You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन भागवत : सुशिक्षित आणि सधन वर्गात खरंच जास्त घटस्फोट होतात?
- Author, टीम बीबीसी मराठी
- Role, नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "सध्याच्या काळात घटस्फोटाची प्रकरणं बरीच वाढली आहेत. लोक काही कारण नसताना आपआपसात भांडत बसतात. पण घटस्फोटाचं प्रमाण सुशिक्षित आणि सधन कुटुंबांमध्ये जास्त आहे. कारण शिक्षण आणि पैसा माणसाला गर्विष्ठ बनवतात. यामुळेच कुटुंब मोडतात. याचा समाजावरही परिणाम होतो कारण समाजही एक कुटंबच आहे."
या विधानावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री सोनम कपूरने ट्वीट करून म्हटलंय की 'कोणता शहाणा माणूस असं विधान करतो? अत्यंत मुर्खपणाचं आणि प्रतिगामी विधान आहे हे.
सोनम कपूर यांच्या ट्वीटवरही अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या एकीने लिहिलंय,
"शिक्षणाने आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. त्यामुळेच नको असलेल्या बंधनात स्वतःला बांधून ठेवण्यापेक्षा लोक त्यातून बाहेर पडतात. शिक्षणाने माणूस अहंकारी होत नाही, तर त्याला आर्थिक स्वयंपूर्णता येते."
मोहन भागवतांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलेलं नाहीये. 2013 साली इंदोरमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, "पुरुष घरातला कर्ता असतो, त्याने कमवावं आणि बाईने घर सांभाळावं. जर बायकोने आपल्या कर्तव्यात कसूर केली तर तिला सोडण्याचा पूर्ण अधिकार नवऱ्याला आहे."
इतकंच नाही, त्याच्या आधी काही दिवस त्यांनी, 'बलात्कार शहरी भागात होतात, ग्रामीण भागात होत नाहीत' असंही वक्तव्य केलं होतं.
मग याही वेळेस भागवतांच्या निशाण्यावर सुशिक्षित महिला होत्या का?
मुक्त पत्रकार मुक्ता चैतन्य म्हणतात की, "मला वाटतं मोहन भागवतांनी जाणूनबुजून महिलांचा उल्लेख टाळला आहे, म्हणजे पुढे वाद व्हायला नकोत."
मोहन भागवत यांच्या वक्तव्यात कितपत तथ्थ?
महिला पुरुष हा विषय जरा वेळ बाजूला ठेवला तरी सुशिक्षितांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण खरंच जास्त आहे का? शिक्षणाने माणूस उद्धट होतो का? त्यामुळे कुटंब मोडतात का, हे आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला.
विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी सांगतात, "शिक्षणामुळे आत्मभान येतं, आणि त्यामुळे माणूस आपल्या हक्कांबद्दल सजग होतो. त्यामुळे मग अपमान सहन करू शकत नाही, भले ते महिला, पुरुष कोणीही असो. त्यामुळे लोक एकमेकांपासून वेगळं होणं पसंत करतात. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्वयंपूर्णता असेल, आणि दोघांपैकी कोणी एकमेकांवर अवलंबून नसेल, तरीही हा निर्णय घेणं सोपं ठरतं."
पण तरीही प्रश्न उरतोच की घटस्फोटांचं प्रमाण खरंच वाढलंय का?
"कुटंब न्यायालयातून येणारी आकडेवारी पाहिली तर घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय हे लक्षात येतं. पण त्याला एक ठराविक कारण नाहीये, अनेक बाबी आहेत. शहरी भागात घटस्फोट जास्त होतात असं म्हणाल तर त्याच्याही मागे सांस्कृतिक कारणं आहेत. मुळात घटस्फोटाला शहरी भागात जितक्या सहजपणे घेतलं जातं, तितक्या सहजपणे ग्रामीण भागात घेतलं जात नाही," असंही वंदना कुलकर्णी नमूद करतात.
'नाईलाजास्तव घटस्फोट'
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अनेक वर्ष सामजिक कार्यकर्त्या म्हणूनही काम केलंय. त्यांनी कामानिमित्त अशा अनेक केसेस पाहिलेल्या आहेत. त्या सांगतात, "घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय तसं कौटुंबिक हिंसाचाराचंही प्रमाण वाढलंय. घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय हे मान्य, पण ते कोणत्या परिस्थिती होतायत हेही पाहायला हवं."
घटस्फोट घ्यायचा नाही मग महिलांनी हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार आणि अपमानाचं बळी ठरायचं का असा प्रश्न त्या विचारतात.
"महिला नाईलाज म्हणून, शेवटचा पर्याय म्हणून घटस्फोट घेतात. शिक्षणामुळे त्या सक्षम होतात."
'घटस्फोटाकडे नकारात्मक नजरेने का पहायचं?'
घटस्फोटांवर एवढी चर्चा रंगली असताना, एक वेगळा दृष्टीकोनही समोर येतोय. भारतीय समाजमनात घटस्फोटाला वाईट गोष्ट समजलं जातं असलं तरी घटस्फोट वाईट नाहीत.
"घटस्फोट वाईट का म्हणायचे? ज्या दोन लोकांच्या नात्यात प्रेम, आदर, सन्मान, विश्वास राहिला नाहीये, त्या दोन लोकांनी मन मारून एकत्र राहावं हा अट्टहास का? उलट नको असलेल्या बंधनातून बाहेर पडून नव्यानं आपलं आयुष्य फुलवू शकतात," मुक्ता म्हणतात.
अर्थात मुलं असली तर या निर्णय गुंतागुंतीचा ठरू शकतो, पण त्यावरही तोडगा आहे. उगाच आमची परंपरा म्हणून जबरदस्तीच्या नात्यात राहाण्यात काहीच अर्थ नाही असं मत त्या मांडतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)