राज ठाकरे आणि मनसे यांचा पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनात वैचारिक आणि राजकीय गोंधळ थांबेल?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून एक तप उलटून गेलं आहे. कुठल्याही राजकीय आणि सामाजिक विचारधारेसाठी पाळमुळं घट्ट करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण गेल्या 13 वर्षांच्या काळात राज ठाकरे राजकीय आणि वैचारीक गोंधळात सापडले आहेत का, असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. साधारण दरवर्षी एक अशा वेगवेगळ्या आणि काही वेळेला विसंगत भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्या. गेल्या 13 वर्षांमध्ये पक्षानं यंदा पहिल्यांदाच महाअधिवेशन बोलावलं आहे तेही बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी. त्या निमित्तानंतरी आता मनसेचा वैचारिक आणि राजकीय गोंधळ थांबेल का, याचा आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

9 मार्च 2006...शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली. 13 वर्षांच्या राजकीय वाटचालीत मनसेनं अनेक चढउतार पाहिलेत.

पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर मात्र मनसेला असं यश मिळालं नाही. सभांना गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये करता आलं नाही. मनसेचं प्रभावक्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकपलीकडे विस्तारलं नाही.

या काळात राज ठाकरेंनीही आपल्या भूमिका अनेकदा बदलल्या. माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन असं म्हणणारे राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्षासाठी मला संधी द्या, अशी भाषा करू लागले. त्यांच्या भूमिकांमधला वैचारिक विरोधाभासही अधिकाधिक ठळकपणे समोर येऊ लागला.

विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात शिवसेनेनं राज्यात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. दुसरीकडे या बदलत्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे यांचं भविष्यातील राजकारण कसं असेल, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे मनसे आता भाजपसोबत जाणार का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला.

या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे 23 जानेवारीला (बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन) मुंबईत मनसेचं पहिलं महाअधिवेशन घेणार आहेत. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाच्या वाटचालीबद्दल अधिकृतपणे भाष्य करतील, अशी अपेक्षा आहे.

त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना महाअधिवेशनाच्या निमित्ताने सक्रिय राजकारणात 'लाँच' केलं जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

महाअधिवेशनात मनसेचा नवीन झेंडाही सादर केला जाऊ शकतो. कारण मनसेनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पक्षाचा भगवा, हिरवा आणि निळा हे तीन रंग असलेला झेंडा हटवला आहे आणि आता पक्षाच्या पेजवर केवळ मनसेचं निवडणूक चिन्ह असलेलं इंजिनच आहे.

मनसेच्या नवीन झेंड्यामध्ये केवळ भगवा रंग असेल, अशा बातम्या माध्यमांमधून येत आहेत. मनसेच्या ट्विटर पेजवरच्या महाअधिवेशनासंदर्भातील व्हीडिओमध्ये 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' असा उल्लेख आहे. भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली प्रतिमा या व्हीडिओमध्ये वापरली आहे.

स्वाभाविकच, मनसे आता हिंदुत्वाची विचारधारा पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून स्वीकारणार का, अशी तर चर्चा सुरू आहेच. पण गेल्या तेरा वर्षांतला मनसेचा वैचारिक गोंधळ संपुष्टात येणार का, हा कळीचा मुद्दा आहे.

मराठीचं हित ते हिंदुत्व, नरेंद्र मोदींची स्तुती ते त्यांना केलेला कडवा विरोध, शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक ते भाजपशी संधान बांधण्याचा प्रयत्न असा राज ठाकरेंचा राजकीय लंबक आता तरी स्थिरावेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी आपण मराठी माणसाच्या हितासाठी काम करू अशी भूमिका घेतली. मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या लोंढ्यांवर टीका केली.

त्या राज्यांतील राजकारण्यांमुळे तिथे रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात. तिथल्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा भुर्दंड महाराष्ट्रातील जनतेने का भ‍रावा? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.

अमिताभ बच्चन हे मुंबईत राहतात, मात्र सामाजिक कार्यासाठी ते आपल्या मूळ राज्याचीच निवड करतात, असं म्हणत राज यांनी बच्चन यांच्यावरही टीका केली होती.

ऑक्टोबर २००८मध्ये पश्चिम रेल्वेची कर्मचारी भरती परीक्षा मनसेनं उधळून लावली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाणही केली होती.

या पश्चिम रेल्वेच्या भर्तीसाठी बिहारी परीक्षार्थींचीच का निवड करण्यात आली, तसंच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जाहिरात न देण्यास कारण काय? असा मनसेचा सवाल होता. यानंतर 'खळ्ळ खट्याक' हा शब्दप्रयोगच मनसेच्या आंदोलनांसाठी रुढ झाला. या घटनेनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं.

मराठी पाट्या, मराठी चित्रपटांना अधिक शो मिळावेत म्हणून केलेली आंदोलन यामुळेही मनसे चर्चेत राहिली. पण या आंदोलनांपलिकडे मराठी माणसाच्या हितासाठी मनसेकडून फारशी रचनात्मक कृती घडली नाही.

