You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्रोलिंगवरून वाद, पण हे ट्रोलिंग नेमकं का केलं जातं?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर जाणूनबुजून ट्रोल केलं जात असल्याची तक्रार नागपूर आणि मुंबईत दाखल करण्यात आली आहे.
ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र सुद्धा भाजपनं पोलिसांना दिलं आहे.
सध्या देवेंद्र फडणवीस यांचं फेसबुक लाईव्ह सुरू झालं वेगवेगळे इमोजी किंवा विशिष्ट शब्द वापरून त्यांना ट्रोल केलं जात आहे. तसंच ट्विटरवरसुद्धा त्यांना असंच हैराण केलं जात आहे.
काँग्रेसनं मात्र भाजपच्या या तक्रारीवरच टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपनंच देशात ट्रोलिंग सुरू केल्याचा आरोप केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी भाजपची तक्रार खरी असेल तर पोलिसांच्या कारवाईची मागणीही केली आहे.
"ट्रोल्सच्या जनकांना आज ट्रोल विरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ आहे. बोया पेड बबूल का, आम कहांसे खाय? 2014 नंतर देशात ट्रोलधाड भाजपाने आणली. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. अजून धर्मांधता भाजपा ट्रोल्स पसरवतात. तरीही शिवीगाळ, धमक्या असतील तर पोलिसांनी कारवाई करावी," असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
एखादा नेता, पत्रकार किंवा सेलिब्रिटिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जाणं हे काही आता भारतात नवं नाही. त्याबाबत काहींनी तक्रारी केल्या आहेत तर अनेकांनी दुर्लक्ष केलं आहे.
अर्वाच्य भाषेच शिवीगाळ करणे, शारीरिक व्यंग, नाव, अडनाव, पद, जात, धर्म यासारख्या मुद्द्यांवरून जोक करणे किंवा मनोधौर्य खच्ची होईल अशी टिपण्णी करणे यासारखे हातखंडे ट्रोल करणारे वापरतात.
पण समोरची व्यक्ती महिला असेल तर मात्र लिंगभेद करणारी टिपण्णी किंवा बलात्काराची धमकीसुद्धा त्यातून सुटलेली नाही.
पण अशा प्रकारच्या ट्रोलिंगची सुरुवात नेमकी कधी झाली? या विषयी आम्ही काही एक्सपर्टशी चर्चा केली.
'ट्रोलिंगमध्ये उजव्या विचारांची मंडळी पुढे'
अल्ट न्यूजचे संपादक प्रतिक सिन्हा यांच्या मते, भारतात 2013 मध्ये सोशल मीडियावरील संघटित ट्रोलिंग सुरू झालं. तोपर्यंत ते वेबसाईटवरील बातम्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये अर्वाच्य भाषेत कमेंट करणं किंवा ती बातमी चुकीची ठरवण्याचे प्रयत्न करणे किंवा स्वतःचा अजेंडा रेटण्यापर्यंत मर्यादित होतं.
यामध्ये उजव्या विचारांचे लोक पुढे असल्याचं त्यांना वाटतं. ते सांगतात,
"राजकीय ट्रोलिंगची सुरूवात भारतात उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून झाली आहे. 2013 मध्ये नरेंद्र मोदी फक्त पंतप्रधानपदाचे उमेदवार होते, तेव्हा ते ज्या लोकांना ट्वीटरवर फॉलो करत होते त्यावर आम्ही एक लेख लिहिला होता. हे लोक इतरांना कसे ट्रोल करत होते हे त्यात आम्ही सांगितलं होतं. आता तर ते वेळोवेळी सिद्ध झालं आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या वेळीही दिसून आलं आहे. अशा लोकांना नेहमीच राजकीय बळ दिलं जातं. पण आता हे दोन्ही बाजूंच्या विचारधारांमध्ये होताना दिसत आहे."
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर निखील दधीच यांनी केलेल्या ट्वीटची सर्वत्र चर्चा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही त्यांना ट्वीटरवर फॉलो करतात. नरेंद्र मोदींनी एकदा कुणाला फॉलो करायला सुरूवात केली ते कुणाला अनफॉलो करत नाहीत, असं स्पष्टीकरण तेव्हा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी दिलं होतं.
"संघटित ट्रोल करणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या पक्षांचा पूर्ण पाठिंबा असतो. त्याशिवाय हे शक्य नाही," असं प्रतिक सिन्हा सांगतात.
