You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: 'बातमीसाठी फिल्डवर गेल्यानंच लागण झाली, पण बाहेर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता'
कोरोना व्हायरसचं हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत काही पत्रकार पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर महापालिका प्रशासनानं माध्यमांमधील प्रतिनिधींच्याही चाचण्या घेण्याचं ठरवलं.
16 एप्रिल 2020 रोजी माध्यमांमधील जवळपास 170 जणांच्या चाचण्यात घेण्यात आल्या. 15 आणि 16 एप्रिल रोजी या चाचण्यांचे अहवाल आले. त्यात एकूण 53 जणांना लागण झाल्याचे आढळले. अनेकांना धक्का बसला.
यातल्याच एका माध्यम प्रतिनिधीशी बीबीसी मराठीनं संवाद साधला आणि पॉझिटिव्ह आल्याचं कळल्यापासूनचा आतापर्यंत प्रवास जाणून घेतला. माध्यम प्रतिनिधीचं मनोगत जसंच्या तसं आम्ही इथं देत आहोत :
कोरोनाचं संकट भारतात आणि त्यातही मुंबईत आल्यानंतर बऱ्याचवेळा यासंबंधीच्या बातम्या कव्हर केल्या. पण मला कोरोनासारखी लक्षणं कधीच जाणवली नव्हती.
दहा-पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. पहाटे झोपेतून उठल्यावर छातीत दुखत होतं. पण थोड्या वेळात ते थांबलं आणि झोपही लागली. त्यामुळं मी ते दुखणं फारसं मनावर घेतलं नाही.
दरम्यानच्या काळात म्हणजे अगदी गेल्याच आठवड्यात माध्यमांमधील पत्रकारांच्याही चाचण्या घेण्याचं मुंबई महापालिकेनं ठरवलं. त्यानुसार 16 एप्रिलला म्हणजे गुरुवारी चाचण्या झाल्या. त्यात माझीही चाचणी झाली.
त्यानंतर तीन दिवासांनी म्हणजे रविवारी माझ्या घशात खवखवायला लागलं. तेही अगदी थोडंच. पण खवखवतंय, हे कळत होतं. पण तेही फार मनावर घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (20 एप्रिल) सकाळी रिपोर्ट येणार होते.
माझा रिपोर्ट सोमवारी दुपारी येणार होता. काहींचे रविवारीच आले होते.
'मी काही सेकंद पूर्णपणे ब्लँक झालो. काहीच कळेनासं झालं.'
सकाळपासूनच माध्यमांच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अनेकजण फिल्डवर होते. माझा सहकारी आणि मला बऱ्याच जणांचे फोन यायला लागले. माध्यमातील कोण कोण पॉझिटिव्ह आल्याचे अनेकजण सांगू लागले. पॉझिटिव्ह आलेल्या पत्रकारांना रात्रीच हॉस्पिटलमध्ये नेल्याचंही कळलं.
दुपार व्हायला आली तरी आम्हाला काही फोन आला नाही. त्यामुळं मग मी माझ्या सहकाऱ्याला म्हटलं, आपले रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील. त्यामुळं आम्ही थोडं निश्चिंत होतो.
दुपारी 12 वाजल्यानंतर आम्ही रिपोर्ट घ्यायला जाणार होतो. त्याच दिवशी एका बातमीसाठी प्रतिक्रिया घ्यायची होती. म्हणून तिकडे जात असताना, मुंबई महापालिकेकडून मला फोन आला.
महापालिकेकडून सांगण्यात आलं, "तुमचा कोव्हिड-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय."
त्यांचं हे वाक्य ऐकून मी काही सेकंद पूर्णपणे ब्लँक झालो. काहीच कळेनासं झालं.
तातडीनं महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल की काय, पुढे प्रक्रिया काय असेल, यासाठी त्यांना फोन करत होतो. पण त्यांचा फोन सातत्यानं व्यस्त येत होता. मग मी घरी गेलो.
मुंबईत घरी एकटाच राहत असल्यानं तसा काही त्रास नव्हता. माझ्या घरचे सर्व गावी राहतात. मुंबईत ज्यांच्याकडे राहतोय, ते कुटुंबही काही दिवसांपूर्वीच मुंबईबाहेर गेले होते. तरीही माझी जबाबदारी म्हणून त्यांना माझ्या संसर्गाबाबत कल्पना दिली. ते म्हणाले, "तू काळजी करू नकोस. तू उपचार घे, बरा होऊन परत ये. आमच्याच घरी राहायला ये."
हे फारच दिलासादायक होतं. इमारतीतल्या लोकांनीही माणुसकीचं दर्शन घडवलं.
इतरत्र जशा बातम्या येतायत, तसं कुणीच नकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं. स्वत:हून महापालिकेत संपर्क करून इमारतीत फवारणी करून घेतली.
त्यानंतर ऑफिसमध्येही तातडीनं कळवलं. तर कळलं की, आणखी काही सहकाऱ्यांना लागण झाली आहे.
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
मुंबईतील आम्हा एकूण 53 पत्रकारांना लागण झाली. बहुतांश जणांशी चर्चा केली आणि पुढे काय करायचं ते ठरवलं. आधी खासगी रुग्णालयात जाण्याचा विचार केला, मात्र खर्च खूप होता.
