विधान परिषद निवडणूक बिनविरोध : काँग्रेसने उमेदवार घेतला मागे - संजय राऊत

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उमेदवारी याचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भूमिका घेतली. मी प्रदेश अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात व ना.अशोक चव्हाण यांचा आभारी आहे," असं ट्वीट करत महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाने काही काळ विश्रांती घेतली होती. पण गेल्या काही दिवसांपासून या विधान परिषद निवडणुकीमुळे राज्यातल्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आलं होतं.

21 मे रोजी राज्यात विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 मे आहे. 24 एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

या 9 रिक्त जागांसाठी विधानसभेतील आमदार मतदान करतील. संख्याबळाचा विचार केल्यास भारतीय जनता पक्षाच्या 3 आणि महाविकास आघाडीच्या 5 जागा निवडून येणं सहज शक्य आहे. तर उर्वरित एका जागेसाठी भाजपला महाविकास आघाडीपेक्षा कमी मतांची गरज आहे. त्यानुसारच भाजपने 4 उमेदवार जाहीर केले आहेत.

महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि काँग्रेस एका जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आधीच होती. पण काँग्रेसनेच महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांच्या आधीच दोन उमेदवारांची घोषणा केल्यामुळे राजकीय रंगत निर्माण झाली होती.

मात्र आता संजय राऊतांच्या या घोषणेनंतर चित्र बरंच स्पष्ट झालं आहे. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीबीसी मराठीच्या दिपाली जगताप यांच्याशी बोलताना सांगितलं, "कोरोना संकट मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन मॅनेजमेंट सांभाळणं अवघड आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आम्हाला विनंती केली. त्यामुळे एक अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, आणि राजेश राठोड यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे."

यादरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये "नाराजी नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. "राजकारणात चर्चा करून असे निर्णय घ्यावेच लागतात," असं थोरात यावेळी म्हणाले.

कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी?

भाजपने सर्वप्रथम चार उमेदवार 8 मे रोजी जाहीर केले. यामध्ये प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

त्यानंतर काँग्रेसने 9 मे रोजी आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली होती. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करून राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना विधान परिषदेची उमेदवारी देत असल्याचं सांगितलं आहे.

मात्र 10 मे रोजी संध्याकाळी पापा मोदी यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी हे उमेदवार असतील, जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी दुपारी जाहीर केलं.

शिवसेनेच्या कोट्यातील एका जागेवर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे स्पष्ट आहे. तर दुसऱ्या जागेवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

निवडणुकीचं गणित काय?

यंदाच्या विधान परिषद निवडणुकीची स्थिती आणि काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्यामुळे आलेली रंगत जाणून घेण्यासाठी आपल्याला विधानसभेतील पक्षीय बलाबलावर एक नजर टाकावी लागेल.

"एकूण पक्षीय बलाबल पाहता भाजपला त्यांची चौथी आणि महाविकास आघाडीला त्यांची सहावी जागा निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागेल," असं राजकीय विश्लेषक दीपक भातुसे सांगतात.

"विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी राज्यातले 288 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे 32 आमदारांच्या मागे एक आमदार असं गणित आहे. विधानसभेत भाजपचे 105 आमदार आहेत, तसंच त्यांच्याकडे छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष म्हणून 10 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांची संख्या होते 115. त्यानुसार भाजपचे 3 आमदार सहज निवडून येऊ शकतात. चौथ्या जागेसाठी भाजपला आणखी 13 आमदारांची गरज आहे," असं दीपक भातुसे सांगतात.

तर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांच्या आकड्यांची बेरीज केली तर ती 158वर जाते. पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचा विचार केल्यास हा आकडा 170च्या आसपास जातो. विश्वासमत ठरावाच्यावेळी सुद्धा त्यांच्या पारड्यात 169 मतं पडली होती. त्यामुळे त्यांचे 5 आमदार सहज निवडून येऊ शकतात.

नवव्या उमेदवाराची निवड कशी होणार?

यंदाची निवडणूक 9 रिक्त जागांसाठी होणार आहे. फक्त 9 उमेदवार असतील तर सर्वांची निवड बिनविरोध होऊ शकते. पण जास्त उमेदवारांचे अर्ज आले तर प्राधान्यक्रमांवरील मतांच्या आधारे नवव्या उमेदवाराची निवड करण्यात येते, असं घटनातज्ज्ञ अशोक चौसाळकर सांगतात.

विधानसभेचे 288 आमदार आपल्या प्राधान्यक्रमाची 9 पर्यंत मते देऊ शकतात. पण सहसा असं कधी घडत नाही; दोन किंवा जास्तीत जास्त तीन प्राधान्यक्रमांची मते दिली जातात.

विधान परिषद निवडणुकीत उमेदवाराला विजय मिळण्यासाठी 32 मतांची आवश्यकता आहे. पण एखाद्या उमेदवाराला 32 मतं मिळत नसल्यास दुसऱ्या प्राधान्यक्रमाची मतं मोजली जातात.

प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रणनीती आखत असतो. आपल्या आमदारांनी कोणत्या प्राधान्यक्रमाने मतं द्यावीत, याची सूचना त्यांना पक्षातर्फे केली जाते.

पण हे मतदान गुप्त पद्धतीने पार पडतं, हेसुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ही मतं फुटूसुद्धा शकतात. त्यामुळे समोरील उमेदवाराची राजकीय ताकद, ओळख आणि पैसा या बाबी कधी-कधी महत्त्वाच्या ठरू शकतात.

भाजपने चौथ्या जागेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनेनेसुद्धा दोन उमेदवार दिले तर या चौथ्या जागेसाठी अटीतटीची लढाई दिसू शकते.

एका जागेचं भवितव्य अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून?

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या चारही जागा जागा निवडून आणणं शक्य असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना जागावाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 काँग्रेस असा फॉम्युला बीबीसी मराठीला सांगितला होता.

जर याच फॉर्म्युल्यानुसार आघाडी निवडणूक लढणार असेल तर ती बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. पण काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे ते सहाव्या जागेसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पण महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी त्यांना 22 आमदारांची संख्या कमी पडते. आघाडीनं सहावा उमेदवार दिला तर मात्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान मनसे (1), माकप (1) आणि एमआयएम (2) या पक्षांचे चार आमदार तटस्थ राहिले होते. ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अपक्षांना बरेचदा सत्ताधारी पक्षांबरोबर राहायला आवडतं, असं दीपक भातुसे सांगतात. त्यामुळे अपक्षांच्या भूमिकेवर आघाडीच्या सहाव्या जागेची मदार असणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)