्या बुकिंगला सुरुवात केलेली आहे. 21 मे सकाळी दहा वाजल्यापासून या बुकिंगला सुरुवात झाली.

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल गाड्यांपेक्षा या गाड्या वेगळ्या असतील.

या 200 ट्रेन्सपैकी काही ट्रेन्स मुंबईहून सुटणाऱ्या किंवा मुंबईत येणाऱ्या आहेत. याशिवाय एक गाडी पुण्यातून सुटणार आहे.

या गाड्यांमध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन क्लास तसेच जनरल कोचही असतील. अर्थात, सर्वच कोचसाठी आरक्षण करावं लागेल.

ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग ही केवळ IRCRC ची वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवरूनच होईल. 30 दिवस आधी या गाड्यांसाठीचं आरक्षण करता येईल.

प्रवासाला सुरूवात करण्यापूर्वी सर्व प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जाईल आणि कोरोनाची लक्षण नसलेल्या व्यक्तिंनाच प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या गाड्यांव्यतिरिक्त अन्य मेल/एक्सप्रेस, पॅसेंजर आणि सबअर्बन रेल्वे सेवा अजूनतरी सुरू होणार नाहीत.

प्रवासासाठीचे इतर नियम काय आहेत?

  • नेहमीप्रमाणेच तिकिट बुकिंगमध्ये सर्व प्रकारचा कोटा लागू असेल.
  • प्रवासाच्या किमान 30 दिवस आधी तिकिट बुक करता येईल.
  • RAC आणि वेटिंग लिस्टवर असणाऱ्यांनाही तिकिट मिळेल, मात्र ते वेळेत कन्फर्म झालं नाही तर संबंधित व्यक्ती प्रवास करू शकणार नाही.
  • तिकिट असलेल्या व्यक्तींनाच रेल्वे स्टेशनवर प्रवेश देण्यात येईल.
  • प्रवासापूर्वी सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात येईल. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळणार नाहीत, केवळ त्याच व्यक्तींना प्रवासाची परवानगी देण्यात येईल. जर तपासणीत कोणाची तब्येत ठीक नसल्याचं आढळलं, तर त्या व्यक्तीला तिकिटाचे पूर्ण पैसे परत केले जातील.
  • प्रवाशांनी सोबत खाण्याचे पदार्थ ठेवावेत, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. तिकिटामध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांचा चार्ज लावला जाणार नाही. मात्र काही ट्रेन्समध्ये पॅन्ट्री कार असेल, ज्यामधून लोक खायचे पदार्थ घेऊ शकतील.
  • स्टेशनवर पुस्तकांचे स्टॉल तसंच औषधांची दुकानं सुरू राहतील. स्टेशनवर असलेल्या खाण्यापिण्याच्या स्टॉल्सवर तसंच रेस्टॉरंट्समध्ये बसून खाण्याची परवानगी नसेल.
  • ट्रेनमध्ये चादर, पांघरुणं दिली जाणार नाहीत, तसंच ट्रेनमध्ये पडदेही नसतील.
  • रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करताना आणि प्रवासादरम्यान पूर्ण वेळ मास्क घालावा लागेल.
  • प्रवाशांनी किमान 90 मिनिटं आधी रेल्वे स्टेशनवर पोहोचणं गरजेचं आहे.
  • स्टेशनवर आणि प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या ट्रेन्स कोणत्या?

  • मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
  • LTT - दरभंगा एक्स्प्रेस
  • LTT - वाराणसी कामायनी एक्स्प्रेस
  • मुंबई CST - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
  • मुंबई CST - गदग एक्स्प्रेस
  • मुंबई CST - बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस
  • वांद्रे टर्मिनस - जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस
  • मुंबई CST - हैदराबाद हुसैनसागर एक्स्प्रेस
  • मुंबई सेंट्रल - अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेस
  • LTT - तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस
  • मुंबई सेंट्रल - जयपूर एक्स्प्रेस
  • LTT - पाटलीपुत्र एक्स्प्रेस
  • LTT - गुवाहाटी एक्स्प्रेस
  • वांद्रे टर्मिनस - गोरखपूर अवध एक्स्प्रेस
  • वांद्रे टर्मिनस - मुझ्झफरपूर अवध एक्स्प्रेस

मुंबईला येणाऱ्या गाड्या

  • लखनऊ - मुंबई CST - पुष्पक एक्स्प्रेस
  • हावडा - मुंबई CST मेल
  • अमृतसर - मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेल
  • अमृतसर - वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेस
  • पटना - LTT एक्स्प्रेस
  • गोरखपूर - LTT एक्स्प्रेस

पुण्याहून सुटणारी गाडी

  • पुणे - दाणापूर एक्स्प्रेस

1 जूनपासून सुटणाऱ्या ट्रेन्सची संपूर्ण यादी ANI या वृत्तसंस्थेनं आपल्या ट्वीट केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)