You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘माझं लग्न नाही झालं, पण मला 35 मुलं आहेत’
- Author, फ्रान्सिस्को जिमेनेज डे ला फ्लुएन्टे
- Role, बीबीसी न्यूज मुंडो, टोकियो
सडपातळ बांधा, थकलेला चेहरा तरीही डोळ्यांत मार्दव असलेल्या युईची ईशीचं वय आहे 38 वर्षे. चाळीशीही न ओलांडलेल्या युईची ईशीला त्याच्या वयाच्या इतर कोणापेक्षाही जास्त मुलं आहेत.
युईचीच्या मुलांची संख्या आहे 35 आणि त्याची एक दोन नाही तर तब्बल 25 कुटुंबं आहेत. मात्र यांपैकी कोणीही त्याचे खरे कुटुंबीय नाहीत.
दहा वर्षांपूर्वी ईशीने 'फॅमिली रोमान्स' या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी 'कुटुंब आणि मित्रमंडळी' भाड्यावर देते. या कंपनीचे 2200 कर्मचारी गरजू कुटुंबांसाठी वडील, आई, चुलत भावंडं, काका, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईंकाची भूमिका बजावतात.
ही कंपनी आणि तिच्या देखण्या मालकाची प्रसिद्धी तेव्हा पासून वाढतेच आहे.
आज ईशी 35 मुलांचा बाबा आहे आणि या कोणाशीही रक्ताचं नातं नसूनही 25 वेगवेगळ्या कुटुंबाचा हिस्सा होणं काय असतं, हे त्यानं बीबीसीसोबत बोलताना सांगितलं.
'आभासी तरीही खरा'
फॅमिली रोमान्सची कल्पना आपल्या डोक्यामध्ये 14 वर्षांपूर्वी पहिल्यांदा आल्याचं ईशी सांगतो. त्याच्या एका मैत्रिणीला तिच्या मुलाला खासगी नर्सरीमध्ये घालायचं होतं. पण त्यासाठी दोन्ही पालक आणि मुलाची मुलाखत घेण्यात येणार होती.
ती एकल माता (सिंगल मदर) होती. म्हणून मग ईशी तिच्यासोबत गेला.
"त्याचा फायदा झाला नाही. कारण तो मुलगा आणि मी बापलेकासारखे वागू शकलो नाही. पण अशा गरजांसाठी काही तरी नवीन केलं जाऊ शकतं, असं मला वाटलं. ज्यांना मदत हवी आहे अशा लोकांच्या गरजा 'फॅमिली रोमान्स' भागवतं," तो सांगतो.
"नातं खरं नसलं तरी काही तासांसाठी मी तुमचा मित्र किंवा नातेवाईक होऊ शकतो. "
'मित्र आणि कुटुंब भाड्याने मिळेल'
ईशीकडे येणाऱ्या ग्राहकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात.
काही जणांना जोडीदाराची ओळख त्यांच्या पालकांसोबत करून द्यायची असते. पण काही कारणांमुळे खऱ्या पालकांशी गाठभेट घालून देणं त्यांना शक्य नसतं.
अशावेळी या सर्व्हिसकडून त्यांना योग्य वयोगटातले असे पालक देण्यात येतात. विशेष म्हणजे त्यांची उंची आणि केस या ग्राहकांशी मिळतेजुळते असतात.
"ज्या लोकांना मैत्री करणं कठीण जातं ते आमच्याकडून मित्रही भाड्याने घेऊ शकतात," तो म्हणतो.
"आम्ही खऱ्या मित्रांसारखे वागतो, एकत्र शॉपिंगला जातो, वॉकला जातो आणि गप्पा मारतो."
काही लोक तर एखाद्या पार्टीला जाण्यासाठी जोडीदारही भाड्याने घेतात.
कधीकधी वयाने ज्येष्ठ असणारी जोडपी लेकी, मुलं किंवा नातवंड भाड्याने घेतात. जे त्यांच्याकडे एकेकाळी होतं किंवा जे कधीच नव्हतं त्याची उणीव भरून काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न असतो.
'वडिलांना सगळ्यात जास्त मागणी'
वडिलांसाठी सगळ्यात जास्त मागणी असल्याचं ईशी सांगतो.
जपानमध्ये दरवर्षी सुमारे 2,00,000 घटस्फोट होतात आणि अनेक कुटुंबांमध्ये एकच पालक असतो. इतर समाजांप्रमाणेच इथेही एकटे पालक असणाऱ्या कुटुंबांसमोर काही अडचणी येतात. त्यामुळेच आपली सेवा समाजाच्या गरजा पूर्ण करत असल्याचं ईशी म्हणतो.
पण तो हेही सांगतो की, "सगळ्या कुटुंबांना एकच निकष लावता येत नाही."
