कवितेची एक ओळ जी मध्य प्रदेशातील सिंधिया कुटुंबाला अस्वस्थ करते

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, ग्वाल्हेरहून

'खूब लडी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी'.

हिंदीतल्या सुप्रसिद्ध कवियित्री सुभद्रा कुमारी चौहान यांची ही कविता खूपच लोकप्रिय आहे. पण या कवितेतली एक ओळ ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याला अजूनही अस्वस्थ करते.

ती ओळ आहे- 'अंग्रेजो के मित्र सिंधिया ने छोडी राजधानी थी'

सुभद्रा कुमार चौहान यांच्या या ओळीचा संदर्भ देत 1857च्या उठावात सिंधिया (शिंदे) घराण्याने झाशीच्या राणीला साथ दिली नाही, असा आरोप वेळोवेळी करण्यात येतो.

2010 साली ग्वाल्हेरमध्ये भाजपशासित महापालिकेच्या वेबसाईटने या कुटुंबावर आरोप करत लिहिलं होतं- सिंधिया घराण्याने राणी लक्ष्मीबाई यांना कमकुवत घोडा देऊन दगाफटका केला.

तेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांनी वेबसाईटवरचा आक्षेपार्ह मजकूर तात्काळ काढून टाकावा, अशी मागणी भाजपच्या तत्कालीन महापौर समीक्षा गुप्ता यांच्याकडे केली होती. त्याकाळी यशोधरा राजे सिंधिया ग्वाल्हेरच्या भाजपच्या खासदार होत्या. त्यासुद्धा सिंधिया घराण्यातल्याच आहेत.

झाशीच्या राणीबद्दल काय बोलल्या होत्या वसुंधरा राजे?

ऑगस्ट 2006मध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांना राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी इंदूरमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.

त्यावेळी वसुंधरा राजे यांनी सर्व आरोप फेटाळले आणि एक स्त्री म्हणून आपल्या मनात राणी लक्ष्मीबाईंविषयी नितांत आदर आहे, असं म्हटलं होतं.

निवडणुका आल्या की नेहमीच सिंधिया राजघराण्यावर चिखलफेक करण्यासाठी आपापल्या सोयीने इतिहास उकरून काढला जातो.

मध्य प्रदेश भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनीदेखील अनेकदा सिंधिया कुटुंबावर अशाप्रकारचे आरोप केले आहेत.

राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया आणि त्यांची बहिण यशोधरा राजे सिंधिया दोघीही भाजपमध्येच आहेत. तरीदेखील भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना लक्ष्य करण्यासाठी राणी लक्ष्मीबाईंचं नाव घेत आरोप करतात.

विनायक दामोदर सावरकर यांनीदेखील त्यांच्या '1857 चे स्वातंत्र्यसमर' या पुस्तकात या राजघराण्यानी इंग्रजांना साथ दिल्याचा आरोप केला होता.

ग्वाल्हेर राजघराण्याच्या उपलब्ध कागदपत्रांचे अभ्यासक आशिष द्विवेदी म्हणतात, "कवितेला इतिहास म्हणून सादर केलं जाऊ शकत नाही. 'बुंदेलो हरबोलों के मुह हमने सुनी कहानी थी', असं स्वतः सुभद्रा कुमारी चौहान यांनी आपल्या कवितेत म्हटलं आहे. म्हणजेच त्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी किंवा कहाण्या ऐकवत आहेत. सुभद्रा कुमारी चौहान यांनी कागदपत्रांचा अभ्यास करून ही कविता लिहिलेली नाही. सावरकर हेदेखील इतिहासकार नव्हते."

'ग्वाल्हेरची न वाचलेली कागदपत्रं'

ग्वाल्हेरबाबत भारतीय इतिहासकारांनी जे काही लिहिलं आहे ते इंग्रज इतिहासकारांच्या लिखाणाचा अनुवाद आहे. कुणीही ग्वाल्हेरची मूळ कागदपत्रं वाचण्याची तसदी घेतली नाही, असं द्विवेदी सांगतात.

ते म्हणतात, "ग्वाल्हेरची मूळ कागदपत्रं फारसी आणि मराठीत आहेत. त्याकाळी मराठी मोडी लिपीत लिहिली जायची. आताची मराठी ही देवनागरीमध्ये आहे."

ग्वाल्हेरमध्ये आताशा मोडी लिपी वाचता येणारी एखाद-दुसरीच व्यक्ती हयात आहे.

मोडी लिपी येणाऱ्या व्यक्ती या वादात अडकण्याच्या भीतीने काहीही उघडपणे बोलायला धजत नाहीत.

ही लिपी वाचता येणाऱ्या एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, "या कागदपत्रांचा अभ्यास केला तर तुमच्या सहज लक्षात येईल की 1 जून 1858 रोजी जयाजीराव ग्वाल्हेर सोडून आग्रा्याला निघून गेले होते आणि राणी लक्ष्मीबाई 3 जून रोजी ग्वाल्हेरला पोहोचल्या होत्या.

