कोरोना व्हायरस : 'वंदे भारत' मोहीम सुरू, परदेशात अडकलेल्या 2 लाख भारतीयांना परत आणलं जाणार

लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले हजारो भारतीय आता मायदेशी परतणार आहेत. परदेशातून त्यांना आणण्यासाठी 60 हून अधिक विमानं पाठवण्यात आली होती ती आज मायदेशी परतणार आहेत.

12 विविध देशांमध्ये अडकलेले जवळपास 15 हजार भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं पुढच्या काही दिवसांमध्ये परत आणलं जाणार आहे.

या प्रवाशांना प्रवास भाडं द्यावं लागणार असून भारतात पोहचल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. विमान आणि नौसेनेच्या जहाजांनी त्यांना परत आणण्यात येणार आहे.

भारताकडून लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी मार्चमध्येच सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली होती. तेव्हापासून केवळ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी काही उड्डाणं सुरु केली. पण मोठ्या संख्येने परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची ही वंदे भारत मोहीम आतापर्यंतच्या मोहिमांपैकी सर्वात मोठी नियोजित मोहीम आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार साधारण 2 लाख भारतीयांना परत आणलं जाईल. जर ही मोहीम यशस्वी झाली तर 1990 नंतर भारताने राबवलेली सगळ्यांत मोठ्या स्थलांतराची मोहीम ठरेल. 1990 मध्ये आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असताना तब्बल 1 लाख 70 हजार भारतीयांना कुवेतमधून परत भारतात आणलं गेलं होतं.

या मोहिमेचे नियोजन एअर इंडिया करत आहे. अमेरिका, यूके, सौदी अरेबिया, सिंगापूर, कतार आणि मलेशिया या देशांमध्ये भारत विमानं पाठवणार आहे. एकट्या दुबईत 1 लाख 97 हजार भारतीयांनी अर्ज केले आहेत.

केरळमधील कोचीमध्ये सर्व प्रवाशांना उतरवण्यात येईल. त्यानंतर त्यांचा ताबा राज्यांना दिला जाईल.

तसंच भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसतील तरच त्यांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यांना प्रवासाचा खर्च स्वत:च करावा लागणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक विमानात 200 ते 250 प्रवासी असतील. विमानातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायची आहे. सर्व प्रवाशांना मास्क वापरणं बंधनकारक आहे तसंच सुरक्षित अंतर राखूनच सर्व प्रक्रिया पार पाडायची आहे.

विमानातही विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. जर एखाद्या प्रवाशात प्रवासादरम्यान लक्षणं दिसली तर त्याला तातडीने विमानातील विलगीकरण कक्षात हलवलं जाईल.

भारतात पोहचल्यानंतर सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. प्रत्येकाला 14 दिवस क्वारंटाईन होण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारं हॉस्पिटल्समध्ये बेड्सची व्यवस्था करत आहेत.

अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि वैद्यकीय उपचाराची तात्काळ गरज असलेल्या व्यक्तींना भारतात आणण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल.

भारतीय नौदलाच्या लढाऊ जहजांचाही प्रवाशांना आणण्यासाठी वापर केला जाणार आहे. सध्या दोन जहाजं मालदिवची राजधानी माले इतं गेली आहेत. पहिल्या टप्प्यात मालेमध्ये अडकलेल्या 1 हजार भारतीयांची सुटका करण्यात येणार आहे.

परदेशातील भारतीयांना स्थानिक दुतावासांच्या संपर्कात राहण्याचं आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)