You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार: CAA आणि NRC विरोधात रस्त्यावर उतरून राजकीय आघाडीचा प्रयत्न?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
मुंबईत आज 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्या'विरोधात पुकारलेल्या 'गांधी शांती यात्रे'ची सुरुवात झाली. माजी केंद्रीय मंत्री आणि 'भाजपा'तून बाहेर पडलेले त्या पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या 'राष्ट्रमंच' या अराजकीय संघटनेमार्फत ही मुंबई ते दिल्ली यात्रा आयोजित केली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांचे नेते मुंबईत यानिमित्तानं एकत्र आले होते.
त्यामुळे CAA ला विरोध या समान उद्दिष्टातून गेल्या काही काळात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधी राजकीय आघाडी तयार होते आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत 'गेट वे ओफ इंडिया' इथे झालेल्या 'गांधी शांती यात्रे'च्या प्रारंभाच्या कार्यक्रमाला यशवंत सिन्हांसोबत 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, 'वंचित बहुजन आघाडी'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राज्यातले इतरही नेते उपस्थित होते.
ही यात्रा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा अशा राज्यांतून प्रवास करत दिल्लीला राजघाटावर संपणार आहे. या प्रवासात CAA ला विरोध करणारे इतर विरोधी पक्षातले नेतेही यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
CAA ला सर्व भाजपाविरोधी पक्षांकडून विरोध होतो आहे आणि या पक्षांकडे असलेल्या राज्यांमध्ये हा कायदा न राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळ यांनी असे निर्णय घेतले आहेत.
डिसेंबर महिन्यात नागपूर अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी या मुद्द्यावर देशभरात एक भाजपाविरोधी आघाडी तयार होऊ शकते असं म्हटलं होतं. त्यानंतर CAA विरोधी आंदोलनासोबत नुकत्याच झालेल्या 'जेएनयू' प्रकरणामुळेही देशभर विविध आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या निमित्तानं राजकीय नेते एकत्र येणं याकडे नवी आघाडी तयार होते आहे का या प्रश्नासहित पाहिले जात आहे.
शरद पवार यांनी आज भाषण करतांना असं म्हटलं की,"आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यानं समाजातला एक मोठा वर्ग नाराज आहे. त्यांना रस्ता दाखवण्यासाठी महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग योग्य आहे. नवी पिढी रस्त्यावर शांततेनं येऊ पाहत आहे, मात्र त्यांना येऊ दिलं जात नाही आहे. 'जेएनयू' मध्ये जे झालं त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत. त्यात जर बदल घडवून आणायचा असेल तर महात्मा गांधींचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे."
अनेक राजकीय प्रतिस्पर्धी वा विरोधकही या निमित्तानं एकत्र आलेले पहायला मिळताहेत. आज या 'शांती यात्रे'मध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरही एकत्र आले. दोघांचाही राजकीय विरोध सर्वश्रुत आहे. त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. पण आज ते निवडणुकांच्या वर्षानंतर पहिल्यांदा एकत्र आलेले पहायला मिळाले.
"हा लढा मोठा आहे आणि सरकार सहजासहजी ऐकेल असं मला वाटत नाही. हे एका प्रकारचं युद्ध असून ते शांततेनं लढायला हवं. तो राजकीय लढा असल्यानं राजकीय मंचावरच लढायला हवा,"आंबेडकर या वेळेस बोलतांना म्हणाले.
मात्र या 'शांतता यात्रे'चा उद्देश कोणतीही राजकीय आघाडी तयार करणं नाही आहे, तर भाजपानं मतांच्या राजकारणासाठी जी फूट पाडण्याची खेळी केली आहे त्याचा विरोध करणं आहे, असं कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणाले.
"भाजपच्या विरोधातलं राजकीय युद्ध तर आम्ही लढत आहोतच. महाराष्ट्रातलं सरकार असो वा नुकतेच आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल असोत, त्यातून ते दिसतं आहे. पण या यात्रेनं लगेचच कोणती नवी राजकीय आघाडी तयार होणं हा फारच पुढचा विचार म्हणावा लागेल," पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)