You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीसांची शाहू महाराजांवरील 'त्या' ट्वीटबद्दल दिलगिरी- नेमका वाद काय?
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीदिनी (6 मे) विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाला होता.
शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक 'कार्यकर्ते' असा केल्याने फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी अशी मागणी करणारं ट्वीट खासदार संभाजीराजे यांनी केलं होतं.
संभाजीराजे यांच्या ट्वीटला उत्तर देत फडणवीस यांनी या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
या ट्वीटमध्ये फडणवीस यांनी लिहीलंय, "छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी केलेल्या ट्वीटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो."
नेमका वाद काय?
6 मे हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतीदिन. त्यांना अभिवादन करण्यासाठी केलेल्या एका ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्वीट डिलीट केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीवर संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं, की झालेली चूक मान्य करून, तिच्यात सुधारणा केल्याने कमीपणा येत नसतो.
"तुम्ही लोकभावनेचा आदर केलात. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज व तसेच सर्वच महापुरुषांच्या अस्मिता सर्वांनीच जपल्या पाहिजेत. सर्व पक्षीय नेतृत्वाने तो आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे," असंही संभाजीराजे यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करणारं एक ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील केलं होतं.
सावंत यांनी म्हटलं, "संघाच्या मनुवादी विचारांच्या मुशीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांना कार्यकर्ता म्हणून कमी लेखणे आश्चर्यकारक नाही. संघाने मनुवाद आणायचा असल्याने महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कायम आकसच केला. मनातील भावना बाहेर आली एवढेच! जाहीर निषेध!"
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा 'सामाजिक कार्यकर्ता' असा उल्लेख करून बदनामी केली आहे. याबाबत फडणवीस माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करत आहोत, असं संभाजी ब्रिगेडने एक पत्रक प्रसिद्ध करून म्हटलं होतं.
जगातील विद्वानांच्या यादीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. लोकराजा शाहू महाराजांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रसी म्हणजेच सामाजिक लोकशाहीचे स्तंभ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीस यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा इतिहास वाचून घ्यावा, असा टोलाही संभाजी ब्रिगेडने लगावला.
शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून उल्लेख केल्याने यावर टीका झाल्यानंतर आधीचे ट्वीट डिलीट करुन फडणवीस यांनी शाहू महाराजांच्या कार्याची महती सांगणारा एक व्हीडिओ पोस्ट केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)