मुस्लीम आरक्षण शिवसेनेची सत्ता स्थापनेपूर्वीची सेटिंग आहे काय? - देवेंद्र फडणवीस, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मुस्लीम आरक्षण ही शिवसेनेनं केलेली सेटिंग आहे काय? - देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे सरकारनं मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली असून त्याला भाजपने विरोध केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"मुस्लिमांना आरक्षण दिल्यास त्याचा ओबीसी आणि मराठा आरक्षणावर परिणाम होणार असून या आरक्षणाला आमचा विरोध आहे. सत्ता स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेची आघाडीतील घटक पक्षांबरोबर काय काय सेटिंग झाली होती?" असा सवाल या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत राज्यातील मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचं जाहीर केलं होतं.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात तरतूदच नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण लागू केलेलं आहे. असं असताना राज्य सरकारनं मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्याला आमचा विरोध आहे."
2. पुलवामा हल्ला: सुसाइड बॉम्बरला मदत करणारा अटकेत
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्ठेला (एनआयए) मोठं यश मिळालं आहे. आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो याला मदत करणारा शाकिर बशीर याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters
जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या असलेल्या शाकिर बशीरनं आदिल अहमद डार याला राहण्यास घर उपलब्ध करून दिले होते.
गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी 2019ला जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा या ठिकाणी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केला. या वाहनात स्फोटके भरलेली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे 40 जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती.
आदिल अहमद डार असं त्या आत्मघातकी हल्लेखोराचे नाव होते.
3. बांगड्यांचा आम्हाला अभिमान - सुप्रिया सुळे
आम्हा महिलांना बांगड्यांचा सार्थ अभिमान आहे. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी महिलांविषयी केलेलं वक्तव्य दुर्वैवी आहे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. सकाळनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Supriya Sule/facebook
जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
दरम्यान, भाजपच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षानं बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. भाजपाला जशास तसं उत्तर कशा पद्धतीनं देतात हे ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे."
4. अकोला मुली बेपत्ता प्रकरण - पोलीस अधीक्षकांची बदली
अकोल्यातील बेपत्ता मुलीच्या संदर्भात तक्रारीची दखल न घेतलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, तर अन्य दोन पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात अधिवेशनात आदेश दिले. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात ज्या ठिकाणी महिला अत्याचारांच्या घटना होतील. अशा ठिकाणी त्यांच्या तक्रारी दाखल झाल्या नाहीत, तर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं देशमुखांनी म्हटलंय.
महिलांवर अत्याचाराच्या घटना झाल्यानंतर त्यांना चांगली वागणूक मिळत नाही, अशी तक्राक अकोल्यामधील किरण ठाकूर यांनी दिली होती.
या प्रकरणात तपास अधिकारी भानुप्रताप मडावी, श्रीमती कराळे यांना निलंबित करण्यात आलं आहे, तर तर अकोला पालीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आली आहे.
5. विकास दरात घसरण सुरुच
भारताच्या जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्त्पन्नातील विकास दरात घसरण सुरूच आहे, 'लाईव्हमिंट'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2019मध्ये जीडीपी वाढीचा दर 4.7 टक्के इतका आहे. 2013-13च्या जानेवारीमध्ये मार्च महिन्यातील तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 4.3 इतका होता. यानंतर हा दर आता सगळ्यात कमी आहे.
जुलै ते सप्टेंबर 2019च्या तिमाहीपेक्षा हा दर कमी आहे. त्यावेळी जीडीपी वाढीचा दर 5.1 टक्के होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








