You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कपिल मिश्रा : दिल्लीत अनेक ‘मिनी पाकिस्तान’ झाल्याचा आरोप करणारा हा नेता कोण आहे?
दिल्लीत सोमवारपासून उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कपिल मिश्रा यांचं वक्तव्य चर्चेत आहे. प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कपिल शर्मा यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होते आहे.
रविवारी कपिल मिश्रा यांनी दिल्ली पोलिसांना अल्टीमेटम दिला होता. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमक्ष बोलताना कपिल मिश्रा म्हणाले, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जाफ्राबाद तसंच चांदबाग इथं आंदोलन सुरू आहे. तीन दिवसात आंदोलनकर्त्यांना बाजूला करून रस्ते मोकळे करावेत. पोलिसांना हे करता आलं नाही तर नंतर आम्ही तुमचंही ऐकणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू".
हे ट्वीट डिलिट करण्यात आलं आहे. मात्र या वक्तव्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल आहेत. ट्वीट डिलिट करण्यात आल्यानंतर IsupportKapilMishra हा हॅशटॅग वापरून अनेकांनी कपिल मिश्रा यांना पाठिंबा दिला.
मंगळवारी रात्री कपिल मिश्रा यांनी आणखी एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं आहे की, "जाफराबाद खाली हो चुका है. दिल्ली में दुसरा शाहीन बाग नही बनेगा असं त्यांनी म्हटलं आहे".
दिल्लीत झालेल्या हिंसाचारादरम्यान काँस्टेबल रतनलाल यांच्या मृत्यूसंदर्भात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिश्रा यांनी ट्वीट करून जाब विचारला आहे.
रतनलाल यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत तातडीने का देण्यात आली नाही असा सवाल मिश्रा यांनी केला आहे.
दरम्यान, समाजात तेढ पसरेल, शांततेतला धक्का लागेल असं वक्तव्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याने केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी असं मत पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांनी व्यक्त केलं.
आप ते भाजप असा प्रवास
कपिल मिश्रा हे भाजपचे दिल्लीतले नेते आहेत. ते आपचे माजी आमदार आहेत. करावलनगर मतदारसंघातून ते निवडून आले होते. 2015 दिल्ली निवडणुकांमध्ये मिश्रा आम आदमी पक्षाच्या तिकिटावर 44,431 मतांच्या अंतराने निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या चार वेळा आमदार राहिलेल्या मोहन सिंग बिश्त यांचा पराभव केला होता.
कपिल मिश्रा हे 2015 ते 2017 या कालावधीत आप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी होते. त्यांच्याकडे जलसंपदा विभाग सोपवण्यात आला होता. तेव्हा त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती.
केजरीवालांवर आरोप
मिश्रा यांनी केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेताना पाहिल्याचं मिश्रा यांनी म्हटलं होतं.
400 रुपयांच्या पाणी टँकर घोटाळ्यात अरविंद केजरीवाल सामील असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता.
शीला दीक्षित सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीसाठी केजरीवाल जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत असाही आरोप मिश्रा यांनी केला होता. मात्र त्यांनी केलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
त्यांच्याकडील खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली होती.
आपचे आमदार असूनही ते अनेकदा भाजपच्या व्यासपीठांवर दिसायचे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान त्यांनी आम आदमी पक्षाविरुद्ध प्रचार केला होता.
पक्षाविरोधातील प्रचाराची नोंद विधानसभा अध्यक्षांकडे झाली होती. राज्यघटनेतील पक्षांतरबंदी कायद्यानुसार 2 ऑगस्ट 2019 रोजी मिश्रा यांची आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
आपमधून बाहेर पडल्यानंतर 17 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिश्रा यांनी औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते मॉडेल टाऊन मतदारसंघाचे उमेदवार होते. आम आदमी पक्षाचे अखिलेशपति त्रिपाठी यांनी कपिल मिश्रा यांचा पराभव केला.
वादग्रस्त ट्वीटसाठी निवडणूक आयोगाची नोटीस
भाजप नेते कपिल मिश्रा यांना दिल्ली विधानसभा निवडणुकांदरम्यान वादग्रस्त ट्वीटकरता निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती.
याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात दिल्ली निवडणूक आयोगाला अहवाल मागवला होता. त्यानंतर दिल्ली निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना नोटीस जारी केली होती.
निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना ट्वीट डिलिट करण्याचे आदेश दिले होते. असं वृत्त ANIने दिलं होतं.
कपिल मिश्रा यांनी 23 जानेवारीला ट्वीट करून म्हटलं होतं की, 8 फेब्रुवारीला दिल्लीच्या रस्त्यांवर भारत-पाकिस्तान मुकाबला होईल.
या ट्वीटनंतर कपिल मिश्रा यांनी विविध न्यूजचॅनेल्सना दिलेल्या मुलाखतीत आम आदमी पक्षावर आरोप केले. "आप सरकार पाच वर्षं काम करत नाहीये असा आरोप त्यांनी केला. यामुळे दिल्लीत ठिकठिकाणी मिनी पाकिस्तान तयार होत आहेत. याविरोधात हिंदुस्तान 8 फेब्रुवारीला एकत्र येईल" असं मिश्रा म्हणाले होते.
दिल्ली निवडणूक आयोगाच्या नोटिशीनंतर कपिल मिश्रा म्हणाले, सत्य बोलण्यात कसलं भय? सत्य बोलण्यावर मी ठाम राहेन.
सोशल मीडियावरही कपिल मिश्रा यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
मिश्रा यांच्यावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न
दोन वर्षांपूर्वी 10 मे 2017 रोजी कपिल मिश्रा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. कपिल मिश्रा उपोषणाला बसले होते. कपिल आपल्या सरकारी निवासस्थानाबाहेर उपोषण करत होते.
त्यांचे अनेक समर्थक तिथे हजर होते. संध्याकाळी साडेपाच वाजता एक तरुण धावत त्यांच्या दिशेने आला आणि त्याने मिश्रा यांना थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मिश्रा यांच्या समर्थकांनी त्याला रोखलं.
हा तरुण आम आदमी पक्षाचा असल्याचा आरोप मिश्रा यांच्या समर्थकांनी केला होता. पोलिसांनी या तरुणाला अटक केली होती.
"मी कोणालाही याप्रकरणी दोषी धरणार नाही. ज्याने हे कृत्य केलं, देव त्याला सुबुद्धी देवो. अशा गोष्टी घडतच राहणार. माझ्या साथीदारांनी बदला घेण्याच्या भीतीने कोणी हिंसक पाऊल उचललं तर मी पाणीत्याग करेन," असं ते त्यावेळी म्हणाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)