2006 ते 2019 या 13 वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. परप्रांतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी डिसेंबर 2018 मध्ये थेट उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्या मंचावरून बोलताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही. तुमचा स्वाभिमान कुठे आहे….तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही अशी विचारणा राज ठाकरेंनी उपस्थितांना केली.

राज ठाकरेंच्या या प्रवासाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी म्हटलं, की याबाबतीत राज यांचा राजकीय प्रवास बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गानं जाताना दिसतोय.

"बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा त्यांनी दाक्षिणात्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी गुजरातींविरोधात भूमिका घेतली. पण नंतर अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणादरम्यान त्यांनी कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतली. राज हेसुद्धा काहीसं संधीसाधू राजकारण करताना दिसत आहेत."

"आधी त्यांनी उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतली. मग मुस्लिमविरोधी लाटेवर स्वार झाले. भाजपच्या उदयानंतर इतर पक्षांना मुस्लिमविरोधाची 'स्पेस' उरलीच नाही. त्यामुळे राज आता कोणत्या दिशेला जायचं या संभ्रमात आहेत," असंही आनंदन यांनी म्हटलं.

सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका

एका बाजूला मराठीचा मुद्दा लावून धरताना राज ठाकरे कुठेतरी 'सॉफ्ट हिंदुत्वा'कडे झुकतानाही दिसत होते. ही बाब प्रकर्षानं समोर आली ती 2012 सालच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान.

11 ऑगस्ट 2012 ला म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांनी आझाद मैदानावर रॅली काढली होती. या रॅलीमध्ये हिंसाचार झाला. पोलिसांवर तसंच काही पत्रकारांवरही हल्ला झाला.

राज ठाकरेंनी या हल्ल्यानंतर मुस्लिम संघटना आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावरही टीका केली होती. या रॅलीला मोठ्या संख्येनं बांगलादेशी उपस्थित होते, असा आरोपही त्यांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला.

यात हिंदू विरुद्द मुस्लिम त्यातही बांगलादेशी मुस्लिम अशी उघड भूमिका दिसत होती. विशेष म्हणजे हा तोच काळ होता, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा कडव्या हिंदुत्वाचा चेहरामोहरा बदलत होता.

महाराष्ट्रातल्या बदलत्या सत्ता समीकरणांमध्ये मनसे भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे महाअधिवेशनात हिंदुत्ववादी भूमिकेचा उघड स्वीकार करणार का, हा प्रश्न आहे.

पत्रकार धवल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर The Thackeray Cousins हे पुस्तक लिहिलंय.

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना धवल कुलकर्णी यांनी म्हटलं, "राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे...मदोघांचं राजकारण हे प्रतिक्रियावादी राहिलं आहे. त्यामुळे उद्धव हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानंतर राज यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं."

"दुसरं म्हणजे राज यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा चार राजकीय पक्षांपलिकडेही प्रादेशिक पक्षांसाठी स्पेस आहे, अशी त्यांची भूमिका होती. ज्यामध्ये तथ्यंही होतं. राज ठाकरेंनी त्यांचा झेंडाही त्यावेळी पॉलिटिकली करेक्ट डिझाइन केला होता. पण राज ठाकरेंना 2017 मध्ये आपला झेंडा बदलायचा होता. तो काही काळानं राहून गेलं. आता कदाचित जो बहुसंख्यवाद वाढत आहे, त्याच्या लाटेवर स्वार होण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असावा.

"पण हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळताना मराठी आणि बौद्ध समाज हा विरोधात जाऊ शकतो, हेही पहायला हवं. दुसरं म्हणजे, हिंदुत्वाची भूमिका तात्कालिक फायदा मिळवून देते, पण त्यामुळे तुम्हाला ताकदीचा स्थानिक पक्ष होण्याला मर्यादा येतात. शिवसेनेनं त्यांच्या मध्यात ही भूमिका घेतल्यानं त्यांना तामिळनाडूमधल्या 'DMK' सारखा पक्ष होता आलं नाही. त्यांनी एक संधी गमावली. राज यांच्या पक्षाची स्थापना भाषिक मुद्द्यांतून झाली. पण तेही आता शिवसेनेच्याच रस्त्यावर जाताना दिसताहेत," असंही धवल कुलकर्णी यांनी म्हटलं.

हात, घड्याळ की कमळ?

2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका काय असेल? ते 'किंग मेकर' ठरणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला.

त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसेची पीछेहाट होत गेली.

2019 मध्ये मनसेनं लोकसभेची निवडणूक लढविली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज ठाकरे यांचे असलेले संबंध, लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींविरोधात केलेला प्रचार पाहता विधानसभा निवडणुकीच्यावेळेस मनसे आघाडीमध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

त्यातच जुलै 2019 मध्ये राज ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेतल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं.

मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं चित्रच बदललं. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट राज्यातील नवीन समीकरणांची नांदी आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं, की राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू वा कायमचा मित्र नसतो."

"महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपण हे पाहिलं आहे - काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी एकत्र आले. महाराष्ट्रात शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येताना आपण पाहिलं. जो काही निर्णय असेल तो राजसाहेब जाहीरपणे सांगतील."

