पंकजा मुंडे उपोषण : देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये व्यासपीठावर दिसण्याचा अर्थ काय?

12 डिसेंबर 2019. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावरचं भावनिक भाषण तुम्हाला आठवत असेलच.

या कार्यक्रमात व्यासपीठावर पंकजा मुंडे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेही उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी आपली पक्षावरची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातील आपला पराभव धनंजय मुंडे यांच्यामुळे नाही तर पक्षातीलच काही लोकांमुळे झाल्याचा पंकजा यांचा आरोप होता.

पक्षात जाणूनबुजून आपल्याला डावललं जात आहे. तसंच आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पंकजा म्हणाल्या. अर्थातच त्यांच्या बोलण्याचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता.

त्या भाषणात पंकजा मुंडे यांनी मशाल घेऊन राज्याचा दौरा करणार असल्याचं आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. यापुढचं काम गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार असल्याचं त्या म्हणाल्या.

त्यानुसार सोमवारी 27 जानेवारीला पंकजा मुंडे या उपोषणाला बसल्या. पण या उपोषणात इतर भाजप नेत्यांसह खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिल्यामुळे खरा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यातच आता ते पंकजा यांच्या उपोषणावेळी थेट व्यासपीठावर गेल्यामुळे चर्चांना ऊत आला आहे. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.

भाजपमधलं नेतृत्वबदलाचे परिणाम

देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांच्यासोबत उपोषण आंदोलनाच्या व्यासपीठावर दिसण्यामागे भाजपमधलं नेतृत्वबदल हे प्रमुख कारण आहे, असं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांना वाटतं.

उन्हाळे या गोष्टीचं विश्लेषण करताना सांगतात, "गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर आता जे. पी. नड्डा यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आली आहे. ही बाब नोंद घेण्यासारखी आहे."

"जे. पी. नड्डा यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील सर्व राज्यातील पक्षांतर्गत रुसवेफुगवे मिटवण्याचं काम हाती घेतलं आहे. पक्षातील गटबाजी मिटवण्यासाठी त्यांनी वैयक्तिकपणे लक्ष घातलं आहे."

ते पुढे सांगतात, "पंकजा यांचं उपोषण हे मराठवाड्याच्या पाण्यासाठी आहे. पण हे उपोषण काही इतक्या मोठ्या स्वरूपात होणार नव्हतं."

"पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे उपोषण करणार होत्या. पण हे उपोषण भाजपच्या नेतृत्वाखाली होईल, अशी सूचना नड्डा यांनी दिल्याची शक्यता आहे. तिथं फडणवीस यांनी जायला हवं, अशीही त्यांची सूचना असू शकते," असं त्यांना वाटतं.

पंकजांच्या आंदोलनात भाजपचा शिरकाव

पंकजा यांचं आजचं उपोषण आणि आंदोलन भाजपने हायजॅक केलं, असं ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख यांना वाटतं. "पंकजा मुंडे यांचं हे उपोषण म्हणजे मराठवाड्याचं पाणी आणि दुष्काळ इथपर्यंतच मर्यादित होतं, असं म्हणता येणार नाही. मधल्या काळात त्यांनी केलेली वक्तव्यं आणि भाजपमधला संभ्रम ही पार्श्वभूमी त्यामागे आहे.

"भारतीय जनता पक्षातली सगळी वरिष्ठ मंडळी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर दिसून आली. वादावर पडदा टाकण्याची प्रक्रिया म्हणून याच्याकडे पाहता येईल. त्यामुळे या मुद्द्यावर भाजपला बऱ्यापैकी कव्हर अप करता आलं आहे."

पंकजा मुंडे यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर गोपीनाथ गड तसंच इतर आंदोलनं यामध्ये भाजप त्यांच्या बाजूने आहे, असा संदेश देण्यास भाजप यशस्वी झाला आहे, असं निरीक्षण सरदेशमुख व्यक्त करतात.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांनीसुद्धा असंच मत व्यक्त केलं. ते म्हणतात, "पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेलं उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली होणार होतं. पण भाजपचे अनेक नेते यामध्ये सहभागी होणार आहेत, हे नंतर स्पष्ट झालं. ही बाब महत्त्वाची ठरते."

पंकजांसोबत ओबीसी मतदार

संजीव उन्हाळे पुढे सांगतात, "भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असलेला ओबीसी मतदार ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. हा ओबीसी वर्ग नेहमीच भाजपच्या बाजूने मतदान करताना दिसून आलेलं आहे. हा मतदार भाजपला गमवायचा नाही."

ते सांगतात, "ओबीसींच्या पाठिंब्यामुळेच भाजपमध्ये पंकजा यांना महत्त्व आहे. त्या तुलनेत एकनाथ खडसे यांची भाजपला इतकी भीती नाही. म्हणूनच पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांना जावं लागलं."

"आपला पराभव धनंजय यांच्यामुळे नाही तर पक्षातील लोकांमुळेच झाल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्यामुळे पक्षात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पंकजांसोबत उपोषणात सहभागी व्हावं लागलेलं असू शकतं," असंही उन्हाळे सांगतात.

पंकजा आणि भाजप : दोघांचीही अपरिहार्यता

पंकजा आणि भाजप यांना एकत्रितच काम करावं लागेल, ही दोघांचीही अपरिहार्यता असल्याचं सरदेशमुख पुढे सांगतात. त्यांच्या मते, "एकूण मराठवाड्यातली राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजपची मराठवाड्यातली वाढ गोपीनाथ मुंडे यांच्या ओबीसी राजकारणातून झाली. त्याचं फलित म्हणून त्यांची वाढ होत गेली, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ओबीसी पाया सोडून भाजपला मराठवाड्यात काही करता येण्यासारखं नाही.

"तसंच दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांनाही भाजपला सोडून चालणार नाही. पुढे जायचं असेल तर भाजपच्या नेत्यांना सोबत घ्यावं लागेल, अशी पंकजा यांचीही अपरिहार्यता या मागे आहे, हे दृश्य याच्या माध्यमातून दिसून येत आहे," असंही सरदेशमुख पुढे सांगतात.

पंकजा मुंडे यांचा अस्तित्व राखण्याचा प्रयत्न

गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे करत आहेत, असं दिलीप वाघमारे यांना वाटतं. ते याबाबत सांगतात, "गोपीनाथ मुंडे यांनीही भाजपमध्ये डावललं जात असताना याच ठिकाणी उपोषण केलं होतं. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांची दखल घेतली होती.

"अशाच प्रकारे पंकजा मुंडे उपोषणाच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा अत्यंत भावनिक मुद्दा त्यांनी यासाठी निवडला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)