मनसे महामोर्चा LIVE : दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ-राज ठाकरे

मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्याने राहावं. नाहीतर इथून पुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. बांगलादेशी आणि पाकिस्तानी 'घुसखोरां'च्या विरोधात मुंबईत मोर्चा काढला गेला. त्यावेळी ते बोलत होते.

देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक तसंच एनआरसीवरून गोंधळ सुरू आहे. देशात सध्या आर्थिक अराजकता आहे. ती अराजकता लपवण्यासाठी हा कायदा करत आहात का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारताचं नागरिकत्व देण्याची काय गरज? माझा देश धर्मशाळा आहे का? माणुसकीचा पत्कर भारताने घेतलेला नाही असं राज म्हणाले.

हिंदू जिमखान्यापासून सुरुवात होऊन हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला. त्यानंतर मोर्चाची सांगता राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली.

महाराष्ट्रातल्या पोलिसांना हात सोडून 48 तास द्या, महाराष्ट्रातला क्राईम रेट ते शून्यावर आणू शकतात, पण हात बांधलेले आहेत, कारवाई करायला गेल्यानंतर सरकार पोलिसांवर केस टाकणार असं त्यांनी म्हटलं.

अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. जगातला प्रत्येक देश आपापल्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतात. पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झालाय, अमेरिकेतील ट्विन्स टॉवर हल्ल्यातील ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच सापडला असं राज म्हणाले.

काश्मीरमधून 370 कलम काढलं तेव्हा, मी अभिनंदन केलं, राम मंदिराचा निर्णय आला, तेव्हा 'बाळासाहेब हवे होते', असं मीच म्हटलं, राम मंदिराच्या ट्रस्टवेळी सरकारचे अभिनंदन केलं असं त्यांनी सांगितलं.

केंद्रावर टीका केली की भाजपविरोधी, केंद्राच्या गोष्टींची स्तुती केली तर भाजपच्या बाजूनं, मध्ये काही आहे की नाही? असं आपल्याकडे होतं असं ते म्हणाले.

दुपारी 3.40 वा. राज ठाकरे कारमधून आझाद मैदानाकडे रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही अंतर पायी चालल्यानंतर कारमधून आझाद मैदानाकडे रवाना झाले. महामोर्चा आझाद मैदानात पोहोचल्यानंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधतील.

दुपारी 3.30 वा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतायत महामोर्चाचं नेतृत्त्व

दुपारी 12.36 वा. 'आम्ही कधीच हिंदुत्व सोडलं नव्हतं'

"राज ठाकरे यांनी भूमिका बदलली नाहीये. आम्ही कधीच हिंदुत्व सोडलेलं नव्हतं. राज ठाकरे काय बोलतील, याकडे माझंही लक्ष लागलेलं आहे," असं मत शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

सकाळी 11.53 वा. 'समविचारी पक्ष आमच्यासोबत येतील'

"आम्ही आमचा अजेंडा घेऊन समोर जात असतो, जर कुणाला आमच्यासोबत यायचं असेल, तर त्याचा त्यांनी विचार करावा," असं मत मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

मनसे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) च्या बाजूनं आहे की विरोधात हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. "राज ठाकरे हे स्पष्ट करतील," असंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

MNS अधिकृत या मनसेच्या ट्विटर हॅंडलवर तीन फेब्रुवारीला ट्वीट करण्यात आलं होतं. "सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे परंतु पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत."

मनसे समर्थकांची हिंदू जिमखान्याजवळ गर्दी जमत आहे.

प्रकाश महाजन, हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत

या मोर्चाच्या पूर्वसंध्येला प्रकाश महाजन, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश कौदगे यांनीही राज ठाकरे यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला.

23 जानेवारी रोजी झालेल्या भाषणात राज ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी CAA ला आपला पाठिंबा दर्शवला होता. CAA विरोधात देशभरात मोर्चे निघत आहेत आणि निदर्शनं होतं आहेत तेव्हा मोर्चाला उत्तर मोर्चाने देऊ असं राज ठाकरे म्हणाले होते.

याच वेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून भगव्या रंगाचा केला. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील असणार आहेत.

23 तारखेला झालेल्या कार्यक्रमात अमित ठाकरे यांचा पक्षात जाहीर प्रवेश झाला.

मोर्चामध्ये सर्वांनी संयम आणि शिस्त बाळगावी असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)