त्यासाठी ते एक उदाहरण देतात, "काही दिवसांपूर्वी चुकीची माहिती पसरवणाऱ्या 5 अकाउंट्सचा आम्ही पर्दाफाश केला होता. हे अकाउंट्स खोटी नावं वापरून चालवली जात होती. त्यांचे फॉलॉवर्सही भरपूर होते. जसा आम्ही हा पर्दाफाश केला तसं लगेचच स्मृती इराणींनी त्यांना ट्वीटरवर फॉलो करायला सुरूवात केली."
खरंच कारवाई होते का?
ठाण्यात नुकतंच एक प्रकरण समोर आलं होतं. फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्टमध्ये टॅग केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप अनंत करमुसे यांनी केला होता. त्यानंतर ठाणे भाजपचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
'एबीपी माझा' या न्यूज चॅनेलच्या पत्रकार रश्मी पुराणिक यांना सुद्धा काही दिवसांपूर्वी विचित्र पद्धतीच्या ट्रोलला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या ट्रोलचा पत्ता शोधून काढला आणि त्याला अटक केली. त्याचवेळी भाजपनं त्यांचा त्या ट्रोलशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
या विषयी बीबीसी मराठीशी बोलताना रश्मी पुराणिक म्हणाल्या, "ट्रोलिंगबाबत कडक नियम करणं गरजेचं आहे. बरेचदा कमरेखालच्या टिप्पण्या केल्या जातात. महिला स्वतःचं मत मांडू शकतात हेच लोकांना पटत नाही. आधी भाजप पाकिटं देतं का, असं विचारलं जायचं. आता बारामतीतून पाकिटं येतात का, असं विचारलं जातं. पुरुषाला ट्रोल करताना कुणी कॅरेक्टरवर जात नाही, पण महिलेले ट्रोल करताना कॅरेक्टरवरून टीका केली जाते."
हैद्राबाद बलात्कार प्रकरणातल्या आरोपींच्या एन्काउंटरविरोधात लिहिल्यानंतरही रश्मी यांना अर्वाच्य भाषेतल्या ट्रोलचा सामना करावा लागला होता.
संघटित ट्रोलिंगचा उद्योग
आजकाल ट्विटरवर वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतात. त्यातील काही प्रमोटीव्ह असतात तर काही घडवून आणले जातात.
ट्विटरवर कधी, कुठून किती आणि कसं ट्विट केलं म्हणजे त्याचा ट्रेन्ड होतो याची सेवा देणाऱ्या कंपन्या आता बाजारात आहेत. सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि आयचीसेल सुद्धा बरेचदा अशा कंपन्यांची सेवा घेतात.
ट्विटरवर होणाऱ्या ट्रेन्डसाठी ट्विट करणारे हँडल्स पाहिले तर लक्षात येतं की बरेचसे हँडल्स हे निनावी किंवा विचित्र नावानी आहेत किंवा त्यांचे फोटो काहीतरी विचित्र आहेत. शिवाय साचेबद्ध ट्वीट मधूनही या गोष्टी लक्षात येऊ शकतात.
"आऊटलाईन काहीही असली किंवा पक्ष कितीही नाही म्हणत असले तरी राजकीय पाठिंबा असल्याशिवाय लोकांना संघटित (ऑर्गनाइज) ट्रोलिंग करणं शक्य नाही. हे आता प्रत्येक पक्षाकडून होतं. समोरचा करतो तर आम्ही का नको करायला अशी आता सर्वांची मानसिकता झाली आहे," असं प्रतीक सिन्हा सांगतात.
ते पुढे सांगतात, " पहिल्या गटाकडून दुसऱ्या गटाच्या नेत्याबाबत एखादा अपमानजनक हॅशटॅग ट्रेंड झाला की दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या गटाकडून पहिल्या गटाच्या नेत्याविरोधात अपमानजन हॅशटॅग चालवला जातो. पण यात उजव्या विचारसरणीची मंडळी सर्वांच्या पुढे आहे हे मात्र खरं आहे."
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी याच्याबाबत एक अपमानजनक हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड झाला होता. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक अपमानजनक हॅशटॅग ट्रेंड झाला होता.
पण या ट्रोलिंगचा पसारा आता राजकीय विचारधारा किंवा पक्षांच्याहीपुढे गेला आहे. त्याबाबत या विषयातले जाणकार निखील पाहावा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,
"ट्रोलिंग फक्त आता एखादी विचारधारा किंवा राजकीय पक्षांपुरतं मर्यादित नाही. एक ब्रँड दुसऱ्या ब्रँडची व्हॅल्यू कमी करण्यासाठी, एका उद्योगाकडून दुसऱ्या उद्योला तोटा करण्यासाठी अफवा पसरवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. फेकन्यूज आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठीसुद्धा त्याचा वापर केला जातो."
