You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे म्हणतात तसं अमेरिका, ब्रिटनच्या नागरिकांना जगात फिरण्यासाठी व्हिसाची गरज नसते? - बीबीसी फॅक्टचेक
- Author, फॅक्टचेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
"गंमत बघा, अमेरिकन पासपोर्ट, ब्रिटीश पासपोर्ट ज्याच्याकडे असतो, असे अजून काही देश आहेत. तिथल्या नागरिकांना जगात कोणत्याही देशात जायला व्हिसा लागत नाही. पण त्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा लागतो."
"म्हणजे जिथं इथून-तिथून सगळीकडून माणसं येत आहेत. तिथं अमेरिकेतून आणि ब्रिटनमधून आलेल्या माणसाला विचारतात, काय कशासाठी आले आहात, काय काम होतं?" असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईत केलं.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
इकडून तिकडून सगळे येत आहेत, त्यांच्याबाबत आम्हाला काही वाटत नाही. त्यांच्यासाठी भारत म्हणजे धर्मशाळा आहे, असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.
त्यांचा इशारा बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांकडे होता.
मनसेच्या पहिल्या अधिवेशनात राज ठाकरे बोलत होते. सकाळच्या सत्रात त्यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं.
पूर्वी निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश असलेला मनसेचा झेंडा पूर्णपणे भगवा केल्यामुळे ते हिंदुत्वाच्या दिशेने जात असल्याची चर्चा तर होतीच.
त्यावर स्पष्टीकरण देताना आपण पूर्वीपासूनच हिंदुत्वाची भूमिका मांडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला म्हणजेच सीएएला पाठिंबाही दर्शवला.
सीएएच्या समर्थनार्थ राज ठाकरेंनी काही मुद्दे मांडले. पण यावेळी बोलता बोलता त्यांनी काही चुकीची माहितीसुद्धा दिली.
अमेरिका आणि ब्रिटन या देशातील नागरिकांना जगात इतरत्र फिरण्यासाठी कुठेच व्हिसा लागत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. याच वक्तव्याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने केला आहे.
एखाद्या ठराविक देशाचे दुसऱ्या देशासोबत असलेल्या संबंधांनुसार व्हिसाचा प्रकार ठरवला जातो.
गुरूवारच्या भाषणात राज ठाकरे यांनी अमेरिका आणि ब्रिटनचं उदाहरण दिलं आहे.
अमेरिकेचा विचार केल्यास त्यांचा पासपोर्ट जगातील टॉप 10 देशांमध्ये गणला जातो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना एखाद्या देशात जाण्यासाठी कोणताच व्हिसा लागत नाही.
हेनले पासपोर्ट इंडेक्स या संस्थेने जगातील सर्व देशांच्या पासपोर्टचं सर्वेक्षण केलं आहे. जगातील सर्वांत शक्तीशाली पासपोर्टची आकडेवारी यामध्ये देण्यात आलेली आहे. यात सर्वाधिक देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा ऑन अराईव्हल म्हणजेच संबंधित देशात उतरल्यानंतर व्हीसा मिळणारा पासपोर्ट जपानचा आहे.
या अहवालानुसार, याबाबतीत जपान पहिल्या क्रमांकावर आहे. जपानच्या नागरिकांना सुमारे 191 देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अराईव्हलची सुविधा देण्यात आली आहे.
या यादीत अमेरिका आणि ब्रिटनचा क्रमांक आठवा आहे. या देशांचा पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांसाठी एकूण 184 देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अराईव्हल सुविधा उपलब्ध आहे.
भारतात येण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकांना व्हिसा आवश्यक असतोच. पण भारताशिवाय चीन, रशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार, तुर्कस्तान, इराण आणि नायजेरियाला जाण्यासाठीही त्यांना व्हिसा आवश्यक आहे.
इतकंच नव्हे तर भूतानसारख्या छोट्या देशात जाण्यासाठीही अमेरिकन पासपोर्टधारकाला व्हिसा गरजेचा आहे.
याशिवाय एखाद्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे, पण त्यावर इस्रायलचा शिक्का आहे, तर अशा स्थितीत सीरियासारख्या काही देशांमध्ये त्यांना प्रवेश नाकारलाही जातो. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर याच्याशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे.
याचप्रमाणे ब्रिटनच्या सरकारी वेबसाईटवरही त्यांच्या नागरिकांसाठी सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये चीन, इजिप्त, तुर्कस्तान, इराण रशियासारख्या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ब्रिटीश नागरिकांना भारतात येण्यासाठीसुद्धा व्हीसाची गरज असते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)