रोहित पवार: महाराष्ट्र कोरोना व्हायरसशी लढतंय, भाजपला राजकारणाचं पडलंय #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ROHIT RAJENDRA PAWAR/FACEBOOK
वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सचा घेतलेला आढावा.
1. रोहित पवार - राज्य कोरोनाशी लढतंय, भाजपला राजकारणाचं पडलंय
'कोरोना'च्या संकटकाळात विरोधकांनी एकजूट दाखवावी आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे. 'टीव्ही9'ने ही बातमी दिली आहे.
'राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलं आहे. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात, तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा!' असा सल्ला रोहित पवार यांनी ट्विटरवरून दिला आहे.
आज एकीकडे भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे
2. उमा भारती - उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल
"पालघरची घटना अत्यंत दुर्देवी आहे. मी ही घटना कधीही विसरू शकणार नाही. 70वर्षीय संताला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने प्रचंड दु:ख झालं आहे. व्हीडिओमध्ये गुन्हेगार स्पष्ट दिसत आहेत. पोलीसही दिसत आहेत. तरीही हे महापाप झालं. उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल," असं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी म्हटलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Social media
जुन्या आखाड्यासोबत जवळचे संबंध आहेत. देशाने या घटनेची निंदा करायला हवी, असं त्या पुढे म्हणाल्या.
पालघरपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर गडचिंचले गावात जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान कोणीही याप्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये, हे सगळं गैरसमजूत, अफवा यातून घडलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

3. उमर खालीद आणि सहकाऱ्यांवर UAPAअंतर्गत गुन्हा दाखल
काही महिन्यांपूर्वी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालीद याच्यासह मीरन हैदर आणि सफूरा झरगर यांच्यावर UAPA अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
'फर्स्ट पोस्ट'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
झरगर जामिया कोऑर्डिनेशन कमिटीचा माध्यम समन्वयक आहे तर हैदर कमिटीचा सदस्य आहे. 35 वर्षीय हैदर पीएचडी स्टुडंट असून, आरजेडीच्या दिल्ली युथ विंगचा अध्यक्ष आहे. झरगर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात एमफिलचा विद्यार्थी आहे. खलीदने दोन ठिकाणी प्रक्षोभक भाषणं केल्याचा आरोप आहे.

फोटो स्रोत, facebook
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत पारित झाल्यानंतर, पोलीस जेएनयू कॅम्पसमध्ये घुसल्याचा आरोप आहे.
24 फेब्रुवारीला दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून हिंसाचार झाला होता. यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता तर 200हून अधिकजण जखमी झाले होते.
4. ग्लोबल फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 142व्या स्थानी
रिपोटर्स विदाऊट बॉर्डर्स संस्थेच्या अहवालात ग्लोबल फ्रीडम इंडेक्समध्ये भारत 142व्या स्थानी आहे. 180 देशांमध्ये भारताचा हा क्रमांक आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
सातत्याने होणारं प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन, पोलिसांचा पत्रकारांवर होणारा हिंसाचार, राजकीय तसंच समाजकंटकांद्वारे मिळणाऱ्या धमक्या यामुळे भारताची घसरण झाली आहे. हिंदू राष्ट्रवादी विचारांशी नाळ जोडलेली असण्याचा माध्यमांवर दबाव आहे.
5. फेसबुक जिओत 43,574 हजार कोटींची गुंतवणूक करणार
जगातील सगळ्यात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतर्फे देण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, फेसबुक जिओत 9.9 टक्के समभागासाठी 43, 574 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. 'अमर उजाला'ने ही बातमी दिली आहे.
या निर्णयानंतर फेसबुक जिओ कंपनीच्या सगळ्यात मोठी समभागधारक कंपनी आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचं मूल्यांकन 4.62 लाख कोटी रुपये झाली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