'ट्रोलिंगसाठी मिळतात पैसे'
ट्रोल करणाऱ्यांना बरेचदा पैसे दिले जातात असा आरोपही होतो.
त्याबाबत विषयातले जाणकार निखील पाहावा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितल, "आता संघटित ट्रोल्सला विकत घेतलं जातं एका ट्वीटसाठी 10 ते 100 रुपये मोजले जातात. एखाद्याला हैराण करण्यासाठी हे केलं जातं. त्याच्या आता रितसर एजन्सी आहेत आणि हे आता जगभरात होतं"
पण प्रतिक सिन्हा यांना मात्र यामागे लोकांना प्रसिद्ध होण्याची लागलेली ओढही असते. "ट्रोलच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याची नशा सुद्धा लोकांमध्ये कधीकधी असते. टिकटॉक स्टार न्यूजमध्ये येत नाही पण त्याला आमदारकीचं तिकीट मिळाल्याची उदाहरण आहेत की आपल्याकडे."
लोक ट्रोलिंग का करतात?
जे प्रत्यक्षात बोलता येत नाही ते ऑनलाईन बोललं सोपं जातं म्हणून लोक ट्रोलिंगसाठी त्याचा वापर करतात असं तज्ज्ञांना वाटतं. लोक ट्रोलिंग का करतात, त्यामागे त्यांची भावना काय असले याबाबत बीबीसी बाईटसाईजनं काही तज्ज्ञ आणि पीडितांशी चर्चा केली.
लक्ष वेधून घेण्यासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी, दुःख देण्यासाठी, तसंच मनोधैर्य खच्ची करण्यासाठी लोक ट्रोलिंगचा शस्त्र म्हणून वापर करतात. त्यातून त्यांना कधीकधी मानसिक समाधान मिळतं.
बीबीसी बाईटसाईच्या लेखानुसार ट्रोल करणाऱ्यांचे 2 प्रकार असतात.
पहिला प्रकार जे प्रसिद्धीचे भुकेले असतात आणि दुसरा प्रकार ज्यांना ट्रोल केल्यामुळे कुणालातरी हानी पोहोचवल्याचं समाधान मिळतं.
लोक असं का वागतात याविषयी डॉ. मार्क ग्रफिट्स सांगतात, "लोक इतरांना ट्रोल करतात कारण त्यांना कशातरी बदला घ्यायचा असतो. कधीकधी त्यांना लक्ष वेधून घ्यायचं असतं. तर कधी ते कंटाळा घालवायचा असतो किंवा गंमत करायची असते."
डॉ. मार्क ग्रफिट्स हे युकेतल्या नॉटिंग्घम ट्रेन्ट विद्यापीठात Behavioural Addiction या विषयाचे प्रोफेसर आहेत.
कधी कधी ट्रोल करणारे अशा लोकांना ट्रोल करतात जे यशस्वी झालेले असतात, जे त्यांच्या आयुष्यात सुखी असतात. कारण ट्रोल करणाऱ्यांकडे ते नसतं.
तसंच कधीकधी त्यांना त्याच्यातली नकारात्मकता दुसऱ्यावर ढकलायची असते म्हणून ट्रोल करातात.
पण ट्रोलिंग सहन करणारी माणसं यामुळे दुखावली जातात. त्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो.
तुम्हाला ट्रोल केलं जात असेल तर काय कराल?
- ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊ नका
- शक्य झाल्यास त्यांना ब्लॉक करा
- तुम्ही टार्गेट व्हाल असं काही पोस्ट करू नका
- काही काळ सोशल मीडियापासून दूर राहा
- ट्रोलिंग फारच अर्वाच्य आणि विचित्र असेल तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि पोलिसात त्याची तक्रार द्या
ट्रोलिंग रोखता येणं शक्य आहे?
संघटित ट्रोलिंग काही प्रमाणात रोखता येणं शक्य असल्याचं निखील पहावा यांना वाटतं. त्यासाठी त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून काही मागण्यासुद्धा केल्या आहेत.
ते सांगतात, "लोकांवर होणारे ट्रोलिंगचे अॅटॅक हे डेटानुसार होतात. जर राजकीय पक्ष कुणाला त्याचं कंत्राट देत असतील तर त्यांची माहिती सार्वजनिक केली जावी. तसंच लोकांचा जो डेटा वेगवेगळ्या पद्धतीनं गोळा केला जातो तो डिलिट करण्याचा त्यांना अधिकार देणार कायदा आणला जावा," अशी मागणी निखील पाहावा करतात.
भारतात ट्विटरवरून होणाऱ्या ट्रोलिंगला रोखण्यात ट्विटरला अपयश आल्याचंही निखील पाहावा यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)