You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणी मग महाराष्ट्रात कोण? : 'सगळ्यांना सामावून घेणारं तरुण नेतृत्व हवं'
गुजरातमध्ये दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारे तरुण नेते जिग्नेश मेवाणी यंदाच्या निवडणुकीत बनासकांठा जिल्ह्यातल्या वडगाममधून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा 19,696 एवढ्या मतांनी पराभव केला.
या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की, जिग्नेश मेवाणी यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातही तरुण आणि दलित नेतृत्व उदयास यायला वाव आहे का?
वाचकांनी भरभरुन त्यांच्या प्रतिक्रिया आणि मतं मांडली. बहुतेक जणांचं म्हणणं पडलं की, असं नेतृत्व उभं राहू शकतं. काही जणांना असंही वाटतं की, तरुण नेतृत्व तर उभं राहायला हवं पण त्याला जातीपातीचं लेबलं नको.
अमित बनसोडेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, "जिग्नेश बनणं एवढं सोपं नाही. डावे तरुण नेतृत्व ऐन भरात असताना स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बाहेर पडणं. गुजरातसारख्या राज्यात ऊनासारख्या विषयावर मोर्चेबांधणी करणं, मोर्चेबांधणी करताना जे जे पोटेन्शिअल सपोर्टर आहेत त्यांना सोबत घेणं. मग ते काँग्रेस असो किंवा इतर कुणीही. ते आपल्याला जमणार आहे का?"
"आपल्या राज्यातील तरुण नेतृत्वाला तसा संघर्ष करण्यासाठी लागणारी भूमी जरी असली तरी खूप फाटेफुटे आहेत," असंही ते पुढे म्हणतात.
'महाराष्ट्रात या घडीला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि यात आपल्या सर्वांनाच सहभागी व्हावं लागेल', असं मतं आशिष कांबळे यांनी व्यक्त केलं आहे.
जितेंद्र दाभाडे म्हणतात की, "असं नेतृत्व तयार व्हायला वाव आहे पण तसं नेतृत्व प्रस्थापित नेते तयार होऊ देत नाहीत."
दादाराव पंजाबराव यांचंही हेच मत आहे. ते लिहितात, "असं नेतृत्व तयार होऊ नये म्हणून पाय खेचणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणूनच महाराष्ट्रात कोणी कन्हैय्या तयार होत नाही. रावणही होत नाही किंवा जिग्नेशही."
राजरत्न आंभोरेंना वाटतं, "दुसरा जिग्नेश तयार होण्यासाठी त्या व्यक्तीनं खंबीर नेता आणि उत्तम संघटक असणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्रात आधीच इतकी गटबाजी आहे त्यामुळे हे होणं अवघड आहे."
स्वप्नील पांगे यांचं मत थोडं वेगळं आहे. ते म्हणतात, "दलित नेतृत्वापेक्षा एक तरुण तडफदार नेतृत्व हवं जे सर्वांना सामावून घेऊ शकेल."
"तरुणांचं माहित नाही, पण महाराष्ट्रात दलित नेते खूप आहेत. त्या दलित नेत्यांना कोणी सिरीयसली घेत नाही, मग नवीन नेतृत्वाने काय फरक पडणार?" असा प्रश्न विचारला आहे रविंद्र गावडे यांनी.
रामेश्वर पाटील यांचंही काहीसं असंच मत आहे. "महाराष्ट्रीय दलित समाज सुशिक्षत दलिताच्या मागे उभा राहात नाही. उदाहरणार्थ तो समाज प्रकाश आंबेडकरांना समर्थन देण्याऐवजी रामदास आठवलेंच्या मागे उभा राहतो."
"नवीन नेतृत्व नक्की येईल. प्रस्थापित नेत्यांना घरचा रस्ता दाखवून एक सक्षम तिसरं नेतृत्व पुढे येण्याची गरज आहे," असं महालिंग हेगडे म्हणतात.
निखील खरात लिहितात, "महाराष्ट्रात दलित समाजात नवीन आणि तरुण नेतृत्व पुढे येणं अवघड आहे. कारण गुजरातमध्ये दलितांना जे सोसावं लागलं ते महाराष्ट्रातल्या दलितांपेक्षा संपूर्ण वेगळं आहे."
"दलित समाजाचा नेता असेल तर खैरलांजीसारख्या घटना घडल्यानंतर दलित समाजाला न्याय तरी मिळेल," असं त्रिवेणी पाटील म्हणतात.
अनंत गाजरे यांनी ट्वीट केलं आहे की, "असं व्हायला नक्कीच वाव आहे. मागील काळातील दलित चळवळींचा इतिहास पाहता महाराष्ट्रात संधी आहे, पण हे शिवधनुष्य कोण पेलतो तेही महत्त्वाचं आहे, नाहीतर आंबेडकरांच्या नावाखाली किती तुकडे करून ठेवलेत हे आपण पाहतोच आहेत."
हर्षल कुलकर्णी म्हणतात, "कुठल्याही जातीधर्माच्या नेत्यांची गरज काय? जे सरकार मूलभूत, पायाभूत सुविधा देईल जनता त्यांना निवडून देण्यास समर्थ आहे."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)