"त्यामुळे जयाजीराव शिंदे यांना इंग्रजांशी लढायचं नव्हतं, हे तर स्पष्टच आहे. 1857 च्या लढ्यात 90 टक्के राजे इंग्रजांविरोधात लढत नव्हते आणि जयाजीराव शिंदे हेदेखील त्यातलेच एक होते. मात्र या घराण्याने राणी लक्ष्मीबाई यांना दगा दिला, असं म्हणणं योग्य ठरणार नाही."

ते विचारतात, "अशा युद्धात जयाजीराव शिंदे इंग्रजांविरोधात सामिल का होतील ज्यात भारतीय आधीच पराभूत झाले होते?"

सिंधिया (शिंदे) कुटुंबाचा राजकीय प्रवास

स्वतंत्र भारतात सिंधिया घराण्याचे काँग्रेस आणि भाजप दोघांशीही राजकीय संबंध राहिले आहेत. राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी जनसंघाकडून निवडणूकही लढवली होती. 1950च्या दशकात ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेचं चांगलंच प्रस्थ होतं. हिंदू महासभेला महाराजा जिवाजीराव यांनीदेखील संरक्षण दिलं होतं.

याच कारणामुळे इथे काँग्रेस पक्ष कमकुवत होता. काँग्रेस ग्वाल्हेर राजघराण्याविरोधात कडक पावलं उचलू शकतं, असंही त्याकाळी म्हटलं जायचं.

याच दरम्यान राजमाता सिंधिया यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतरच राजमाता विजयाराजे सिंधिया काँग्रेसकडून निवडणूक लढवायला तयार झाल्या होत्या.

विजयाराजे सिंधिया यांनी 1957 साली गुणामधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि हिंदू महासभेच्या उमेदवरावर मात केली. मात्र काँग्रेसशी त्यांचे सूर जुळले नाहीत.

1967 साली मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी पंचमढीमध्ये युवक काँग्रेसचं राष्ट्रीय संमेलन भरलं होतं. या संमेलनाचं उद्घाटन इंदिरा गांधी यांनी केलं होतं. राजमाता विजयाराजे सिंधिया याही या संमेलनात मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रा यांना भेटायला गेल्या होत्या.

ताटकळत बसल्या राजमाता

मध्य प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार विजयधर श्रीदत्त म्हणतात, "राजमाता या भेटीत निवडणूक आणि तिकीटवाटपासंबंधी चर्चा करायला आल्या होत्या. द्वारका प्रसाद मिश्रा यांनी त्यांना दहा ते पंधरा मिनिटं वाट बघायला लावली आणि हेच त्यांना जड गेलं. मिश्रा यांनी महाराणीला त्यांची लायकी दाखवली, असा अर्थ विजयाराजेंनी घेतला. विजयाराजेंसाठी हा धक्काच होता.

"या भेटीदरम्यान विजयाराजे यांनी ग्वाल्हेरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा मुद्दा मांडला. यानंतर त्यांनी ग्वाल्हेरच्या एसपींना काढून टाकण्यासाठी मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी विजयाराजेंचं म्हणणं ऐकलं नाही."

यानंतरच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि जनसंघाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. सोबतच अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठीही त्या उभ्या राहिल्या आणि दोन्ही निवडणुकीत जिंकल्या. 1967 पर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र व्हायच्या.

विजयाराजे सिंधिया यांच्या जनसंघात जाण्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली होती.

काँग्रेस पक्षाच्या 36 आमदारांनी विरोधी पक्षात प्रवेश केला आणि मिश्रा यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर मध्य प्रदेशात पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार स्थापन झालं आणि याचं संपूर्ण श्रेय राजमाता विजयाराजे सिंधिया यांना जातं.

संयुक्त विधायक दल असं या सरकारचं नाव ठेवण्यात आलं. या आघाडीचं नेतृत्व स्वतः विजयाराजे सिंधिया यांनी केलं आणि द्वारका प्रसाद मिश्रा यांचे सहकारी गोविंद नारायण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सूडभावनेने प्रेरित होऊन ही आघाडी अस्तित्वात आली होती. ती 20 महिनेच टिकली.

गोविंद नारायण सिंह पुन्हा काँग्रेसकडे वळले. मात्र या सर्व प्रकारानंतर जनसंघ एक मजबूत पक्ष म्हणून समोर आला आणि विजयाराजे सिंधिया यांची प्रतिमा जनसंघाच्या एक ताकदवान नेत्या अशी बनली.

इंदिरा लाटेत सिंधिया घराणं

1971मध्ये इंदिरा गांधींच्या लाटेतही विजयाराजे सिंधिया ग्वाल्हेर क्षेत्रात लोकसभेच्या तीन जागा जिंकण्यात यशस्वी ठरल्या.

भिंडमधून त्या स्वतः विजयी झाल्या. गुणामधून माधवराव सिंधिया आणि ग्वाल्हेरमधून अटल बिहारी वाजपेयी. मात्र माधवराव सिंधिया हे नंतर जनसंघातून बाहेर पडले.

ज्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू विजयाराजेंना समजवण्यात यशस्वी झाले आणि विजयाराजे काँग्रेसमध्ये गेल्या, त्याच प्रमाणे इंदिरा गांधी माधवराव शिंदेंना समजवण्यात यशस्वी झाल्या आणि माधवराव काँग्रेसमध्ये गेले, असं म्हटलं जातं.