अर्थात, लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरे भाजपसोबत कसे जाणार या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनी म्हटलं, "लोकसभेच्या वेळेस केलेली टीका ही भाजपवर केलेली टीका नव्हती तर मोदींवर केलेली टीका होती. राजसाहेबांनी त्यावेळेस भाषणात 'मोदीमुक्त भारत' झाला पाहिजे असं म्हटलं होतं. ते एका व्यक्तीबद्दल होतं. पक्षाबद्दल आम्ही काही म्हटलं नव्हतं. स्थानिक पातळीवर प्रश्न वेगळे असतात, समीकरणं वेगळी असतात. त्यादृष्टीनं स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात. जर युतीसारखा मोठा निर्णय घ्यायचा असेलच तर तो राजसाहेबच घेतील."

राज ठाकरेंच्या या एकूण राजकीय प्रवासाबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं होतं, "दर कालांतरानं नवीन भूमिका घेणं हे 'मनसे'च्या मतदाराला पटणं अवघड जाईल. अनपेक्षितपणे या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मनसेला मतं मिळाली आहेत, ती पाहता लोकांना वाटतंय की राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरून पाय रोवावेत. एक पर्याय तयार करावा, पण ते जर कोण्या एका पक्षाच्या आधाराला जाणार असतील तर त्याचे काही तात्कालिक फायदे असतात, पण मर्यादा अनेक असतात."

नरेंद्र मोदींना पाठिंबा ते कट्टर विरोध

2019 च्या लोकसभा निवडणुका मनसेनं लढवल्या नव्हत्या. मात्र तरीही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोजक्या सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर कडाडून टीका केली होती.

मोदींची आश्वासनं, त्यांनी जाहीर केलेल्या योजना यांची आजची परिस्थिती काय आहे, याचं व्हीडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून द्यायचे. त्यांचं 'लाव रे तो व्हीडिओ' हे वाक्य प्रचारादरम्यान भरपूर गाजलं.

राज कोणासाठी प्रचार करत आहेत, हा प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता. पण राज यांनी आपण नरेंद्र मोदी-अमित शहांना मत देऊ नका यासाठी प्रचार करतोय, असं स्पष्ट केलं होतं.

गुढीपाडव्याला घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राहुल गांधींना पंतप्रधान पदाची संधी द्यायला काय हरकत आहे, असं विधानही केलं होतं.

पण नरेंद्र मोदींनी निवडून देऊ नका, असं म्हणणारे राज ठाकरेंनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधानपदासाठी एकमेव लायक उमेदवार आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.

4 ऑगस्ट 2011 मध्ये मोदींच्या आमंत्रणांनंतर राज यांनी गुजरात दौरा केला होता. त्या दौऱ्यानंतर राज यांनी अनेक सभांमध्ये नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधान पदासाठी एकमेव लायक उमेदवार अशी भूमिका घेतली होती.

"राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींबद्दलच्याच नाही तर एकूणच भूमिकेत सातत्य नाही," असं मत सुजाता आनंदन यांनी व्यक्त केलं.

"राजकारणात एखादी गोष्ट घडून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण तो संयम राज ठाकरेंकडे नाहीये. 'आज मी नरेंद्र मोदींना विरोध केला, तर उद्या मला मतं मिळतील आणि मी निवडून येईन,' अशी काहीशी भूमिका राज ठाकरे यांची आहे," असं सुजाता आनंदन यांनी म्हटलं.

"खरंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज यांनी मांडलेली भूमिका योग्य होती. नरेंद्र मोदींवर टीका करताना इतर विरोधकांपेक्षा ते खूप 'आर्टिक्युलेट' होते. ते आपल्या भूमिकेवर टिकून राहिले असते तर भविष्यात त्यांना निश्चित फायदा झाला असता. पण त्यांच्यात तेवढं थांबण्याची तयारी नाहीये. आणि आता तर ते भाजपसोबतच जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सहा-आठ महिन्यांपूर्वीच नरेंद्र मोदींवर केलेली टीका लोक विसरले नाहीत. त्यामुळे ते आता भाजपसोबत गेले तर त्यांची राजकीय विश्वासार्हता पणाला लागेल," असंही आनंदन यांनी म्हटलं.

शिवसेनेबाबतचा गोंधळ

2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राज ठाकरेंना युतीत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने प्रयत्न केले होते. 2013 च्या दरम्यान हे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं सामनातून नाराजी व्यक्त केली होती. पण दुसरीकडे शिवसेना नेते टाळीसाठी हात पुढे असल्याचंही म्हणत होते. राज ठाकरेंनी या सगळ्याची खिल्ली उडवताना 'खिडकीतून डोळे कसले मारता', असं म्हटलं होतं.

पण 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेस हे चित्र बदललं. महापालिका निवडणुकीत सेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

राज ठाकरेंनी उद्धव यांना फोन केला होता, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असंही वृत्त आलं होतं. राज ठाकरेंनी शिवसेना-मनसे युती अफवा असल्याचं नंतर म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)