आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीस यांची टीका, 'तुमचं आयुष्य रेशीम किड्यासारखं आहे' : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. 'आदित्य ठाकरे, तुमचं आयुष्य रेशीम किड्यासारखं आहे' - अमृता फडणवीस

बांगड्या घातल्या आहेत का, अशी टीका करणाऱ्या फडणवीस यांनी माफी मागावी, असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

भाजपच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षानं बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. भाजपाला जशास तसं उत्तर कशा पद्धतीनं देतात हे ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे."

यावर आदित्य यांनी ट्वीट करत उत्तर दिलं की, "देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र या बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहिलं, पण आपल्याला अशापद्धतीने टीका करणं बंद केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणं अपमानास्पद वाटतं."

त्यावर अमृता फडणवीस यांनी आदित्य यांचं हेच ट्वीट रिट्वीट करत म्हटलंय, "कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे."

2. राज्यात सगळ्या शाळांत मराठीची सक्ती

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं बुधवारी (26 फेब्रुवारी) सगळ्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं केलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

या नियमांचं उल्लंघन केल्यास शाळेच्या संस्थाप्रमुखांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

यासंबंधीच विधेयक बुधवारी विधान परिषदेत मांडण्यात आलं. हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे यापुढे राज्यात मराठी भाषा अनिर्वाय झाली असून दहावीपर्यंतच्या सर्व शाळांत मराठी भाषा बंधनकारक असणार आहे.

3. दिल्ली हिंसाचाराप्रकरणी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

त्या म्हणाल्या, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले असताना दिल्लीत अशाप्रकारची हिंसा होणं दुर्दैवी आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ चौकशी करावी आणि घटनेचं उत्तरदायित्व म्हणून गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा."

दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारावरून अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचं अपयश आहे, अशी टीका रजनीकांत यांनी केलीय.

ते म्हणाले, "दिल्ली हिंसाचार हा गुप्तचर विभाग अर्थात केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे निपटून काढला पाहिजे."

4. कांदा निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी 'ट्वीट' करून ही माहिती दिली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

यंदा झालेलं उत्पादन आणि स्थिर बाजारभावामुळे हा निर्णय घेतल्याचं रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे.

सध्या सर्वत्र कांद्याची आवक वाढल्यानं भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून निर्यातबंदी उठवण्याची वारंवार मागणी केली जात होती. केंद्र सरकारनं 29 सप्टेंबर 2019ला कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. जानेवारीनंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून निर्यातबंदी उठवण्यात आली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनही केलं होतं.

5. भाजपच्या माजी आमदारावर लैंगिक छळाचा आरोप

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भाजपच्याच एका नगरसेविकांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटले आहेत. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका निला सोंस यांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहे.

याप्रकरणी भाजपकडे स्टिंग ऑपरेशन आणि तक्रारही केली. मात्र, मेहतांवर कुठलीही कारवाई झाली नाही, अशी तक्रार सोंस यांनी केली.

मंगळवारी (25 फेब्रुवारी) नीला सोन्स यांनी यासंदर्भात सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू मांडली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)