आणीबाणीमध्ये विजयाराजेसुद्धा तुरुंगात गेल्या होत्या म्हणून इंदिरा गांधींविषयी असणारा त्यांच्या मनातला राग कधीच कमी झाला नाही. याचाच परिणाम म्हणून त्यांनी इंदिरा गांधींविरोधात रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

विजयधर श्रीदत्त यांनी 'शह और मात' या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की एकदा विजयाराजेंनी माधवरावांच्या काँग्रेसप्रवेशाविषयी उद्विग्न होऊन अहिल्याबाईंचं उदाहरण दिलं आणि म्हणाल्या, "अहिल्याबाईंनी आपल्या कुपुत्राला हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकलं होतं."

यावर माधवराव सिंधिया यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले, "त्या आई आहेत आणि असं म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे."

माधवराव सिंधिया यांचा उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी जिल्ह्यात एका विमान अपघातात झालेला मृत्यू या घराण्यासाठी अतिशय दुःखद घटना होती. माधवराव राजीव गांधी यांच्या खूप जवळचे होते. आता माधवराव यांचा मुलगा ज्योतिरादित्य आणि राजीव गांधींचा मुलगा राहुल एकमेकांचे निकटवर्तीय आहेत.

राजमाता विजयाराजेंसाठी धर्मसंकट

आपल्या आईप्रमाणेच माधवराव सिंधिया यांनीही 1977 साली गुणामधून काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले.

जनता पक्षाच्या लाटेतही माधवराव सिंधिया विजयी झाले होते.

1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत माधवराव सिंधिया यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्याविरोधात ग्वाल्हेर मतदारसंघातून लोकसभेसाठी नामांकन दाखल केलं. हे विजयाराजेंसाठी धर्मसंकटच होतं.

माधवरावांनी अटल बिहारी वाजपेयींविरोधात निवडणूक लढवावी, हे राजमाता विजयाराजे यांना मान्य नव्हतं, असं ग्वाल्हेरच्या जीवाजीराव विद्यापीठात राजकारण विज्ञानाचे प्राध्यापक असलेले ए.पी.एस चौहान सांगतात.

ते म्हणतात, "राजमाता यांनी मन मारून वाजपेयींसाठी प्रचार केला. मात्र त्या मनाने कुणाच्याही सोबत नव्हत्या. या निवडणुकीत माधवराव शिंदे यांचा मोठा विजय झाला."

कारसेवकांचं स्वागत करणारी राजमाता

विजयाराजे सिंधिया भाजपमध्येही होत्या आणि भाजपमधूनच त्या 1989 साली गुणाची निवडणूक जिंकल्या.

यानंतर 1991, 1996 आणि 1998मध्येही त्या सलग विजयी झाल्या. रामजन्मभूमी आंदोलनातही त्या सहभागी होत्या.

विजयधर श्रीदत्त सांगतात, "राजमाता यांची भूमिका उमा भारती आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी नव्हती. मात्र त्या कारसेवकांचं स्वागत करायच्या. 1999 साली त्या सक्रिय राजकारणापासून दूर गेल्या आणि 2001 साली त्यांचं निधन झालं."

सिंधिया घराणं निवडणुकीत कधीच पराभूत होत नाही, असं म्हटलं जातं. मात्र विजयाराजे सिंधिया इंदिरा गांधींविरोधात 1980 साली निवडणूक हरल्या होत्या आणि वसुंधरा राजे सिंधियासुद्धा 1984मध्ये भिंडमधून निवडणुकीत पराभूत झालेल्या आहेत.

मध्य प्रदेशात भाजप आणि संघाचा जम बसवण्यात या घराण्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचंच उदाहरण ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या एका सभेत दिलं. ते म्हणाले जे भाजप नेते कधीकाळी त्यांची आजी म्हणजे विजयाराजे सिंधिया यांच्या मागेमागे असायचे ते आता खूप लठ्ठ झाले आहेत.

हिंदू महासभेवर गांधींच्या हत्येचा आरोप आहे आणि त्यामुळेच जीवाजीराव यांचे हिंदू महासभेशी असलेले संबंधही या घराण्यासाठी त्रासदायक ठरतात.

या घराण्याचे भाजप आणि संघाशी इतके घनिष्ठ संबंध असूनदेखील भाजप नेते या घराण्याला लक्ष्य करतात.

एक काळ होता जेव्हा हे घराण ग्वाल्हेर क्षेत्रातल्या विधानसभेच्या कमीतकमी 50 जागांवर जय-पराजय निश्चित करायचं. मात्र आता ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या गुणा या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभेच्या चार जागांवरही विजय मिळवून देऊ शकत नाहीत.

ग्वाल्हेर शहरात या घराण्यावर कुणी टीका करत नाही. मात्र ग्वाल्हेर शहराबाहेर अनेक जण माधवराव सिंधियासारखी नम्रता ज्योतिरादित्य सिंधियायांच्यात नाही, ही बाब अधोरेखित करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)