You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कन्हैय्या कुमार विरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवालांची परवानगी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कन्हैय्या कुमार विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल सरकारने शुक्रवारी याची परवानगी दिली.
9 फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयूमध्ये भारताविरोधी घोषणा देण्याचे कथित प्रकरण घडले होते. त्यामध्ये कन्हैय्या कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान यांच्यासह सात जणांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी 14 जानेवारी 2019ला दिल्ली सरकारकडे निवेदन दाखल केलं होतं, या निवेदनाला दिल्ली पोलिसांची मंजुरी मिळालेली होती.
मात्र खटला चालवण्यासाठी दिल्ली सरकारची परवानगी हवी होती. आता वर्षभरानंतर ती परवानगी मिळाली आहे.
याविषयी कन्हैय्या कुमारनं प्रतिक्रिया दिली आहे.
त्यानं ट्वीट करत म्हटलंय, "दिल्ली सरकारनं देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याबद्दत त्यांचे आभार. दिल्ली पोलीस आणि सरकारी वकिलांनी आता या खटल्याचा गांभीर्यानं विचार करावा. फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी."
"राजकीय लाभ मिळवण्यासाठी आणि लोकांचं त्यांच्या मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचं कशाप्रकारे दुरुपयोग केला जातो हे जाणून घेण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्वरित सुनावणीची गरज आहे," असंही त्यानं म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करुन सरकारला परवानगी देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती.
आता मात्र सरकारने परवानगी दिल्यानंतर या सर्वांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, "लोकांच्या दबावामुळे ही परवानगी द्यावी लागली, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकांसमोर झुकावं लागलं" असं ट्वीट केलं आहे.
तसेच "भारत तेरे टुकडे होंगे, इंशाअल्लाह इंशाअल्लाह, भारत की बर्बादी तक.. जंग चलेगी.. जंग चलेगी, एक अफजल मारोगे तो हर घर से अफजल निकलेगा, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है यह नारे देशद्रोही है, अब न्याय होगा" असंही ट्वीट त्यांनी केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)