Gold Price: सोन्याचा विक्रमी उच्चांक, इराण-अमेरिका संघर्षाचा बाजारपेठेवर परिणाम

अमेरिका आणि इराणमधील वाढलेल्या तणावाचा परिणाम जागतिक शेअर बाजारांवर झाला आहे. भारतातल्या शेअर बाजारातही याचे पडसाद पहायला मिळाले.

सोमवारी (6 जानेवारी) दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण होती. दिवसाअखेर सेन्सेक्स 1.90 अंकांनी तर निफ्टी 1.91 अंकांनी घसरून बंद झाला.

अमेरिका - इराणमधल्या तणावाचा परिणाम डॉलरचं मूल्य तसंच सोन्याच्या आणि इंधनाच्या किमतींवरही झालेला आहे. सोन्याने सात वर्षांतला विक्रमी उच्चांक गाठला आहे.

मुंबई शेअर बाजार सोमवारी (6 जानेवारी) दिवसभराच्या ट्रेडिंगनंतर सेन्सेक्स 788 अंकांनी घसरून बंद झाला. तर निफ्टीही 235 अंकांनी घसरून 11,992 वर बंद झाला. इतर देशांच्या तुलनेत भारत इंधनासाठी मध्य पूर्वेतल्या देशांवर जास्त अवलंबून आहे. म्हणूनच कच्चं तेल महागल्यास त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे.

यासोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरल्यानेही त्याचा शेअरबाजारावर परिणाम झाला. अशा अस्थिर वातावरणात गुंतवणूकदार आपला पैसा सोन्यासारख्या भरवशाच्या पर्यायांकडे वळवणं पसंत करत असल्याने जगभरातल्या शेअर बाजारांवर त्याचा परिणाम होतो. आज अशीच घसरण आशियातल्या सर्वच शेअरबाजारांत पहायला मिळाली.

इंधन दरात वाढ

कासिम सुलेमानी यांची हत्या आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणवर निर्बंध लादण्याची दिलेली धमकी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत 2% पेक्षा जास्त वाढ होत या ब्रेंट क्रूडच्या किंमती 70 डॉलर्स प्रति बॅरलवर गेल्या.

जगाच्या एकूण इंधनापैकी जवळपास अर्धी इंधन निर्मिती ही मध्य-पूर्वेत होते. 'ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कन्ट्रीज' म्हणजेच ओपेक (OPEC) देशांमध्ये तेल निर्मितीच्या बाबतीत इराणचा क्रमांक दुसरा असल्याचं 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. तर जगाला होणाऱ्या एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20% पुरवठा हा इराण आणि ओमानच्या मध्ये असणाऱ्या होर्मुझच्या खाडीमार्गातून (Strait of Hormuz) होतो. इराणमधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची सक्ती केल्यास इराणवर निर्बंध लादण्याची धमकी डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे.

लिबियामधून कच्च्या तेलाची निर्यात होत असणारी चारही टर्मिनल्स खराब हवामानामुळे रविवारी बंद होती. पुढचे 3 दिवस ही टर्मिनल्स बंद राहण्याची शक्यता आहे.

कच्चं तेल महागल्याने पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. सोमवारी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 81.34 रुपये प्रति लीटर होता. तर डिझेलची किंमत होती 72.07 रुपये प्रति लीटर.

सोन्याच्या दराचा उच्चांक

जागतिक राजकीय अस्थिरता, अमेरिका - इराणमधला तणाव यामुळे गुंतवणूकदारांनी भरवशाच्या सोन्यातल्या गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. सोन्याने गेल्या 7 वर्षांतला उच्चांकी दर गाठला आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचा दर 40,875 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होता. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रामध्ये सोन्याच्या किंमतीत 1800 रुपयांनी वाढ झालीये. सोन्यासोबतच चांदीच्या दरांतही वाढ झाली असून चांदीचा दर 48,080 रुपये प्रति दहा ग्रॅम वर गेलाय.

कोणत्याही प्रकारची जागतिक अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा पहिला परिणाम शेअरबाजारांवर होतो. अशा परिस्थितीत मोठे गुंतवणूकदार शेअरबाजारांतून आपला पैसा काढून घेऊन सोन्यात गुंतवणूक करणं पसंत करतात. शिवाय जगभरातल्या देशांची सरकारंही सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात. यामुळेच सोन्याला असणारी मागणी वाढते आणि सोनं महागतं.

पण एप्रिल ते नोव्हेंबर 2019 या काळामध्ये भारताकडून करण्यात येणाऱ्या सोन्याच्या आयातीमध्ये सुमारे 7 टक्क्यांची घट झाली आहे.

अर्थव्यवस्थेवर परिणाम

अमेरिका - इराणमधल्या तणावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. देशातला महागाईचा दर वाढत आहे. त्यातच इंधनाच्या किंमती वाढल्या तर या महागाईत वाढ होईल. अर्थव्यवस्थेचा विकासदर गेल्या सहा वर्षातल्या निचांकी पातळीवर आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 4.5%वर आहे. पेट्रोल - डिझेल महागलं तर त्याचा परिणाम एकूण महागाईवर तर होईलच. पण सोबतच सरकारला स्वयंपाकाच्या गॅसवर देण्यात येणाऱ्या सबसिडीवर जास्त खर्च करावा लागेल. जगामध्ये सर्वात जास्त इंधन वापरणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान तिसरं आहे. राजकीय अस्थिरतेमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण झाली आणि त्याचाही फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे.

रुपयाने गेल्या दीड महिन्यातली सर्वात खालची पातळी गाठली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य ट्रेडिंगदरम्यान 72 रुपयांवर गेलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)