बबनराव लोणीकर: ‘तहसीलदार मॅडम हिरोईन’ वक्तव्यावरून भाजप नेत्याची सारवासारव

महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते आणि फडणवीस सरकारमध्ये राज्याचे पाणिपुरवठा मंत्री राहिलेले बबनराव लोणीकर हे मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्यासंदर्भात एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

"तुम्हाला वाटलं मोर्चासाठी एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू. आणि नाही जर कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच," असं बबनराव लोणीकर म्हणाले.

लोणीकरांच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल झालीय. त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर लोणीकरांनी त्याबाबत स्पष्टीकरणही दिलं.

नेमकं काय होतं त्या भाषणात?

व्हायरल झालेल्या ऑडिओक्लिपमध्ये लोणीकर म्हणतायत: "सरकारकडून 25 हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का, तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा येथे होऊ शकतो.

"आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर 25 हजार लोक आणेल, 50 हजार लोक आणेल. तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू, तुम्ही सांगा सुधीरभाऊंना आणू, कुणाला आणायचं? तुम्हाला वाटलं तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू. आणि नाही जर कुणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील तुमचं."

त्यानंतर विरोधकांनी लोणीकरांवर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बबनराव लोणीकरांना उद्देशून म्हटलंय, "जिजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच, त्यांची काळजी करू नका. पण तुमच्यासारखा व्हिलन आजूबाजूला असेल तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला वेळ लागणार नाही. सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून तुमची गेली नाहीय."

बोलताना भान ठेवा आणि वक्तव्य जबाबदारीनं करा, असा सल्लाही चाकणकरांनी लोणीकरांना दिलाय.

केवळ विरोधकांकडूनच नव्हे, तर स्वपक्षीय नेत्यांनीही बबनराव लोणीकरांवर टीका केलीय.

भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. त्या म्हणाल्या, "वक्तव्य निषेधार्हच. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना... अगदी कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भाषण करण्याच्या ओघात किंवा बोलण्याच्या भरात सुद्धा शब्दांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अशा वक्तव्यांना समर्थन नाहीच."

दरम्यान, बीबीसी मराठीनं बबनराव लोणीकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र,ते "एका कार्यक्रमात व्यग्र" आहेत, असं सांगण्यात आलं.

लोणीकरांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. "माझ्या भाषणामध्ये मी म्हणालो, सरकारनं शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसानभरपाई देऊ, अशी घोषणा केली होती. हेक्टरी 25 हजार देण्याचं मान्य केलं होतं. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. त्याच्यासाठी आपल्याला मोठा मोर्चा काढायचा आहे."

ते पुढे म्हणाले, "मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार किंवा एखादी हिरोईन बोलवायची आहे. हिरोईन आली नाही, तर तहसीलदार मॅडम आपलं निवेदन स्वीकारायला येतील आणि त्या हिरोईन आहेत.

"याचा अर्थ वाईट होतो, असं मला वाटत नाही. हिरोईन याचा मराठीत अर्थ नायिका. नायिका म्हणजे कर्तबगार महिला, असा त्याचा अर्थ होतो. आमच्या परतूरच्या तहसीलदार कर्तबगार, डॅशिंग आहेत. प्रशासनावर त्यांची पकड आहे, जनतेची कामं करण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे.

"विरोधकांना आम्हाला विनंती करायचीय की, याचं भांडवल तुम्ही करू नका. हिरोईन शब्दाचा अपमान आपण करू नका. हे शब्द चांगल्या भावनेनं वापरलेले आहेत. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण डॅशिंग, सिंघम, हिरोईन म्हणतोच. विनाकारण वाद घालू नये," असंही लोणीकर म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)