"काहींना प्रेमळ बाबा हवा असतो, इतरांना शिस्तीचा बाबा किंवा सुसंस्कृत बाबा हवा असतो. आम्ही त्यांना हवं ते देतो. उदाहरणार्थ, शिस्तप्रिय पालक कदाचित कानसाई बोली (प्रमाण जपानी भाषेपेक्षा परखड वाटणारी बोली) बोलणारा असू शकतो. "
जर मुलं लहान असतील तर बाबा आतापर्यंत त्यांच्या सोबत का नव्हता, हे लपवण्यासाठी काही तरी नाटक उभं करावं लागतं.
पण ईशीसाठी सगळ्यात कठीण असतं ते काहीतरी कारण काढून या 'खोट्या' मुलांचा निरोप घेणं.
"मुलांना समजावणं सोपं नाही. मुलांना रडताना पाहून त्रास होतो. ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे."
'कधीकधी मुलांची नावं विसरतो'
फॅमिली रोमान्सचा कर्मचारी 5 कुटुंबांमध्ये सहभागी होऊ शकतो. पण ईशीने स्वतःच ही कंपनी सुरू केलेली असल्याने सध्या तो 25 कुटुंबांचा हिस्सा आहे.
एकूण 35 मुलं त्याला त्यांचा 'खरा बाबा' मानतात आणि 69 जणांसाठी तो मित्र किंवा नातेवाईकाची भूमिका बजावतो.
"मी एखाद्या घरी पोहोचण्याआधी त्या कुटुंबाची माहिती तपासतो. त्या सगळ्यांची नावं आणि माहिती लिहिलेली एक वही माझ्याकडे असते," ईशी सांगतो.
"कधीकधी मी कोणाचं टोपणनाव किंवा इतर काही विसरलो, तर मी बाथरूममध्ये जाऊन वहीत पहातो."
पण म्हणून तो पालक म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळत नाही. मुलांना सकाळी शाळेत सोडणं, मधूनमधून मीटिंगला जाणं, दुपारी खेळण्यासाठी नेणं, रात्रीचं जेवण अशी सगळी कामं तो करतो.
"हे काम खूप आहे आणि मला सुटी मिळत नाही," ईशी सांगतो.
"कितीही दमलो असलो तरी रात्री 12 ते पहाटे 3 हा वेळ मी स्वतःसाठी राखून ठेवायचं ठरवलं आहे. मी सिनेमा पहातो, चित्रं काढतो. हीच माझ्यासाठी सुटी आहे. रोज मी फक्त तीन तास झोपतो."
'व्यवसाय आणि भावना'
ईशीचं लग्न झालेलं नाही आणि त्याला स्वतःची मुलं नाहीत. त्याला मुलं नकोच आहेत.
स्वतःचं कुटुंब झालं तरी आपल्या इतर 25 कुटुंबांचा विचार मनातून काढून टाकता येणार नाही, असं ईशीला वाटतं.
"मी खरंच कोणाशीतरी लग्न केलं तर त्यांना काय वाटेल?" ईशी म्हणतो.
"मला माझी स्वतःची मुलं झाली, तरी मी त्यांच्याकडे बनावट कुटुंबांसारखंच पाहीन, अशी भीती मला वाटते. असं झालं तर मग सगळ्याची सरमिसळ होईल. "
कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत प्रेमाने वागावं लागत असलं तरी या व्यवहारामध्ये अॅक्टर आणि ग्राहकांमध्ये काही मर्यादांचं पालन केलं जात असल्याचं ईशी सांगतो.
ते किस करू शकत नाहीत वा शरीरसंबंध ठेवू शकत नाहीत. त्यांना फक्त एकमेकांचा हात पकडण्याची परवानगी आहे. ही कंपनी 30 प्रकारच्या सेवा पुरवते आणि यातल्या प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे नियम आहेत.
ग्राहक चार तासांसाठी 20,000 येन (180 डॉलर्स) मोजतात. शिवाय प्रवासखर्च आणि जेवणही दिलं जातं.
"एकल मातेसाठी हे स्वस्त नाही," ईशी सांगतो.
'कटू सत्य'
फॅमिली रोमान्स कंपनीचं घोषवाक्य आहे "हॅपिनेस अबाऊव्ह रिअॅलिटी". पण ठराविक काळानंतर सत्य लपवणं कठीण होतं.
ईशी सांगतो, की त्याची एक मुलगी 20 वर्षांची आहे आणि ती अजूनही ईशीलाच आपला खरा पिता समजते.
पालकांनी एका टप्प्यावर आल्यानंतर मुलांना सत्य सांगणं गरजेचं असल्याचं ईशीला वाटतं. "पण मी ते ठरवू शकत नाही," असं तो खेदाने म्हणतो.
समाजाला अशा सेवांची गरज लागली नाही तर चांगलंच आहे, पण परिस्थिती तशी नसल्याचंही तो म्हणतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)