राज ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्याचा फायदा होईल का?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचं आता दिसून येत आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेची जुनी हिंदुत्वाची भूमिका थोडीशी मवाळ झाली का आणि ती जागा मनसे घेणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

पक्ष स्थापन झाल्यानंतर 13 वर्षांनंतर राज ठाकरे यांनी पक्षाचे अधिवेशन घेण्याचे निश्चित केले आणि मनसेचा बहुरंगी झेंडाही त्यांनी बदलला.

हिंदुत्वाच्या भूमिकेच्या दिशेने हळूहळू वाटचाल

अधिवेशनामध्ये त्यांनी पुत्र अमित ठाकरे यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश घडवून आणला तर पक्षाचा झेंडाही बदलला. हा झेंडाबदल केवळ एक उपचार नसून त्यात मोठा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं दिसतं. राज ठाकरे यांनी मनसेचा अनेक रंगांचा जुना झेंडा बदलून आता तेथे भगवा झेंडा तोही राजमुद्रेसह वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेच्या अधिवेशनात सर्वांत महत्त्वाचा बदल दिसून आला तो म्हणजे स्वा. सावरकरांच्या प्रतिमेला व्यासपीठावर मिळालेले स्थान. शिवसेनेने आजवर स्वा. सावरकरांच्या बाजूने भूमिका मांडली असली तरी आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर स्पष्ट भूमिका घेण्यात शिवसेनेची थोडी अडचण झाल्याचं दिसतं.

विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात शिवसेनेची आणि सरकारची भूमिका स्पष्ट करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी भाजपला तरी सावरकरांचे सर्व विचार मान्य आहेत का असा प्रतिप्रश्न विचारला होता.

याबरोबरच राज ठाकरे यांनी या पहिल्या महाअधिवेशनासाठी आणखी एक दिवस साधला आहे कारण 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे.

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर तयार झालेल्या पोकळीला मनसे भरुन काढणार का आणि जर हिंदुत्वाचा झेंडा पूर्णपणे स्वीकारला तर मनसेला त्याचा फायदा होणार का असा प्रश्न निर्माण होतो.

'हे बदल मनसेला सक्रीय करतील'

झेंडा बदलणं हे मनसेत भविष्यात मूलगामी बदल होतील, ह्याचे संकेत आहेत. हे बदल मनसेला अधिक सक्रिय आणि परिणामकारक करतील, अशी आशा वाटते, असं मत 'दगलबाज राज' पुस्तकाचे लेखक कीर्तिकुमार शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

ते म्हणाले, "2006 साली मनसे पक्षाची स्थापना झाल्यापासून 13 वर्षं झाली. मार्च महिन्यात पक्षाला 14 वर्षे होतील. या सर्व प्रवासात दोन टप्पे स्पष्टपणे दिसून येतात. त्यातल्या 2012 पर्यंतच्या टप्प्यामध्ये कोणत्याही नव्या पक्षाचा विचार करता नजरेत भरेल इतकं मोठं यश पक्षाला मिळालं. त्यामुळे जुन्या प्रस्थापितांना हादरा बसला. मनसेने एक नवा तरुण मतदार वर्ग तयार केला.

पुढे ते सांगतात, "2012 नंतर मात्र या सुसाट वाहनाला अपघात व्हावा तशी अनाकलनीय कारणामुळे खीळ बसली. गांभिर्याने विचार करायला प्रवृत्त व्हावं असं अपयश आलं. या टप्प्यामुळे पक्षाच्या समग्र प्रतिमेचा, विचारांचा, धोरणांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली. झेंड्यातले रंग बदलणं म्हणजे केवळ झेंड्यापुरता संबंध नाही तर ते प्रतीकं बदलणं आहे. जेव्हा प्रतीकंच बदलली जातात तेव्हा त्यामागे मनापासून आलेला विचार असतो. ही प्रतीकं बदलली म्हणजे पक्षाच्या विचारात, कृतीत, संघटनेत, कार्यपद्धतीत, आंदोलनांमध्ये, लोकांचे प्रश्न घेण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसणारच."

याचा अर्थ मनसेनं मराठीच्या मुद्द्याचा त्याग केला आहे असे विचारताच कीर्तिकुमार शिंदे म्हणाले, "मराठीच्या मुद्द्याचा पक्षाने त्याग केला असा याचा अर्थ होत नाही. पक्षाच्या या अधिवेशनात मराठी, महाराष्ट्र, मराठी सिनेसृष्टीविषयक ठराव मांडले गेले आहेत. संपूर्ण अधिवेशन मराठीतच झालं आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा सोडला असं दिसत नाही."

हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे मनसे येत्या काळात भाजपबरोबर जाईल असं वाटतं का यावर शिंदे म्हणाले, "झेंडा बदलला म्हणजे मनसे भाजपसोबत जाईल, असं समजणं भाबडेपणाचं ठरेल. राज ठाकरेंसारखं नेतृत्व भाजपच काय, कोणत्याही पक्षासोबत कधीही घरंगळत जाणार नाही. ते काहीही करतील, पण स्वतःच्या अटी-शर्तीवरच."

शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांवर लक्ष

नवीन झेंड्याच्या माध्यमातून माध्यमातून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचं मत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं.

याबाबत विश्लेषण करताना प्रधान सांगतात, "शिवसेनेचा मोठा मतदार हा हिंदुत्ववादी विचारांना मानणारा आहे. हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन हा मतदार बाळासाहेब ठाकरेंच्या मागे गेला होता. हा वर्ग मोठा आहे. पण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे हा वर्ग नाराज झालेला आहे. तसंच शिवसेनेने काँग्रेससोबत जाणं हे अनेक शिवसैनिकांना रुचलेलं नाही. त्यामुळे ही राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे."

मनसेच्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना पत्रकार अभिजित ब्रह्मनाथकर म्हणतात, "उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवला असं दिसतं. अर्थात उद्धव ठाकरे सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला जाणार असं सामनामधून प्रसिद्ध झालं असलं तरी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याचं लोकांना दिसतं.

"लोकांची ही नाराजी, कार्यकर्त्यांची नाराजी, सेनेनं काँग्रेसशी केलेली हातमिळवणी यामुळे तयार झालेली पोकळी राज ठाकरे भरुन काढतील. शिवसेनेचा निर्णय सेनेच्या कार्यकर्त्य़ांना पचणं जड गेलेलं दिसतं. मनसेचे नेते शिवसैनिकांना परत या अशी साद घालत आहे. राज ठाकरे हिंदुत्व आणि महाराष्ट्र धर्माची भूमिका घेत आहेत असे ते लोकांना सांगत आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्याचं समर्थन केलं. हा मुद्दा घेऊन ते जनतेत जातील असं दिसतं," ब्रह्मनाथकर सांगतात.

अमित ठाकरे यांच्याबाबत बोलताना अभिजित ब्रह्मनाथकर म्हणाले, "तरुणांना आकर्षित करणारा नवा चेहरा अमित ठाकरे यांच्यामध्ये दिसतो. मनसेने नवे नेते उभे केले मात्र म्हणावं तसं नेतृत्व उभं झालेलं नाही. ते आता राज ठाकरे यांना बांधावं लागेल, त्यासाठी अमित ठाकरे यांची मदत होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)