You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे यांची मनसे उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठराव मतदानावेळी तटस्थ का राहिली?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधिमंडळातील एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. प्रमोद उर्फ राजू रतन पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले होते.
मनसेचा एक, एमआयएमचे दोन आणि माकपचे एक अशा चार आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीला 169 मतं मिळाली. भाजप आमदारांनी सभात्याग केला तर चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव 169-0 असा जिंकला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ राज ठाकरे शिवाजी पार्क इथं झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राज यांची उपस्थिती शपथविधी सोहळ्यातील चर्चित मुद्यांपैकी एक होती.
विधिमंडळात मात्र मनसेने महाविकास आघाडी किंवा भाजपप्रणित विरोधक यांच्यापैकी कोणाबरोबरही जाण्याचं टाळलं. मनसेच्या बरोबरीने एमआयएमचे मोहम्मद इस्माईल आणि शहा फारुख तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले यांनी तटस्थ भूमिका घेतली.
राजू उर्फ प्रमोद पाटील यांनी फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या भूमिकेबाबत माहिती दिली. ''मा.राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे- आपला आमदार प्रमोद (राजू) पाटील'', असं त्यांनी त्यात लिहिलं आहे.
'आम्ही विरोधकाच्याच भूमिकेत'
''निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षाची सूत्रं हाती द्या असं आम्ही आवाहन केलं होतं. त्या भूमिकेपासून आम्ही दूर गेलेलो नाही. सरकारची स्थापना झाली आहे. विविध विषयांवर ते काय भूमिका घेतात त्यानुसार दृष्टिकोन ठरेल. तूर्तास तरी सरकारचं बोलाची कढी बोलाचा भात असंच सुरू आहे.
विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकास आघाडीला आमच्या मताची आवश्यकता नव्हती. भाजप सदस्य सदनात असते तरी आम्ही तटस्थ राहण्याचीच भूमिका घेतली असती. निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही भाजप आणि शिवसेनेपासून अंतर राखलं होतं. निकालानंतर चारही पक्षांनी भूमिकेत बदल केला असला तरी आमची सक्षम विरोधकाचीच भूमिका असेल'', असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
मतदारांना पर्याय ठरू शकतात म्हणून....
''मतदारांनी जो कौल दिला त्याच्या विपरीत हे सरकार बनलं आहे अशी मनसेची भूमिका आहे. महाविकास आघाडीचा भाग झाल्यावर सेनेने सेक्युलर धोरण स्वीकारलं. हिंदुत्वाच्या बाबतीत ते मवाळ होऊ शकतात." असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान व्यक्त करतात.
ते म्हणाले, "शिवसेनेवर नाराज असणारे मतदार भाजपच्या दिशेने वळू शकतात. अशावेळी मराठी माणूस, हिंदुत्व यांचा मुद्दा घेतलेले राज ठाकरे आणि मनसे अशा मतदारांसाठी पर्याय निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देणं टाळलं आणि भाजपविरोधात थेट भूमिकाही घेणंही टाळलं. यापुढे विषय आणि मुद्देनुरुप ते आपली भूमिका ठरवतील.
शिवसेनेशी मतदार दुरावा शकतो असे आणि भाजपकडे जाऊ शकतील अशा मतदारांना आकृष्ट करण्यासाठी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे''.
राज आणि शिवसेना हे नातं
संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा असूनही काका बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळ ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता.
काकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. शिवसेनेची नाशिक जिल्ह्यातली सूत्रं राज यांच्याकडे आली. रमेश किणी हत्या प्रकरणात राज यांची चौकशी झाली. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळला नाही. या प्रकरणातून ते निर्दोष सुटले पण यामुळे शिवसेनेची या काळात मोठीच कोंडी झाली होती.
30 जानेवारी 2003 रोजी महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडीसह बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार उद्धव ठाकरेच असतील हे स्पष्ट झालं. गंमत म्हणजे उद्धव यांच्या नावाचा प्रस्ताव राज यांनीच मांडला होता. मात्र असं करण्यावाचून आपल्याकडे पर्याय नव्हता असं राज यांनी नंतर स्पष्ट केलं होतं.
27 नोव्हेंबर 2005 रोजी राज यांनी शिवसेना सोडली. राज यांच्या जाण्यानं शिवसेनेतून पहिल्यांदाच ठाकरे आडनावाचा म्हणजे घरातील व्यक्ती बाहेर पडला.
मनसेची स्थापना आणि वाटचाल
9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र निवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर मनसेनं उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन केलं. 2009 मध्ये मनसेने विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे 13 आमदार निवडून आले.
मनसेच्या यशामुळे शिवसेना-भाजपची मतं विभागली गेली. शिवसेनेनं मनसेला काँग्रेसची बी टीम असं संबोधलं. मनसेनं मराठी मतांमध्ये फूट पाडली असा आरोप शिवसेनेने केला.
सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज ठाकरे यांनी प्रशंसा केली. मात्र नंतर राज यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. 2012 मध्ये नाशिकमध्ये मनसेचा महापौर झाला. पुण्यात मनसेनं विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मजल मारली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेनं 27 जागांवर विजय मिळवला.
2014मध्ये विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव आमदार निवडून आला होता. शिवसेनेतून मनसेत गेलेले शरद सोनावणे हे निवडून आले होते. मात्र यंदा लोकसभेच्या निवडणुकीआधी शरद सोनावणे यांनी स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.
'विरोधी पक्षाची सूत्रं हाती द्या'
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी राज्यात प्रबळ विरोधी पक्ष हवा असं म्हटलं होतं. विरोधी पक्षाची सूत्रं माझ्या हाती द्या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. मनसेनं यंदा विधानसभेच्या 100 जागा लढवल्या. मात्र यंदाही त्यांचा एकच आमदार निवडून आला.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू उर्फ प्रमोद पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव केला.
''निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढले होते. मनसेसाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही मित्रपक्ष नाही. शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने त्यांच्या बाजूने जाणं किंवा भाजपला साथ देऊन विरोधात बसणं मनसेला योग्य वाटलं नाही. कारण मनसेनं त्यांच्या भूमिकेत बदल केलेला नाही. ते त्यांच्या मुद्यांवर ठाम आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे मनसेचा एकमेव आमदार आहे. एका आमदाराने महाविकास आघाडीला मोठा फरक पडत नाही. मनसे भविष्यात विषयबरहुकूम भूमिका घेईल'', असं लोकसत्ताचे संदीप आचार्य यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)