You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंच्या मनसेवर 'सक्तीनं बॅचलर' राहण्याची वेळ आली आहे का?
राज ठाकरेंचा दावा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अजून कोणत्याही युतीचा स्पर्श (टच) झालेला नाही. मनसे अजूनही बॅचलरच आहे.
प्रत्यक्ष स्थिती : राज ठाकरेंच्या मनसेनं वेळोवेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण, त्यांना यापैकी कोणत्याही पक्षानं जवळ केलं नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अजून कोणत्याही युतीचा स्पर्श (टच) झालेला नाही. मनसे अजूनही बॅचलरच आहे, असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. पण, प्रत्यक्षात तसं आहे का, हे जाणून घेण्यासाठी अगोदर खालील घटनाक्रम पाहूया.
1. भाजपशी हातमिळवणीचा प्रयत्न
2014च्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे गुजरातमध्ये जाऊन आले. गुजरातचा विकास पाहिल्यानंतर देशाची सूत्रे नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीच्या हातात जायला हवीत, असं वाटल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं.
त्यानंतर मार्च 2014मध्ये भाजप नेते नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली.
त्यानंतर राज ठाकरे 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी करणार, अशी चर्चा सुरू झाली. पण, लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही भाजपनं मनसेला सोबत घेतलं नाही.
2019च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना सत्तेवर आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर शिवसनेनं आघाडी स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दे मागे पडेल, अशी चर्चा सुरु झाली.
याचदरम्यान, जानेवारी 2019मध्ये राज यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांनी मनेसनं पक्षाच्या झेंड्याचा रंगही बदलला.
मनसे भविष्यात भाजपसोबतही जाऊ शकते, असं विधान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्यानंतर, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.
त्यामुळे आता पुन्हा एकदा मनसे भाजपसोबत जाईल, अशी चर्चा आहे.
2. शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न
2017मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी द्यायचा प्रयत्न केला. पण, शिवसेनेनं त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही.
"भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात सत्ता गेली, तर मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळेच शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंना सात वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही. आम्ही दिलेली टाळी झिडकारली आहे, त्यामुळे स्वबळावर ही निवडणूक लढवणार," असं स्वत: राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं.
2017च्या निवडणुकीपर्यंत या ना त्या कारणाने शिवसेना-मनसे युती करतील आणि दोन्ही भाऊ एकत्र येतील, अशी चर्चा सतत सुरू होती. पण, 2017च्या निवडणुकीनंतर ही शक्यता मावळल्याचं दिसून येतं.
3. राष्ट्रवादीशी सलगी
2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जाहीररित्या मोदींवर टीका करायला सुरुवात केली. या निवडणूक प्रचारातील 'लाव रे तो व्हीडिओ' या त्यांच्या शैलीची चर्चाही झाली.
मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांमुळे देशाचं कसं नुकसान झालं, हे त्यांनी प्रचारात अगदी ठासून सांगितलं. सत्ता कोणाच्याही हातात द्या, पण, मोदी-शहा यांना सत्तेपासून दूर ठेवा, ही भूमिका राज यांनी घेतली.
याच कालावधीत (मार्च 2019) राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखतही घेतली.
यानंतर ऑगस्ट 2019मध्ये मुंबईत EVMविरोधी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विरोधी पक्षातल्या नेत्यासंहित राज ठाकरेंनी सहभाग नोंदवला आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.
त्यामुळे मग विधानसभा निवडणुकीत मनसेची राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर आघाडी होईल, अशी चर्चा सुरू झाली.
पण, सप्टेंबर 2019ला नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी म्हटलं, "निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी राज ठाकरेंनी भूमिका मांडली होती. पण आम्ही ती भूमिका मान्य नाही."
त्यानंतर मात्र राज ठाकरेंनी 2019ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली.
4. काँग्रेसशीही मैत्रीचे प्रयत्न
जानेवारी 2018मध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्यंगचित्र प्रसिध्द केलं.
गुजरात निवडणुकांच्या निकालावर जवळपास महिन्यानंतर भाष्य करताना राज यांनी राहुल गांधींची स्तुती केली.
"दुसऱ्या नंबरवर असले तरी राहुल मोदींपेक्षा मोठे आहेत," असं या व्यंगचित्रात त्यांनी म्हटलं.
जुलै 2019मध्ये EVM आणि निवडणूक प्रक्रियेबद्दलच्या शंका व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
राज ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "आम्ही EVM संबंधी चर्चा केली, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही."
पुढे ऑक्टोबर 2019मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक लागली.
राज ठाकरे यांच्या परप्रातीयांविषयीच्या भूमिकेमुळे काँग्रेस त्यांना राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीत सामील करून घ्यायला तयार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आणि शरद पवारांच्या वक्तव्यानंतर (निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी राज ठाकरेंची भूमिका आहे, पण ती मान्य नाही) मनसे महाआघाडीत नसेल, हे स्पष्ट झालं.
वरील सगळा घटनाक्रम लक्षात घेतल्यानंतर राज ठाकरेंनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांसोबत वेळोवेळी जमवून घेण्याचा, निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कुणीही सकारात्मक साद दिली नाही, हे लक्षात येतं. यामुळे राज यांच्या मनसेवर सक्तीनं बॅचलर राहाण्याची वेळ आलेली दिसून येते.
मनसेची भूमिका काय?
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे मात्र वेगळं मत मांडतात.
शिवसेना वगळता मनसेनं कधीच कोणत्या पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न केला नाही, असं त्या सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हमाल्या, "शिवसेना वगळता मला नाही वाटत की राज ठाकरे यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षाबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत साहेबांनी तसे प्रयत्न केले होते, पण त्याला कारणं वेगळी होती. मनसे हा पक्ष पहिल्या दिवसापासून स्वत:च्या हिमतीवर उभा राहिलेला पक्ष आहे. पक्षाची एक भूमिका आहे आणि राज ठाकरे आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. ती सांभाळून जर कुणी आमच्याबरोबर येत असेल, तर त्याबाबत विचार केला जाईल."
निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी काही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती, यावर शालिनी ठाकरे म्हणतात, "राज ठाकरे सगळ्या पक्षांतील नेत्यांना भेटतात. या नेत्यांशी त्यांचे राजकीय संबंध तर आहेतच, पण कौटुंबिक संबंधही आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याची भेट घेतली म्हणजे नेहमीच युती किंवा आघाडीची चर्चा झाली, असं समजू नये."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)