RBI शक्तिकांत दास : चालू आर्थिक वर्षात देशाचा प्रत्यक्ष विकासदर उणे राहणार

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आरबीआयतर्फे घेण्यात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये काहीही बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्केच ठेवण्यात आला आहे. कोरोनामुळे आपल्यावर आर्थिक संकट ओढावले आहे पण गेल्या तिमाहीपेक्षा यावेळी परिस्थिती सुधारली आहे असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेपो रेट कमी केला जाऊ शकतो असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी बांधला होता पण शक्तिकांत दास यांनी रेपो रेट स्थिर ठेवला आहे.

कोरोनाची लस आल्यावर आपली आर्थिक स्थिती बदलू शकते असं देखील शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.

अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

'अर्थव्यवस्था वाढीचा दर उणे राहू शकतो'

चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीतही वाढ झाली आहे. येत्या काळात देशाचा आर्थिक विकासदर उणेमध्ये राहण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच रेपो दर 4 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

"देशात सध्या महागाई दर नियंत्रणात आहे. एकीकडे दुसऱ्या देशांच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे. परंतु आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ होत आहे. जानेवारी ते जून या कालावधीत अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट होती.

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाच घरघर लागली आहे. त्यामुळे या काळात अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक होती असं शक्तिकांत दास म्हणाले.

मे महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

कोरोना उद्रेकाच्या काळात कर्जाची हप्ते फेडण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवून देण्यात आली होती. ही मुदत आता आणखी तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • परकीय गंगाजळी वाढवण्यासाठी EXIM बँकेला 15000 कोटीचा निधी देणार.
  • 2020-21मध्ये परकीय गंगाजळीत 9.2 बिलियनने वाढ. 15 मे पर्यंत एकूण परकीय गंगाजळी 487 बिलियन डॉलर इतकी आहे.
  • केंद्रीय बँका या पारंपरिक विचारसरणीच्या समजल्या जातात.पण अशा संकटकाळी या बँकाच विविध उपाययोजना करण्यात आघाडीवर असतात.
  • रिव्हर्स रेपो रेट 3.35% टक्क्यावर आणला.
  • औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मार्चअखेरीस 17टक्क्यांची घट तर उत्पादनात 21टकक्यांची घट.मुलभूत उद्योगातील उत्पादनात 6.5% टक्क्यांची घट
  • जीडीपीची वाढ येत्या काळात नकारात्मकच राहणार
  • 2020च्या सुरुवातीच्या काळात महागाई राहणार. 2020च्या उत्तरार्धात कमी होईल.
  • लॉकडाऊनच्या काळातअन्नधान्याच्या उत्पादनात 3.7 टक्क्यांनी वाढ झाली असूनही दिलासादायक बातमी आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)