सोनिया गांधी: CAA चा हेतू भारतीयांचं धर्माच्या आधारे विभाजन करणे हा आहे #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Congress/Twitter
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. धर्माच्या आधारे विभाजन हाच CAAचा हेतू-सोनिया गांधी
धर्माच्या आधारे विभाजन करणं हाच नागरिकत्व सुधारणा कायद्यामागचा हेतू आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. काल काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली.
त्यावेळी मोदी सरकावर त्यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. जेएनयू आणि इतर ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात एक उच्चस्तरीय आयोग नेमण्यात यावा अशीही मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
"नव्या वर्षाची सुरुवातच संघर्ष, विद्यार्थ्यांना झालेली मारहाण, आर्थिक समस्या, अपराध या सगळ्यांनी झाली आहे. CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायदा भेदभाव करणारा आणि धार्मिक विभाजन करणारा कायदा आहे." असं त्या पुढे म्हणाल्या.
2. आदेश मिळताच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ- मनोज नरवणे
जम्मू काश्मीर आपल्या देशाचं अविभाज्य अंग आहे असा संकल्प आपल्या संसदेचा आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू असं लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केलं. माणेकशा सेंटरमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकमतने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
भारतीय लष्कर राज्यघटनेला प्राधान्य देत. गुप्तचर विभागाकडून आम्हाला विविध प्रकारची माहिती दररोज मिळत असते. त्या आधारेच त्यावर काम केलं जातं. पाकिस्तानच्या बॅट या लष्करी तुकडीची माहिती मिळाली आणि त्यांच्या कारवाया आम्ही हाणून पाडल्या असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान भारत व चीन दरम्यान हॉटलाईन सुरू करण्याचा प्रस्ताव असून तो लवकरच लक्षात येईल असं मनोज नरवणे यांनी सांगितलं.
3. साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भावनांशी सहमत- अनिल देशमुख
93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आपण भेट घेणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. "दिब्रिटो यांनी देशातील धोरणकर्त्या वर्गाला केलेलं आवाहन विचार करण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्राचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या या मंचाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे," असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आवाज उठवला. त्या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. दिब्रिटो यांनी सर्व भेदाच्या पलीकडे जाऊन देशाच्या भल्याची भूमिका मांडली आहे त्यामुळे त्यांची भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा करणार असल्याचं ते पुढे म्हणाले.
4. जेएनयू हिंसाचारात पोलिसांनी 37 जणांची ओळख पटवली
पाच जानेवारीला जेएनयूत झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात एका व्हॉट्स अप ग्रुपचा पोलिसांना शोध लागला असून त्यातील 60 पैक 37 जणांची पोलिसांनी ओळख पटवली आहे. या ग्रुपमधील सदस्यांनीच हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं असा आरोप लावण्यात येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, UGC
या 37 जणांपैकी 12 जणांनी आम्ही कोणत्याही राजकीय विचारसरणीचे नसल्याचं पोलिसांना ठामपणे सांगितलं. ज्या लोकांची पोलिसांनी ओळख पटवली आहे त्यांचा जबाब लवकरच नोंदवला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
5. देशाची परिस्थिती सध्या वाईट, पण लवकरच सगळं ठीक होईल- सुनील गावस्कर
सध्या देशभरात सुरू असलेली निदर्शनातून देश लवकरच बाहेर येईल. भारताने याआधीही अशा परिस्थितीतून मार्ग काढला आहे असं वक्तव्य देशाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केलं आहे. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.
"सध्या देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. तरुण मुलं सध्या महाविद्यालयात जाण्याऐवजी रस्त्यावर उतरली आहेत. आपण एकत्र आलो तर सर्व संकटांतून मार्ग काढू आणि भारत एक कणखर देश म्हणून उदयाला येईल" असं ते म्हणाले, लालबहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानात ते बोलच होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








