मध्य प्रदेश : आमदारांना डांबून ठेवलं जाऊ नये- सर्वोच्च न्यायालय

दिग्विजय

फोटो स्रोत, TWITTER/DKSHIVAKUMAR

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे. आज सुप्रिम कोर्टासमोर सुरु असलेल्या खटल्यामध्ये न्यायाधीशांनी आमदारांना डांबून ठेवण्यात येऊ नये असं मत व्यक्त केलं. या प्रकरणाची सुनावणी उद्याही चालणार आहे.

काँग्रेसतर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी काँग्रेसच्या आमदारांचे भाजपाने अपहरण केल्याचा युक्तीवाद केला. तसेच हे सरकार पाडण्याचा भाजपा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरयान आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी बंगळुरूमध्ये पोहोचले.

काँग्रेसचे 21 आमदार 10 मार्चपासून बंगळुरूमधल्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. दिग्विजय सिंह हे या आमदारांना भेटण्यासाठीच बंगळुरूमध्ये पोहोचले होते. मात्र त्यांना हॉटेलमध्ये जाण्यापासून अडवलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी हॉटेलच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर बंगळुरू पोलिस त्यांना डीसीपी ऑफिसमध्ये घेऊन गेले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या संपूर्ण प्रकाराबद्दल दिग्विजय सिंह यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्यांची भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे बेंगळुरु पोलिसांनी म्हटलं, की आमदारांचा खासगीपणा जपण्यासाठी दिग्विजय सिंह यांना रोखण्यात आलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये तातडीनं बहुमत चाचणी घेण्यात यावी, ही मागणी करणाऱ्या भाजपच्या याचिकेवर मंगळवारी (17 मार्च) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश विधानसभेच्या सभापतींना त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं आहे. त्यासाठी बुधवार (18 मार्च) सकाळी 10.30 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी सोमवारी (16 मार्च) मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र पाठवून 17 मार्चला बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं होतं.

"17 मार्च 2020 रोजी विधानसभेत बहुमत चाचणी घेऊन बहुमत सिद्ध करावं. अन्यथा, तुमच्याकडे बहुमत नाही, असं गृहित धरलं जाईल," असा इशाराच राज्यपाल लालजी टंडन यांनी दिला होता.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

यावर कमलनाथ सरकारमधील मंत्री पीसी शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, "राज्यपालांनी असं अचानक पत्र दिल्यावरुन लक्षात येतंय की, त्यांच्यावर दबाव आहे."

कमलनाथ सरकार राहणार की नाही, हे ठरवण्यात आज जणांची भूमिका महत्त्वाची असेल. ते म्हणजे, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि कोर्ट.

यातील प्रत्येकीच भूमिका काय असू शकेल, हे आपण जाणून घेऊया.

राज्यपालांची भूमिका

जेव्हा कधी केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असतं, त्यावेळी सर्वांचं लक्ष राज्यपालांकडेच असतं. भोपाळस्थित राजभवनात यावेळी भाजपचे जुनेजाणते नेते लालजी टंडन हे राज्यपाल म्हणून विराजमान आहेत.

राजकीय वर्तुळात असा अंदाज बांधला जातोय की, मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार बरखास्त करून राज्यपाल नव्या सरकारला शपथ देऊ शकतात.

घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप सांगतात, "मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे आहेच. मात्र, ते असं करतील की नाही, हा राजकीय प्रश्न आहे. सर्वच राजकीय पक्ष फायदा-तोटा पाहत आहेत."

मात्र, सेंटर फॉर लिगल पॉलिसीचे सिनियर रेसिडंट फेलो आलोक प्रसन्ना हे सुभाष कश्यप यांच्याशी सहमत होत नाहीत. ते म्हणतात, "राज्यपाल विद्यमान सरकारला बरखास्त करू शकत नाहीत. कारण त्यासाठी त्यांना आधी बहुमत चाचणी घ्यावी लागेल. एसआर बोम्मई प्रकरणात सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलंय की, राज्यपालांना असं करण्याचा अधिकार नाही."

