You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका-चीनमध्ये व्यापारी करार, ट्रेड वॉर शांत होण्याची चिन्हं
जगभरातले शेअरबाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर पडसाद उमटवणारं अमेरिका - चीनमधलं ट्रेड वॉर थंड करण्यासाठी या दोन्ही देशांनी करार केलाय.
या करारामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये 'परिवर्तन' घडेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी वॉशिंग्टनमध्ये म्हटलंय.
तर हा 'विन - विन' म्हणजेच दोन्ही देशांसाठी चांगला करार असून यामुळे दोन देशांमधले संबंध सुधारतील असं चीनच्या नेत्यांनी म्हटलंय.
अमेरिकेची आयात 200 अब्ज डॉलर्सने वाढवण्याचा करार चीनने केलाय. याशिवाय चीन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचे नियम अधिक सक्त करणार आहे.
तर या बदल्यात चिनी उत्पादनांवर अमेरिकेने नुकतेच लादलेले काही आकार (Tarriff) अर्धे केले जाणार आहेत.
पण अमेरिकेने लादलेले बहुतेक 'बॉर्डर टॅक्सेस' कायम राहणार आहेत. त्यामुळेच याविषयी यापुढे आणखी चर्चा व्हावी अशी मागणी काही व्यापारी गटांनी केली आहे.
2018पासून अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू आहे. यामध्ये या दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनावर कर लादले. परिणामी एकूण 450 अब्ज डॉलर्स मूल्याच्या व्यापारी वस्तूंवर जास्तीचा आयात कर लावण्यात आला. सध्या सुरू असणाऱ्या या वादामुळे व्यापारावर परिणाम झाला, जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर परिणाम झाला आणि परिणामी गुंतवणूकदारांनी हात आखडते घेतले.
काय आहे हा करार?
- 2017 च्या तुलनेत अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या वस्तूंची आयात 200 अब्ज डॉलर्सनी वाढवण्याचं वचन चीनने दिलंय. यामुळे शेती क्षेत्राची मागणी 32 अब्ज, उत्पादनक्षेत्राची मागणी 78 अब्ज, ऊर्जा क्षेत्राची मागणी 52 अब्ज तर सेवा क्षेत्राची मागणी 38 अब्ज डॉलर्सने वाढेल.
- वस्तू वा उत्पादनांची नक्कल केली जाण्याबद्दल कारवाई करण्याचं आश्वासन चीनने दिलं आहे. यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनांची नक्कल वा बनावट उत्पादन तयार करण्यात आल्याबद्दल कायदेशीर कारवाई करणं सोपं होईल.
- चीनी उत्पादनांवर लादण्यात आलेल्या एकूण करांपैकी अमेरिका फक्त 25% कर कायम ठेवेल. साधारण 360 अब्ज अमेरिकन डॉलर्स एकूण मूल्यं असणाऱ्अया चीनी वस्तूंवर हे कर असतील. चीनने 100 अब्ज डॉलर्स मूल्याच्या अमेरिकन उत्पादनांवर कर लादले असून, यापैकी बहुतेक कर चीनही कायम ठेवण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)