आमच्यातील अनेकांचं असंही मत होतं की, आमच्या उपचाराचा खर्च ऑफिसनं उचलायला हवा. कारण फिल्डवर बातम्या कव्हर करत असताना लागण झाली होती. पण तसं काही झालं नाही.
हा सगळा विचार करत असतानाच कळलं की, महापालिकेनं गोरेगावातील हॉटेलमध्ये आमच्यासाठी अलगीकरण कक्षाची सोय केलीय. त्यानुसार आम्ही सगळे गोरेगावला गेलो. पण त्या हॉटेलला महापालिकेनं आधीच कळवलं नव्हतं. म्हणून दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो, तिथं एक रात्र थांबलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पुन्हा गोरेगावच्या हॉटेलवर आलो. इथंही व्यवस्था चांगली आहे.
प्रत्येकाला एक रुम आहे. वेळेवर जेवण येतं. महापालिकेचेच कर्मचारी आमची काळजी घेतायत. सकाळ-संध्याकाळी फोन करून विचारपूस केली जाते. कुठली लक्षणं जाणवतायेत का, हे विचारलं जातं. हॉटेलच्या खाली वैद्यकीय कॅम्प उभारण्यात आलाय. तिथं डॉक्टर आणि नर्स आहेत. ते फोन करून विचारपूस करतात.
आमच्यातील पॉझिटिव्ह आलेल्या पत्रकारांपैकी ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, आधी कुठल्या कारणास्तव शस्त्रक्रिया झाल्यात, त्यांना दुसऱ्या खासगी हॉस्पिटलला हलवलंय. इथं हॉटेलवर असणाऱ्यांना सौम्य लक्षणं आहेत.
व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिल्यात. दोनवेळा नाश्ता, दोनवेळा जेवण, हळदीचं दूध इत्यादी गोष्टी वेळेवर पुरवल्या जातात. काही राजकीय नेत्यांनी फोन करून आमची चौकशीही केली.
'पाच दिवस झाले, मला कोरोना झाल्याचं आई-बाबांना अजूनही सांगितलं नाहीय'
आज पाच दिवस झाले. माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे मी अजूनही आई-बाबांना सांगितलं नाहीय. भावाला सांगितलंय. तो फोन करून नियमित चौकशी करतो.
पत्रकारांना कोरोना झाल्याच्या बातम्या पाहिल्यावर आई-बाबांनी काळजीनं फोन केला होता. पण त्यांना सांगितलं, काही पत्रकारांना लागण झालीय म्हणून आम्हाला सुट्टी दिलीय. त्यांना खरं सांगितलं तर ते काळजीत पडतील. बरं होत आल्यावर की हळूहळू त्यांना सांगेन.
इथं रुममध्ये दिवसभर एकटं असतानाही काही विचारही डोक्यात येऊन जातात. अनेकजण फोन करतात. माध्यमातीलच काही जणांनी असंही म्हटलं की, फिल्डवर जायला कुणी सांगितलं होतं?
पण माझं म्हणणं असतं की, आम्हाला कुठेही जाण्यासाठी चॅनेलनं जबरदस्ती केली नाही. मास्क, सॅनिटायझर, बूमसाठी मोठी काठी अशा बऱ्याच गोष्टी चॅनेलनं दिल्या. तीन-चार दिवस सुट्ट्या देऊन काम सुरू होतं. बातम्यांसाठी फिल्डवर बाहेर पडणं गरजेचंच होतं. त्याला पर्याय काय?
माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याच्या आधी काही दिवस मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी गेलो होतो. पण संसर्ग नेमका कुठे झाला, हे नेमके सांगता येणारा नाही. बातमीच्या निमित्तानं फिल्डवर असताना ते कसं कळेल ना?
'दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह येईल असं मनातून वाटतंय'
घरापासून दूर राहण्याची तशी सवय आहे. इथं पाचच दिवस झालेत, त्यामुळं तसा एकटेपणा जाणवत नाही. पण अगदीच एकटेपणा वाटला, तर गाणी ऐकतो, टीव्ही आहे, कुणाचं फोन आला तर बोलतो. खिडकीतून बाहेर पाहतो. बाहेर झाडं, पोलिसांची सुरक्षा दिसते. येणारी-जाणारी माणसं खिडकीतून दिसतात. मनात विचार येऊन जातो की, आपणही असेच मास्क लावून फिरत होतो, काळजी घेत होतो.
पुरेशी झोप झाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, असं एकानं सांगितलं. मग पुरेशी झोप घेतो. खाणं-पिणं व्यवस्थित ठेवतो.
पुढच्या रिपोर्टची थोडी मनात भीती आहे. पण पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, असं मला मनातूनच वाटतंय. कारण माझ्यातली लक्षणं आता कमी झाल्याचं माझं मलाच वाटतंय. पण कधी कधी बातम्या पाहिल्यावर क्वचित मनात येऊनही जातं की, हे वाढू शकतं वगैरे. पण बरा होईन असं अधिक प्रकर्षानं वाटतं.
काल दुसरी चाचणी झालीय. त्यातले रिपोर्ट काय येतील, याची वाट पाहतोय. धाकधूक आहे, पण रिपोर्ट निगेटिव्ह येतील, असंही मनातून वाटतंय....
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)