You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप प्रवेशानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, 'काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला वाव नाही, मी व्यथित'
ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षात औपचारिक प्रवेश केला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात पुढे काय होणार हे स्पष्ट होऊ शकतं.
"राजकारण हे त्यासाठीचं माध्यम आहे. वडिलांनी तसंच गेल्या 18-20 वर्षात मी प्राणपणाने, श्रद्धापूर्वक राज्याची, देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. मन व्यथित आहे, दु:खी आहे. जनसेवेचं उद्दिष्टपूर्ती काँग्रेसच्या माध्यमातून होऊ शकत नाही. वर्तमानात काँग्रेसची स्थिती पूर्वीच्या काँग्रेससारखी राहिलेली नाही," असं ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटलंय.
काँग्रेसमध्ये वास्तवाचा इन्कार केला जातो. त्याच बळावर गोष्टी लिहिल्या जातात त्यांना भाव दिला जात नाही. तसंच काँग्रेसच्या कार्यपद्धतीत साचलेपण आलं आहे. पक्षात नव्या नेतृत्वाला मान्यता मिळत नसल्याचा त्यांनी आरोप सुद्धा केला आहे.
"मध्य प्रदेशात आम्ही एक स्वप्नं पाहिलं होतं. 18 महिन्यात सगळी स्वप्नं विखुरून गेली. शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेली नाहीत. अवकाळी पावसाची नुकसानभरपाई मिळालेली नाही. मनसौर हिंसाचारासंदर्भात मी सत्याग्रह केला होता. राज्यातला युवक असहाय्य आहे. जाहीरनाम्यात एक भत्ता देण्यात येईल सांगण्यात आलं होतं. भ्रष्टाचार रेतीमाफिया फोफावले आहेत. राष्ट्रीय स्तरावर विटंबना, राज्यात अशी ही स्थिती. मूल्याधिष्ठित चालणाऱ्या व्यक्तीला आगेकूच करणं अवघड," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.
जे. पी. नड्डांनी केले स्वागत
"राजमाता विजयाराजे शिंदे यांचं योगदान मोलाचं. त्यांनी पक्षाला दिशा दिली. जनसंघ आणि नंतर भाजपसाठी अविरत योगदान दिलं. आमच्यासाठी आमचा दिवस मोलाचा आहे. त्यांच्या नेतृत्वाची आम्हाला कल्पना आहे. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल याची खात्री वाटते. भाजप हा लोकशाही मूल्यं जपणारा पक्ष आहे," असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं.
मंगळवारी ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र त्यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केले आहे.
हे पत्र 9 मार्चला लिहिल्याचे दिसून येते. "सुरुवातीपासूनच राज्य आणि देशातल्या लोकांची सेवा करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय होतं. मात्र आता मी काँग्रेस पक्षासाठी हे काम करू शकत नसल्याचं दिसत आहे. आपले लोक आणि कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आता पुढे जाऊन नवी सुरुवात करावी असं मला वाटतं," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून तात्काळ काढून टाकत असल्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली होती.
दरम्यान ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या 19 आमदारांनी राजीनामे सोपवले. रात्रीपर्यंत राजीनामे देणाऱ्या आमदारांची संख्या 21 झाली.
ज्योतिरादित्य यांचे पुत्र महाआर्यमान शिंदे यांनीही वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला. "बाबांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचा मला अभिमान आहे. परंपरा असलेल्या पक्षातून बाजूला होण्यासाठी धैर्य लागतं. आमचं कुटुंब सत्तेचं भुकेलेलं नाही याचा इतिहास साक्षी आहे. जनतेला दिलेल्या वचनाप्रमाणे देशात आणि मध्य प्रदेशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत", असं त्यांनी म्हटलं होतं.
काँग्रेसच्या 19 आमदारांनी राजीनामे मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्याकडे सोपवले. विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसच्या 19 आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभेच्या घटनात्मक प्रक्रियेनुसार कार्यवाही केली जाईल असं विधानसभा अध्यक्ष प्रजापती यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)