You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे: मनसे महामोर्चा काढून भाजपसोबत जाण्याची घोषणा करणार का?
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राम मंदिराच्या उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ट्रस्टची घोषणा केली आणि राज ठाकरे यांनी तासाभरातच मोदींच्या घोषणेचं स्वागत करणारं ट्वीट केलं.
राज ठाकरेंनी स्वागत करणं, यात नवल ते काय, असा प्रश्न तुम्हाला पडण्याआधी हे सांगायला हवं की, राज ठाकरे हे चालू घडामोडींवर तातडीने प्रतिक्रिया देत नाहीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरुन तर ते फारच कमी व्यक्त होतात. त्यामुळं त्यांचं हे ट्वीट चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं.
थोडसं आधी म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये डोकावून पाहिलं तर राज ठाकरेंच्या भूमिकांमधील बदल आश्चर्यकारकरीत्या बदलेला दिसतो.
लोकसभा निवडणुकीत 'मोदी-शाहमुक्त भारता'ची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. मात्र, विधानसभा निवडणुका झाल्या, शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली आणि राज ठाकरेंची भूमिका 'मोदी-शहां'च्या दिशेनं झुकली.
राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात NRC च्या मुद्द्यावर भाजपचं समर्थन करुन राज ठाकरेंनी आपल्याच लोकसभेत भूमिकेला छेद दिलाय. बहुतांश विरोधी पक्ष NRC विरोधात असताना, राज ठाकरे मात्र समर्थनार्थ उतरलेत. त्यामुळं ते एनडीएच्या जवळ जाण्याचा आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेण्याचा प्रयत्न करतंय का, असा साहजिक प्रश्न उभा राहतो. याच प्रश्नाचा बीबीसी मराठीनं आढावा घेतलाय.
तत्पूर्वी, आगामी काळात हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्याबाबत राज ठाकरे यांनी अद्याप जाहीररित्या सांगितलं नसलं, तरी गेल्या काही दिवसात संकेत मात्र दिले आहेत.
हिंदुत्त्वाच्या राजकारणाचे राज ठाकरेंनी दिलेले निवडक 5 संकेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारी 2020 रोजी म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मुंबईत पक्षाचं अधिवेशन घेतलं.
1) मनसेच्या मुंबईतील अधिवेशनावेळी राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या अनेक संकेत दिले. या अधिवेशनाच्या आमंत्रणाची टॅगलाईन होती - 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा'
2) याच अधिवेशनात मनसेचा झेंडा म्हणून 'शिवमुद्रा' असलेला भगवा झेंडा स्वीकारला आणि अधिवेशनातील भाषणही हिंदुत्वाच्या जवळ जाणारं केलं.
3) 'मोदी-शाहमुक्त भारत' अशी घोषणा देणारे राज ठाकरे यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात NRC ला समर्थन दिलं. ते पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या हकालपट्टीचा मुद्दा मांडतायत.
4) NRC च्या समर्थनार्थ नियोजित मोर्चासाठी राज ठाकरे यांनी भायखळा ते आझाद मैदान अशा मार्गाची मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी या मार्गाला नकार दिला. कारण भायखळा हा मुस्लीमबहुल परिसर आहे. आता गिरगाव चौपाटीच्या हिंदू जिमखान्यापासून महामोर्चाला सुरुवात होईल.
5) पाच फेब्रुवारीला संसदेत मोदींनी राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची घोषणा केली. इतक्या लगेच कुठल्याही घटनेवर प्रतिक्रिया न व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळी मात्र अवघ्या काही तासात राज ठाकरेंनी मोदी सरकारचं आभार मानणारे ट्वीट केलं.
भाजपसोबत जाणार का? मनसेचे नेते म्हणतात...
महाराष्ट्र धर्म म्हणजे हिंदुत्व नव्हे, असं म्हणत अनिल शिदोरे म्हणतात, "महाराष्ट्र धर्म आणि हिंदवी स्वराज्य. महाराष्ट्र धर्म ही लाईन आमची पहिल्यापासूनच आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे हिंदुत्त्व नव्हे, त्याचा वेगळा अर्थ आहे."
राज ठाकरे उद्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका जाहीर करतील, अशी मला वाटतं, असंही शिदोरे म्हणाले.
मात्र, भाजपसोबत जाणार का, या प्रश्नाला अनिल शिदोरे स्पष्टपणे नकारार्थी उत्तरही देत नाहीत. ते म्हणतात, "त्या निष्कर्शापर्यंत जाण्याची गरज नाही. राजकीय पक्ष नेहमीच बदलत जाणारे असतात. एका पुस्तकात लिहून ठेवलंय, तसंच पुढे जायचं, असं नसतं. राज्याच्या राजकारणात पर्याय खुले आहेत."
अनिल शिदोरे यांनी एकप्रकारे भाजपसोबत जाण्याचे संकेतच दिलेत. शिवाय, असेच संकेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनीही दिलेत. अभ्यंकर म्हणाले, "या क्षणापर्यंत दोघांकडूनही (भाजप आणि मनसे) एकमेकांना तसा प्रस्ताव नाही. मात्र राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो."
मग मुंबईतला मनसेचा महामोर्चा त्याच दिशेनं एक पाऊल म्हणायचं का, या प्रश्नावर मात्र अविनाश अभ्यंकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, "महाराष्ट्रासह भारतात अनधिकृत व अवैधरित्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक राहतायत. त्यांची त्वरित या देशातून हकालपट्टी करावी. याकरता हा मोर्चा असेल. राज ठाकरेंनीही तसं स्पष्ट केलंय."
