You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 600 कोटींची तरतूद #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 600 कोटींचा तरतूद
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात वाढवण्यात आलीय. 2020-21 या आर्थिक वर्षात मोदींच्या सुरक्षेवर जवळपास 600 कोटी रुपये खर्च केले जातील. नरेंद्र मोदी यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG सुरक्षा आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
गेल्यावर्षी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोदींच्या सुरक्षेसाठी अंदाजे 540 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
दुसरीकडे, नोव्हेंबरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या SPG सुरक्षा काढण्यात आली, तर त्याहीआधी ऑगस्ट महिन्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची SPG सुरक्षा काढण्यात आली होती.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातील केवळ पंतप्रधानांसाठी असलेली ही सुरक्षा 1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबीयांसाठी देणयात आली होती.
2) बजेटमधून मुंबईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - उद्धव ठाकरे
मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलंय आणि याची खंत मुंबईकरांसह महाराष्ट्राला नेहमी राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सामनानं ही बातमी दिलीय.
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच नसल्याचं ते म्हणाले.
देशातल्या पाच ऐतिहासिक ठिकाणांचा 'आयकॉनिक साईट' म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, "या संकल्पात सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याच ठिकाणाचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबत हा दुजाभाव ठळकपणे दिसून येतो."
3) कर्जमाफी कायमस्वरुपी तोडगा नाही - शरद पवार
"कर्जमाफी हा कायमस्वरुपी तोडगा नाही. कर्जमाफीमुळं नियमित कर्ज फेडणाऱ्यांवर अन्याय होतो," असं मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
"शेती हे हवामानावर अवलंबून असलेलं क्षेत्र आहे, त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना ताकद देणं आवश्यक आहेच. मात्र, शेतकऱ्यांनीही बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक उत्पादन घेणं गरजेचं आहे," असं शरद पवार म्हणाले.
सातारा जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे मत मांडलं.
महाविकास आघाडीच्या सरकारवरही शरद पवारांनी यावेळी भाष्य केलं.
ते म्हणाले, "राज्यात सध्या तीन लोकांचा संसार एकत्र बांधून चालवायचा आहे. यातल्या एकालाच पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मात्र या सरकारमध्ये सगळे समन्वयानं काम करतायत आणि राज्याच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आहे."
4) भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला मुदतवाढ
भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. चौकशीच्या कामासाठी लागणारा निधीही सरकार वितरित करेल, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाची मुदत 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपत आहे. त्यातच या आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2019 पासून पगार मिळालेला नाही. दैनंदिन खर्चासाठी निधीही उपलब्ध नाही. त्यामुळं चौकशी गुंडाळण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र आयोगानं सरकारला दिलं होतं.
त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आयोगाच्या मुदतवाढीसह निधी वितरित केल्याची माहिती दिली. तसंच, निधी वितरित करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितले.
5. गाण्यातून बंदुकीचे उदात्तीकरण करणासाठी गायकावर गुन्हा दाखल
पंजाबी गायक शुभदीप सिंग ( सिद्धू मूस वाला) मनकिरत औलख आणि सात अज्ञात व्यक्तींवर गाण्यांमधून हिंसेचं उदात्तीकरण करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.
गाण्याचं नाव पंज गोलीयां म्हणजेच पाच बंदुकीच्या गोळ्या असं आहे. पंजाबमधील मनसा येथील पोलीस अधीक्षक नरेंद्र भार्गव यांनी सांगितलं की भारतीय दंडविधानाच्या कलम 509 नुसार शुभदीपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)