कोरोना व्हायरस: मुस्लीम कुटुंबाने घरचे लाईट बंद केले नाही म्हणून लोकांनी केली मारहाण

    • Author, अश्विनी शर्मा आणि सत सिंह
    • Role, बीबीसीसाठी

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर देशातल्या मुस्लीम समाजाला भेदभावाचा सामना करावा लागतोय. अनेक मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येतंय.

निझामुद्दीनमध्ये आयोजित मरकज कार्यक्रमामुळं तबलीगी जमातच्या लोकांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय.

हिमाचल प्रदेशमधल्या ऊना जिल्ह्यातील बनगढ गावात धक्कादायक घटना घडलीय. या गावातल्या 37 वर्षीय मोहम्मद दिलशाद यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

काही दिवसांपासून मोहम्मद दिलशाद यांना गावातल्या इतर लोकांचे टोमणे आणि भेदभावाला सामोरं जावं लागत होतं.

हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक एस आर मरडी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी हे स्षष्ट केलं की, "दिलशाद यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण तरीही त्यांना सामाजिक भेदभाव आणि बहिष्कार सहन करावा लागला."

दिलशादचे भाऊ गुलशन मोहम्मद यांनी म्हटलं, "दिलशाद पूर्णपणे निर्दोष होता. त्याला गावकऱ्यांच्या सततच्या टोमण्यांनी खूप दुःख झालं होतं. गावकऱ्यांना वाटत होतं की हा आपल्या गावात कोरोना व्हायरस घेऊन आला आहे. दिलशादची चूक फक्त इतकीच होती की तो अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आला होता, जो तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून परतला होता आणि गावातल्या एका मशिदीत थांबला होता."

बनगढच्या सरपंच प्रोमिला यांनी म्हटलं की घडलेली घटना अतिशय वाईट आहे.

"पोलीस या घटनेची पुढे चौकशी करत आहेत. पण मला वाटत की दिलशाद यांना खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. ते चांगले गृहस्थ होते आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचे. त्यांनी असा निर्णय का घेतला हे सांगणं अवघड आहे," असं सरपंच प्रोमिला म्हणतात.

विजेचे दिवे बंद न केल्यानं हल्ला

दुसरीकडे हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन घरातले वीजेचे दिवे बंद न केल्यानं चार मुस्लीम व्यक्तींवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना ठाठरथ गावातली आहे.

या हल्ल्यात 36 वर्षांचे बशीर खान, 34 वर्षांचे सादिक खान, 32 वर्षांचे नजीर खान आणि 30 वर्षीय संदीप खान हे चार भाऊ जखमी झाले आहेत. सध्या जिंदमधल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्याचे मुख्य महानिरीक्षक अश्विन शेन्वी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या प्रकरणी चार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक केली आहे.

'शिवीगाळीचं कारण विचारलं असता हल्ला केला'

बशीर खान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 5 एप्रिलला रात्री 9 वाजता ते पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचं पालन करत होते. पण तेव्हा घराबाहेरचा बल्ब बंद न केल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली.

दोन्ही गटांमध्ये भांडणही झाल्याचं ते मान्य करतात. पण त्यानंतर सर्व सुरळीत झालं. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांच्या हिंदू शेजाऱ्यांना शिवीगाळीचं कारण विचारलं, तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

यानंतर डझनभर शेजाऱ्यांनी शेजारी खुर्चीवर बसलेला त्यांचा भाऊ सादिक खान यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केला आणि यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

"आम्हा चारी भावांच्या हात, पाय, चेहरा आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. धाकट्या भावाची परिस्थिती गंभीर आहे," बशीर सांगतात.

हिंदू शेजाऱ्यांनी वाद उकरून करण्याची ही पहिली वेळ नसल्याचंही बशीर म्हणतात. दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये झालेल्या धार्मिक संमेलनानंतर त्यातले अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची गोष्ट समोर आली, तेव्हाही त्यांचे शेजारी आणि त्यांच्यात भांडण झालं होतं. शेजाऱ्यांचं म्हणणं होती की निझामुद्दीनहून आलेल्या लोकांना बशीर यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता, बशीर नमूद करतात.

दुसरीकडे या भावांचे शेजारी संजय कुमार यांच्या मते, या भावांनी पंतप्रधानांच्या दिवे मालवण्याच्या आवाहनाला मान न दिल्यांमुळे वाद झाला.

ते म्हणतात, "आसपासच्या सगळ्यांनी आपल्या घरातले लाईट बंद केले होते, पण या भावंडांनी असं केलं नाही. आम्ही त्यांना बल्ब स्वीच ऑफ करायला सांगितलं. पण ते आमच्याशी भांडायला लागले. बाहेरून आलेल्या एका व्यक्तीलाही त्यांनी आपल्या घरात ठेवल्याचं आम्ही पाहिलं. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी आमच्याशी वाद घातला," ते सांगतात.

गावाचे प्रमुख रामकेश कुमार म्हणतात की, जर सगळ्या लोकांनी आपल्या घरातले सगळे वीजेचे दिवे बंद केले असते, तर हिंदू आणि मुस्लीम कुटुंबांमधला हा वाद टाळता आला असता.

"रविवारी रात्री यांच्यात फक्त वाद झाला होता, पण सोमवारी सकाळी मारामारी झाली. आम्ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलो. पण तोवर काही लोक जखमी झाले होते," असं ते सांगतात.

या गावात जवळपास दोन हजार हिंदू तर 20 मुस्लीम कुटुंब आहेत.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी राकेश कुमार सांगतात की, "मुस्लीम कुटुंबानं पंतप्रधानांच्या आवाहनानुसार दिवे लावले होते. पण घराबाहेरचा एक बल्ब बंद करणं राहून गेलं होतं. या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)