विधानसभा अध्यक्षांचे अधिकार

मध्य प्रदेशातील सद्यस्थिती पाहिल्यास विधानसभा अध्यक्षांची भूमिकाही महत्त्वाची मानली जातेय. एन. पी. प्रजापती हे मध्य प्रदेशच्या विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

विद्यमान विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 22 बंडखोर आमदारांपैकी सहा आमदारांचे राजीनामे मंजूर केले आहेत. मात्र, इतर 16 आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारले नाहीत.

आमदार स्वत:हून राजीनामा देऊ इच्छित आहेत, हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत राजीनामा स्वीकारणार नसल्याची भूमिका विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे.

"आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्षाला काही मर्यादित कालावधी आखून दिलेला नसतो. कर्नाटक प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नमूदही केलं होतं, की विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. मात्र त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांना विश्वास निर्माण झाला पाहिजे, की आमदार स्वत:हून राजीनामे देतायत. आता आमदार स्वेच्छेने राजीनामा देतायत, हे ठरवण्याचा अधिकारही विधानसभा अध्यक्षांकडेच असतो," असं सुभाष कश्यप म्हणतात.

अशावेळी राज्यपाल किंवा कोर्ट विधानसभा अध्यक्षांना काही आदेश किंवा सूचना देऊ शकतात का?

याबाबत सुभाष कश्यप सांगतात, "बहुमत चाचणी घेण्याचे आदेश कोर्ट देऊ शकतो. मात्र, आमदारांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत कोर्ट कोणतेच आदेश देऊ शकत नाही. कारण जोपर्यंत आमदार स्वेच्छेने राजीनामा देतायात, हे विधानसभा अध्यक्ष ठरवत नाही, तोपर्यंत कुणीच हस्तक्षेप करू शकत नाही."

कोर्ट काय करु शकतं?

मध्य प्रदेशातील सत्तापेच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मध्य प्रदेशातील वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात नेलाय. दुसरीकडे, काँग्रेसही कोर्टात संपूर्ण ताकद लावू शकते. त्यामुळं अर्थात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे की, कोर्टाची भूमिका काय असेल?

कोर्टाच्या भूमिकेबाबत आलोक प्रसन्ना म्हणतात, "राज्यपालांच्या आदेशाबाबत कोर्ट काय म्हणतं, हे पाहावं लागेल. सुप्रीम कोर्टसुद्धा कोरोना व्हायरसमुळं नेहमीप्रमाणे काम करत नाहीये. मला वाटतंय, कोर्ट म्हणेल की सध्या स्थिती असमान्य आहे."

"कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोर्टानं जसं केलं, तसंच मध्य प्रदेशात 48 तासात बहुमत चाचणी करावी लागेल. मात्र, सर्व खबरादारी घ्यावी लागेल. आता हे पाहावं लागेल की, कोर्ट कोणती खबरदारी घ्यायला सांगतंय. कोर्ट दोन आठवड्यांची मुदतही देत नाहीय. कोर्ट विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यास सांगणार नाही. मात्र, हे नक्कीच सांगेल की, आमदारांना घेऊन या, बहुमत सिद्ध करा आणि परत जा."

कोर्टात काय होऊ शकतं, यावर सुभाष कश्यप म्हणतात, "बहुमत चाचणी टाळण्यासाठी हे कारण दिलं जाऊ शकत नाही की, आमदारांचे राजीनामे स्वेच्छेने आहेत की नाही, याचा अद्याप निर्णय झाला नाहीय. कारण विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आमदारांच्या उपस्थितीबाबत कुठलीच अट नाहीय."

"10 किंवा 12 आमदार उपस्थित नसले, तर काहीच फरक पडत नाही. केवळ सभागृहाचं कोरम पूर्ण असलं पाहिजे. सभागृहात उपस्थित आमदारच बहुमत चाचणीत भाग घेऊ शकतात. त्यामुळं सर्वच आमदारांनी हजर असलंच पाहिजे, याची काही गरज नाहीय," असं कश्यप सांगतात.

सोमवार (16 मार्च) मध्य प्रदेशच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ झाल्यामुळं 26 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर संकटात आलेल्या कमलनाथ सरकारचा फैसला होऊ शकला नाही.

एकूण 228 सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसकडे आता 95 आमदारांचीच ताकद आहे तर भाजपकडे 107 आमदारांचं पाठबळ आहे. 

यापूर्वीच काँग्रेसच्या 22 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)