कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण हॉस्पिटलमधून पळून का जात आहेत?

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

नागपुरातल्या मेयो रुग्णालयातून 14 मार्च रोजी कोरोना व्हायरसचे चार संशयित रुग्ण पळून गेले होते. पोलिसांनी त्यांचा तातडीनं शोध घेत पकडलं. त्यांची चाचणी घेण्यात आली आणि यातील कुणालाच कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं.

पळालेले संशयित रुग्ण सापडले असले, तरी या घटनेनं नव्या प्रश्नांना वाचा फोडलीय - रुग्णालयातून रुग्ण पळून का जातात? हॉस्पिटलला जायची, उपचार घ्यायची भीती कशासाठी?

डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांशी बातचीत करून बीबीसी मराठीनं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी नागपुरात नेमकं काय झालं, हे थोडक्यात पाहूया.

नागपुरात नेमकं काय झालं?

14 मार्च 2020 रोजी कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांनी हॉस्पिटलमधून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून शनिवारी कोरोनाच्या चार संशयित रुग्णांनी पळ काढला. पोलिसांनी तातडीनं शोध सुरू केला आणि चारही जण आपापल्या घरी आढळून आले.

मेयो रुग्णालयात कोरोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून निघून गेले.

हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या बहाण्याने एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले आणि पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेनंतर नागपूरच्या मेयो शासकीय हॉस्पिटलमधील ज्या वॉर्डात कोरोनाग्रस्त रुग्ण आणि संशयित रुग्ण ठेवण्यात आलेत, त्या वॉर्डबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

या चारही जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. मात्र या घटनेमुळं अनके प्रश्नांनी तोंड वर काढलं.

लोक पळून का जातात?

रुग्ण हॉस्पिटलमधून पळून का जातात? वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं लोक सध्या घाबरलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत पुरेशी माहिती पोहोचलेली नाही.

मानसोपचार तज्ज्ञ अक्षता भट सांगतात की कोरोना व्हायरसची जसजशी नवनवी माहिती समोर येतेय, आकडेवारी समोर येतेय, त्यामुळं लोकांमध्ये भीती निर्माण होऊ लागलीय.

कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेले लोक पळण्याची तीन कारणं अक्षता भट सांगतात :

  • आपली ओळख उघड होईल, अशी भीती लोकांना वाटते. कारण अशा संशयितांवर हल्ला होण्याची भीती असते.
  • कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुढे काय? कुटुंबापासून किती काळ दूर राहावं लागेल, याची चिंता वाटू लागते.
  • आपल्याला क्वॉरंटाईन केल्यानंतर आपल्यावर काही प्रयोग केले गेले तर? अजून उपचार नाहीत, मग क्वॉरंटाईनमध्ये ठेवून नक्की काय करणार? अशा शंका लोकांच्या मनात असल्याच्या दिसतात.

मात्र, त्याचवेळी अक्षता भट म्हणतात, "डॉक्टरांनी चाचणी करण्यास सांगितल्यास चाचणी करून घ्यायला हवी. याचं कारण, तुमच्यामुळं इतरांना लागण होऊ शकते. स्वत:बरोबर इतरांचाही विचार करायला हवा. शिवाय, चाचणी केल्यास आपल्याही मनातील भीती निघून जाईल."

'क्वॉरंटाईनबाबत जनजागृतीची आवश्यकता'

लोकांमध्ये अशी भीती निर्माण होण्यात सरकारचा थोडा दोष आहे, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांतात.

"क्वॉरंटाईन म्हणजे काय असतं? तिथे काय केलं जातं? ते कसं तुमच्या जीवाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, इत्यादी गोष्टी लोकांना समजावून सांगण्यास सरकार कमी पडलं. तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून तुम्हाला अलिप्त ठेवतोय, हे लोकांना जाहीर सांगितलं गेलं पाहिजे. गेल्या काही दिवसात नेमकी हीच गोष्ट स्पष्ट झाली नाहीय," असं ते सांगतात.

पण भोंडवे यांचा हा आक्षेप राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे फेटाळतात.

बीबीसी मराठीशी बोलताना टोपे म्हणाले, "कोरोनाविषयी लोकांना माहिती देण्यात सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांना चांगल्या सुविधा देण्यात येतील, असं सरकारचं धोरण आहे.

"दवाखान्यातून पळून गेलेल्या लोकांना आपल्याला काहीच झालं नाही, असं वाटतं. आपल्यात कोव्हिड-19ची लक्षणं दिसत नाहीत, तरीसुद्धा मला इथं ठेवलं आहे. त्यामुळे दहा-बारा दिवस आपण का थांबायचं, असंही त्यांना वाटत आहे.

"शिवाय काही लोकांना यादरम्यान कंटाळा येतो. त्यामुळे याबाबतीत त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी माणुसकीच्या नात्याने सोडवण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहेत. संशयित रुग्णांना टीव्ही, वर्तमानपत्र, चांगलं जेवण, अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची काळजी घेतली जाईल. पण तरीही काही लोक ऐकत नसतील तर त्यांना रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था त्याठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असंही टोपे म्हणाले.

मानसोपचार तज्ज्ञ अक्षता भट यांच्या मते कोरोना व्हायरसवर औषध अजून आलं नसल्यानं लोकांना अधिक भीती वाटतेय. "...कारण ज्यावर उपचार होऊ शकत नाही, त्या आजाराची लोकांना भीती असतेच. औषध आलं की भीती बऱ्याच प्रमाणात कमी होईल, हे निश्चित."

दरम्यान, कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणलं असताना पळून जाण्याची घटना महाराष्ट्रातील नागपुरातच घडली नाहीय, तर भारतात इतरत्र आणि भारताबाहेरही घडल्यात.

इटलीहून पतीसोबत बंगळुरूत परतलेल्या महिलेनं स्वत:ला वेगळं ठेवण्याऐवजी आग्र्यापर्यंत प्रवास केल्याचं उघड झालंय. ही महिला इटलीहून बंगळुरूत परतली होती.

पतीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली, त्यामुळं या दांपत्याला क्वॉरंटाईन करण्यात आलं. मात्र ही महिला बंगळुरूहून नवी दिल्ली आणि नंतर आग्र्याला गेल्याचं समजलं.

अशीच एक घटना इंडोनिशामध्ये घडल्याचंही वृत्त आहे. राजधानी जकार्तामधील हॉस्पिटलमधून कोरोना व्हायरसग्रस्त रुग्ण पळून गेल्यानंतर पोलीस या रुग्णाचा शोध घेतायत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)