तसंच, "कुणी कसं या महामोर्चाकडे पाहायचं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मोर्चाचा मूळ उद्देश घुसखोरांची हकालपट्टी करा, हाच आहे," असंही अभ्यंकरांनी नमूद केलं.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे मात्र मनसेच्या मोर्चाला 'हिंदुत्त्वाच्या मुद्द्यासाठीची तयारी' संबोधतात.
हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे जाण्याआधी जी पार्श्वभूमी तयार करणं अपेक्षित आहे, ती तयारी म्हणजे मनसेचा मोर्चा आहे, असं म्हणत अभय देशपांडे पुढे सांगतात, "आता फक्त भाजपसोबत जाण्यासाठी पार्श्वभूमी तयार करतायत. भाजपसोबत जाण्याची घोषणा लगेच करणार नाहीत. कारण लगेच कुठल्याच निवडणुका आता नाहीत."
शिवसेनेची स्पेस मनसे घेईल?
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार जर राज ठाकरे भाजप आणि हिंदुत्वाच्या दिशेनं वळत असतील, तर शिवसेनेची जागा ते मिळवू पाहतायत का, असा सहाजिक प्रश्न चर्चेस येतो.
जिथं जिथं पोकळी तयार होते, तिथं जाऊन ती पोकळी व्यापायचा प्रयत्न मनसे करते, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.
भाजपही मनसेमध्ये इतका रस का घेते, याबाबतही अभय देशपांडे सांगतात. ते म्हणतात, "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं जाणं, हे ज्या शिवसैनिकांना रुचलं नाही त्यासाठी मनसेचा पर्याय खुला होऊ शकतो. शक्य झालं तर थेट युती करणं किंवा मनसेला सक्षम करुन सेनेच्या मतांचं विभाजन करणं, अशा दोन पातळीवर भाजप प्रयत्न करेल."
या चर्चेतील मनसे आणि शिवसेना या दोन्ही घटकांशी आम्ही चर्चा केली.
मनसेची स्वत:चीच एक स्पेस आहे - मनसे नेते
शिवसेनेची स्पेस मिळवण्याचा प्रयत्न मनसे करत असल्याच्या चर्चा मनसे नेते अनिल शिदोरे नाकारत म्हणतात, "मनसेच्या स्थापनेवेळीही म्हटलं जायचं की, सेनेच्या मराठीच्या मुद्द्याची स्पेस मनसेने घेतली. मात्र, मनसेनं स्वतंत्र वाटचाल केली."
तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणतात, "मराठीचा मुद्दा मनसे कधीच सोडत नाही. पक्षाचं नावच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मनसेची स्वत:ची अशी एक स्पेस आहे. कुणीही पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो."
शिवसेनेनं मात्र काहीशी आक्रमक भूमिका मांडली.
मनसेचा केवळ स्टंट असल्याची शिवसेनेकडून टीका
"मनसे शिवसेनेची स्पेस घेऊ शकत नाही. हा त्यांचा केवळ स्टंट आहे. भूमिका बदलण्याची मनसेला सवय आहे," असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणतात.
कायंदे म्हणतात, "झेंडा बदलणं, लेटरहेड बदलणं हेच अनेकांना आवडलं नाहीय. शिवमुद्रा वापरण्याचा मुद्दाही आवडला नाही. या बाह्य बदलल्यानं पक्षाची विचारधारा बदलत नाही. शिवसेनेनं सरकार चालवण्यापुरती युती केली आहे, धर्मांतर केलं नाहीय."
नाराज शिवसैनिकांच्या मुद्द्यावर मनिषा कायंदे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "बाळा नांदगावकर किंवा एक दोन लोक सोडले, तर मनसेते गेलेले सर्व शिवसेनेत परतले. सहा नगरसेवकही मनसेत आले. त्यामुळं शिवसेनेतील कुणी मनसेत जाईल, ही धास्ती आम्हाला नाही."
वरिष्ठ पत्रकार संदीप आचार्य म्हणतात, "मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हलवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबई महापालिकेत भाजप स्वत:च्या जीवावर शिवसेनेला शह देऊ शकत नाही. त्यामुळं मनसेचा पर्याय त्यांना जवळचा वाटत असावा."
…मात्र हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मनसे यशस्वी होईल?
"मराठी मतं आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण करुन आपल्या पारड्यात पाडण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतायत," असं संदीप आचार्य म्हणतात.
अभय देशपांडे पुढे म्हणतात, "राज ठाकरेंचं राजकारण समोर काय होतंय यावर अवलंबून असतं, समोरील समीकरण बदललं की त्यांचं राजकारण बदलतं. या प्रतिक्रियावादी राजकारणामुळं त्यांचं अडचणच होते. काहीवेळा डॉक्टर, तर काहीवेळा औषध बदलून बघतात."
मनसेनं पक्षचिन्हाची म्हणजेच इंजिनाची दिशा वारंवार बदलल्याचा इतिहास आहे. त्याच अनुषंगानं अभय देशपांडे मनसेच्या प्रवासाचं मार्मिक वर्णन केलं.
ते म्हणतात, मनसे 'इंजिना'ची दिशा जशी बदलली, तशा भूमिका बदलल्यात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)